जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याची लढण्याची कार्यपद्धती

    दिनांक  20-Aug-2017   


भारतात घुसखोरी कशी केली जाते?


आयएसआयने काहुटा, हाजिरा, कोटली इत्यादी क्षेत्रांत पुरक्षेपणतळ (फॉर्वर्ड-लॉंचिंग-बेसेस) स्थापन केलेले आहेत. कारवाईनुसार प्रत्येक दहशतवादी गट, आघाडीच्या-संरक्षित-वस्तीत आयएसआयच्या अधिकार्‍याच्या देखरेखीत दिवसाढवळ्या टेहळणीकरिता, भारतीय सुरक्षा दलांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी आणि मार्गदर्शकांशी गाठ घालून देण्यासाठी आणला जातो. त्यांना कामे वाटून दिली जातात. आवश्यकतेनुसार सहा ते आठ दहशतवाद्यांच्या टोळीने कारवायांत उतरवले जातात.

 
१. प्रत्येक गटास एक स्थानिक मार्गदर्शक पुरविला जातो. सामान्यतः तो अलीकडेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थलांतरित झालेला त्याच भागातला रहिवासी असतो आणि त्याचे भारतातील नातेवाईक त्याला सुरक्षा दलांची अद्ययावत माहिती व प्रशासकीय आधार पुरवितात.


२. सर्व अतिरेकी तैनात (इंडक्ट) झाल्यावर त्यांना ए. के.-४७ किंवा जीपीएमजी क्षेपणनळी व १५ ते २० गोळे, एक बंदूक यांसारखी शस्त्रे आणि जगण्यापुरता शिधा देऊन सुसज्ज केले जाते. त्याशिवाय प्रत्येक गटास एक आर. एल./ रणगाडाविरोधी गोळेही दिले जातात. शिवाय, काही गट त्यांच्या दर्जानुरूप पीएनव्हीडी, चुंबकसुई आणि आय-कॉम/ केनवूड/ वायईएएसयूएचएफ चालता-बोलता (वॉकी-टॉकी) संचही बाळगत असतात.


३. नियंत्रण रेषेपलीकडून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी सकृतदर्शनी अवघड मार्ग वापरत असते. स्वतःच्याच प्रतिघुसखोरी छाप्यांना दडपून टाकण्याकरिता, पाकिस्तानी चौक्यांतून होणार्‍या गोळीबाराचे छत्रही घेत असते.


४. घुसखोरी सामान्यतः रात्रीच्या पूर्वार्धात होत असते. ही चंद्रोदयावर व वाईट हवामान इत्यादींवर अवलंबून असते, त्यानंतर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे नियंत्रणरेषेच्या नजीकचा भाग पार करून पुढे जाण्यास आणि पहाट उगविण्यापूर्वीच सुनिश्‍चित लपण्याच्या जागेपर्यंत पोहोचण्यास पुरेसा अवधी मिळू शकतो.


५. घुसखोरीदरम्यान दहशतवाद्यांचे उद्दिष्ट, सुरक्षा दले त्यांच्या लपण्याच्या जागेपर्यंत पोहोचेपर्यंत, सुरक्षा दलांशी संपर्क टाळण्याचे असते. जर नियंत्रणरेषेनजीकच गाठले गेले तर, अतिरेकी माघारी फिरतात. खूप आत आलेले असताना सुरक्षा दलांच्या लक्षात आले, तर पळून जाऊन संपर्क तोडतात आणि त्यांच्या निश्‍चित केलेल्या लपण्याच्या जागेपर्यंत जाऊन पोहोचतात.


लपण्याच्या जागा / तात्पुरत्या थांबण्याकरिता स्थळे (ट्रान्झिट पॉईंट)

खोलवरच्या आतल्या भागांत माहीत असलेली दहशतवाद्यांची कुठलीही कायमस्वरूपी शिबिरे नाहीत. मात्र, भेदलेल्या (इंटरसेप्टेड) संदेशान्वये असे दिसते की, त्यांनी काही नियंत्रक स्थानके पीर-पांजालसारख्या उच्च पर्वतराशींमध्ये स्थापन केलेली असावीत. उर्वरित दहशतवादी सहा ते आठजणांच्या गटांतून, खेड्यांलगतच्या, कुठल्याही सुरक्षा दलाने न व्यापलेल्या जंगलातील जागांवर राहतात. दहशतवादी नागरी वस्तीच्या जवळ राहतात, जेणेकरून नागरिकांवर अवलंबून असलेली त्यांची प्रशासकीय कामे (जेवण, पाणीपुरवठा, राहण्याची व्यवस्था, कामपूर्ती वगैरे) होऊ शकतात, सुरक्षा दलांच्या हालचालींबाबत सुगावा लागू शकतो आणि स्थानिकांवर बळजबरीने वर्चस्व प्राप्त करता येते, त्यांच्या बायकांचा गैरवापर करता येतो. दहशतवाद्यांच्या शिबिरांची ठिकाणे उन्हाळा आणि हिवाळ्याच्या महिन्यांदरम्यान बदलत असतात.

 

नियंत्रणरेषेवर वर्चस्वाची लढाई

नियंत्रणरेषेच्या व्यवस्थापनात मुख्य भाग, दहशतवाद्यांची घुसखोरी प्रभावीपणे कशी रोखावी, हाच असतो. भूदलाने अवलंबिलेल्या प्रतिघुसखोरी उपायांमुळे दहशतवाद्यांचा प्रवाह लक्षणीयरित्या घटलेला आहे.

सद्यस्थितीत, पहिले दरसाल तीन ते चार हजारांपासून तर आता दरसाल १०० हूनही कमीपर्यंत घुसखोरी घटलेली आहे. मात्र, अवघड भूप्रदेश, नियंत्रणरेषेच्या दोन्हीही बाजूस वावरणार्‍या स्थानिकांचे परस्परांशी असलेले सांस्कृतिक संबंध, भागाचे मोठे क्षेत्रफळ आणि शोधक-साधनांची उणीव या गोष्टी प्रतिघुसखोरी उपायांना अडथळा ठरतात. घुसखोरी आणि पलायने प्रभावीपणे रोखण्याकरिता काही उपाययोजना-

१. नियंत्रणरेषेपार स्थापित केलेल्या गुप्तवार्ता संकलनात सुधारणा करणे : पाकिस्तानातून त्यांच्या प्रशिक्षण शिबिरे, दहशतवाद्यांच्या हालचाली वेळेवर समजण्याकरिता नियंत्रणरेषेपार चांगल्या प्रकारचे स्त्रोतजाल (good intelligence network) निर्माण करणे. यामुळे दहशतवाद्यांना नष्ट करण्याकरिता पूर्वानुमानित छापे (anticipatory ambushes) टाकले जाऊ शकतील.

२. दहशतवाद्यांनी नेमलेल्या मार्गदर्शक आणि गुप्तवार्ता संकलकांनी काम करण्यास नकार देणे : प्रत्यक्षात घुसखोरी घडून येण्यापूर्वीच टिपलेले, सीमावर्ती भागातले विशेषतः ग्रामीण भागांतले दुहेरी हेर (Double agents) आणि आयएसआय कार्यकर्ते, निष्प्रभ केले पाहिजेत. चांगल्या प्रकारचे प्रतिघुसखोरी गुप्तवार्ता-जाल तयार करणे आणि निवडक गावांतील लोकांना सीमेपासून दूरवरच्या आपल्याकडील आतील भागांत स्थलांतरित केल्यास आयएसआयला मार्गदर्शक आणि कार्यकर्ते मिळण्यापासून वंचित केले जाऊ शकेल.

३. निवडक भागात भूसुरुंग पेरून नियंत्रणरेषेचा काही अवघड भाग घुसखोरीकरिता नाकारणे :नियंत्रणरेषेवरील काही निवडक भागात भूसुरुंग पेरून आणि गस्त वाढवून, दहशतवाद्यांना घुसखोरीकरिता नाकारता येईल. यामुळे दहशतवाद्यांना अशा इतर भागांत वळवून, जिथे अनेक छापे टाकून त्यांना नष्ट केले जाऊ शकेल.

४. सर्वेक्षण जाळ्यात (Surveillance Grid) सुधारणा करणे : सद्यपरिस्थितीत घुसखोरी थांबविण्यासाठी तैनात केलेल्या तुकड्या त्यांच्या कानांवर आणि डोळ्यांवर आणि मर्यादित संख्येतील रात्रदृष्टी-साधनां (नाईट-व्हिजन-डिव्हाईस) वरही घुसखोरी शोधण्याकरिता विसंबून असतात. उच्च-गुणवत्ता, विना-देखरेख (अन्अटेन्डेड), जमिनी-संवेदक (high quality unattended ground sensors) आणि सुधारित दीर्घ-पल्ला औष्णिक-चित्रक/ रात्री दिसण्याकरिता सुधारित दुर्बिणी (long-range thermal imagers) शोधन-सामर्थ्य लक्षणीय प्रमाणात वाढवू शकतात.

. नियंत्रणरेषेवरील सैन्याच्या तैनातीचे बदलत्या परिस्थितीप्रमाणे पुनरीक्षण करणे : आपली प्रतिघुसखोरी भूमिका काहीशी पूर्व-अनुमानपात्र झाली आणि तिचे नियमितपणे पुनरीक्षण आवश्यक झाले आहे. यामुळे सुरक्षा दलांना जास्त यश मिळेल.

 

घुसखोरी विरोधी अभियानात भूदलाची कार्यवाही


भूदल करत असलेली लष्करी कार्यवाहीची संकल्पना, त्यांच्या तीव्रतेवर आणि कार्यवाहीच्या क्षेत्रावर अवलंबून असते. भूदलाने केलेल्या डावपेचात्मक कार्यवाही खालीलप्रमाणे आहेत.


१. दहशतवादी प्रशिक्षण शिबिरावर, राहण्याच्या जागेवर छापे-प्रतिछापे


२. दहशतवादी लपलेल्या गावांना वेढे आणि शोधक कार्यवाही


३. दहशतवादी लपलेल्या जागेचा शोध आणि विनाशक कार्यवाही


४. रस्त्यावरून जाणार्‍या गाड्या आणि माणसाचा जागीच तपास आणि फिरत्या तपासचौक्या वापरून अचानक तपास (ज्यामुळे दहशतवादी पकडला जाण्याची शक्यता वाढते)


आता, या प्रत्येक कार्यवाहीचा आपण आढावा घेऊ. घात लावून/अनपेक्षित छापा (Delibrate/ Opportunity ­Ambush)आश्‍चर्यकारकरित्या, अज्ञात ठिकाणावरून, तात्पुरत्या थांबलेल्या किंवा हलत्या शत्रूवर, त्याची अपेक्षा नसताना केला गेलेला हल्ला, म्हणजे छापा. छाप्याची वैशिष्ट्ये म्हणजे धक्का, गती आणि हिंसक स्फोटशक्ती. अनेकदा काश्मिरी नागरिक, स्वेच्छेने किंवा बंदुकीचा धाक बसल्याने दहशतवाद्यांना मार्गदर्शक म्हणून काम करत असतात. पुढे असलेल्या भूदलाची पूर्वसूचना देत असतात. दहशतवादी काही वेगळा-ओळखू यावा, असा पोशाख घालत नसतात, त्याच भागातले असतात त्यामुळे त्यांची ओळख पटणे तसे अवघडच असते.


भूदलाकडून नागरिकाची ओळख पटविण्याच्या प्रयत्नामुळे, दहशतवादी स्थानिकांसोबतच मिसळून जाऊ शकतो, ज्यामुळे समस्या आणखीनच क्लिष्ट होत जाते. यामुळे अशा कार्यवाहींमध्ये नागरिकांचीही प्राणहानी घडून येऊ शकते .दहशतवाद्यांचा छापा (Hostiles ­Ambush)/सशस्त्र दलांचा प्रतिछापा (Counter A­mbush by A­rm)


दहशतवाद्यांना भूदलाच्या हालचालींची ज्यावेळी माहिती असते तेव्हा तेही छापा टाकू शकतात. असा छापा नामशेष करण्याकरिताच एकमेव संभाव्य उपाय म्हणजे, आक्रमकपणे हातगोळे आणि स्फोटके वापरून त्यांच्यावर प्रतिछापा टाकणे हा होय. जेव्हा भूप्रदेशामुळे असा समोरासमोर हल्ला शक्य होत नाही, तेव्हा आघाडीच्या घटकांनी ताबडतोब उलट आग ओकली पाहिजे (शस्त्राने फायर) आणि शत्रूला जवळ जाऊन स्फोटकांच्या मार्‍याने आणि तिथवर प्रत्यक्षात पोहोचून जखडून ठेवले पाहिजे.


दिलेल्या परिस्थितीत, जर दहशतवाद्यांनी निरपराधी नागरिकांचा ढाल म्हणून वापर केला किंवा गर्दीच्या भागातून छापा चढविला तर, सैनिकी तुकड्यांना प्रभावीपणे फायर करणे खूपच अवघड होऊन जाते आणि स्वतःच स्फोटकांच्या मार्‍याखाली वावरत असताना, सामान्य नागरिकांपासून दहशतवाद्यांना अलग करणे हे अनेक वेळा अशक्य असते. अशा परिस्थितीत सैनिकांना संयम राखण्यास शिकवलेले असते, पण ‘मारो या मरो’ या स्थिती मध्ये, परस्पर स्फोटकफेकीत (क्रॉसफायर) निरपराध नागरिकास मार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच श्रीनगर शहराच्या मध्यभागी भूदलाच्या वाहनताफ्यावर असा छापा पडला होता. अतिरिक्त सैनिक दाखल होताच दगडफेक सुरू झाली. अगदी रुग्णवाहिकांनाही जखमींना वाहून नेण्यापासून थांबविले जाते. सैनिकांना प्रचंड आत्मसंयम ठेवावा लगतो, अनेक वेळा लगेच फायर न केल्यामुळे दहशतवाद्यांच्या गोळ्यांची शिकार बनावे लागते.


दहशतवादी लपलेल्या गावांना वेढे आणि शोधण्याची कार्यवाही (Cordon and Search Operations)


खालील कारणांकरिता एखादे गाव किंवा भागाचा शोध घेण्याकरिता अशा कार्यवाही हाती घेतल्या जातात.


१. त्या भागात दडून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडण्या किंवा मारण्याकरिता


२. दहशतवाद्यांकरिता ठेवलेली शस्त्रास्त्रे, दारुगोळा, रसद पुरवठा किंवा दस्त-ऐवज हस्तगत करण्याकरिता


कार्यवाहीत त्या गावास घेरले जाते. बहुधा रात्रीच हे केले जाते. नंतर वेढ्याच्या आतमध्ये, दिवसा उजेडी, गावातील घरांचा शोध घेतला जातो. त्यात गावातल्या सर्व लोकांना बाहेर काढून गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवावी लागते. जरी सैनिकांना कमाल संयम राखण्यास आणि वडीलधार्‍यांचा व स्त्रियांचा आदर राखण्यास शिकविलेले असते. अनेकदा काही लोक दहशतवाद्यांना मिळालेले आढळून येतात. कार्यवाहीची गरज म्हणून, नागरिकास, शोध संपेपर्यंत त्रास सोसावा लागतो. जर दहशतवादी, निरपराध नागरिकाच्या घरातच लपून बसलेले असतील आणि गोळीबार झाला, तर त्याच्या संपत्तीस नुकसान पोहोचू शकते, अशी हानी भरून दिली जाते.


दहशतवादी लपलेल्या जागेचा शोध आणि विनाशक कार्यवाही (Search and Destroy Operations)


सशस्त्रदले दहशतवाद्यांना पकडण्याकरिता किंवा नष्ट करण्याकरिता शोधक आणि विनाशक कार्यवाही हाती घेत असतात. जेव्हा त्यांना शस्त्रे व दारुगोळ्यासहित सुटकेचा मार्गच दिसत नाही असे वाटते तेव्हा, शस्त्रे व दारुगोळा लपवून आणि नागरी कपडे चढवून ते गावातील लोकांत मिसळून जातात, ज्यामुळे त्यांना निसटून जाणे सोपे होते.


रस्त्यावरून जाणार्‍या गाड्या आणि माणसाचा जागीच तपास (Spot Checks)आणि फिरत्या तपासचौक्या(Mobile Check Posts)
फिरती तपासचौकी, खालील गोष्टींसाठी जागीच तपास करण्याकरिता प्रस्थापित केली जाते.


१. दहशतवादी किंवा संशयितास पकडण्याकरिता


२. दहशतवादी किंवा त्यांचे समर्थक वाहून नेत असलेली; शस्त्रे, दारुगोळा, स्फोटके, आणि रसद पुरवठा यांच्या हालचालीवर नजर ठेवून ती जप्त किंवा नष्ट करणे.


३. सावधानता वाढवून दहशतवादी कारवायांना प्रतिरोध निर्माण करणे


. दहशतवादी कारवायांबाबत गुप्तवार्ता प्राप्त करणे.


फिरती तपासचौकी कुठल्याही पूर्वसूचनेविना, प्रस्थापित केली जाते; ज्यामुळे दहशतवादी कार्यकर्त्यांची, त्यांच्या रसद-पुरवठ्याची, अत्यावश्यक असलेल्या शस्त्रांची, दारुगोळ्याची, शिध्याची, औषधांची आणि माहितीची मुक्त हालचाल विस्कळीत होऊन त्यांचे धैर्य खचते. यंदाच्या वर्षात आतापर्यंत ११९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.


जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादास निरनिराळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्रोतांकडून अर्थपुरवठा होत असतो. दहशतवादाचा सामना करण्याचा प्रभावी उपाय म्हणजे; अमलीपदार्थांचा व्यवसाय, लुटालूट, खोट्या चलनी नोटांचे व्यवहार, खोटे धर्मादाय निधी, तसेच हवाला आणि दिखाऊ-पेढ्यांसारखे व्यवहार या सर्व स्रोतांविरुद्ध; बहुआयामी हल्ला करणे हाच होय. अर्थपुरवठा थांबला तर दहशतवादास मोठा धक्का दिला जाऊ शकतो.

- (नि.) ब्रि. हेमंत महाजन