अनामिकाचे सत्य...

    दिनांक  19-Aug-2017   

 
’सच कडवा होता है’ असे म्हणतात, पण ‘साराह’ नावाच्या ऍपने सध्या सोशल मीडियावर ‘सच कन्स्ट्रक्टिव्ह होता है’ची री ओढत एकच धुमाकूळ घातला आहे. कारण, आपलं नाव जाहीर न करता, अगदी अनामिकपणे आपण आपल्या मित्रांना, सहकार्‍यांना, कुटुंबीयांना निनावी संदेश पाठवू शकतो. त्यामुळे संदेश पाठवणार्‍या व्यक्तीची ओळख पटणारच नसल्याने अनेकजण सध्या बेधडकपणे मतप्रदर्शनाच्या या नामी संधीचा पुरेपूर वापर करताना दिसतात. म्हणजे एखाद्याविषयी काय वाटतं ते अगदी दिलखुलासपणे, प्रामाणिकपणे आणि बिनधास्त मांडायची मुभा आणि तीही नाव न कळण्याच्या, रिप्लायच्या अटीशिवाय. अशा या बेधडक ऍपमुळे फेसबुकच्या भिंतीही हल्ली निळ्याशार झाल्या आहेत कारण, या ऍपवर आलेले मेसेजेस आपण फेसबुकवर सहज शेअरही करू शकतो आणि ज्याने तुम्हाला तो मेसेज पाठवला, त्याला असा अप्रत्यक्ष रिप्लायही...(ट्रोलवाटोलवी!!!)
 
‘साराह’ या नावावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की, हे ऍप पाश्चिमात्यांच्या डोक्याची निश्चितच उपज नाही. सौदी अरेबियातील संगणक इंजिनिअर झैन अल अब्दिनी तौफिक याच्या मनात ही संकल्पना आली आणि या ऍपच्या माध्यमातून त्याने ती प्रत्यक्षात साकारली. नाव दिलं ‘साराह’ म्हणजेच उर्दूमध्ये ‘प्रामाणिकपणा.’
 
’‘जे एखाद्याच्या तोंडावर बोलता येत नाही, ते शब्दांच्या माध्यमांतून व्यक्त करा,’’ हा खरं तर या ऍपमागचा उद्देश. मग ते प्रेमभावना व्यक्त करणे असो वा द्वेषभावना, ‘साराह’वर तुम्ही तुमच्या कुठल्याही भावनांना वाट मोकळी करून देऊ शकता. अधिकाधिक लोकांनी आपल्या मित्रांसोबत, सहकार्‍यांसोबत अनामिकपणे का होईना, मतप्रदर्शन करावे, हा त्यामागचा ‘प्रामाणिक’ उद्देश, पण ‘कन्स्ट्रक्टिव्ह मेसेज टाईप करा’ सांगणार्‍या ‘साराह’ वर सध्या ‘डिस्ट्रक्टिव्ह मेसेजेस’चेही पेव फुटलेले दिसते. एखाद्यावर नाहक टीका करणे, जुने हिशोब चुकते करणे, शिवीगाळ करण्यासारख्या प्रकारांनाही यामुळे एकाएकी ऊत आला. ‘साराह’च्या वापरकर्त्याला हे निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे की, फक्त फेसबुकवरची मित्रमंडळीच त्याला मेसेज करू शकतात की जगातील कोपर्‍यात बसलेलं अगदी कुणीही... त्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्या न आवडणार्‍या सवयींपासून ते अगदी तुमचा अपमान करण्यापर्यंत या ऍपचा दुधारी अस्त्रासारखा वापर करू शकते. सगळेच वाईट बोलतील, असेही नाही, पण चांगलं बोलतील याचीही शाश्वती नाहीच! पण प्रत्येकाला कुठे ना कुठे, इतरांची आपल्याविषयीची बरी-वाईट मतं जाणून घ्यायची एक सुप्त इच्छा असतेच. फक्त तोंडावर बोलायला सहजा कोणी धजावत नाही, कारण अशाने संबंध खराबही होण्याची भीती असते. पण सोशल मीडियावरील पडीक मंडळींना, लाईक्स-कमेंट्‌सची गणती करणार्‍यांना हा एक नवीन टाईमपास हाती लागलाय, हे मात्र खरं. त्यामुळे अनामिकाचे सत्य हे ‘सत्य’ नसले तरी ते स्वीकारायचे किंवा त्यापासून दूर राहायचे, ही सर्वस्वी आपली निवड...
 
आता सायबर दक्ष व्हा!
सौदी अरेबिया आणि इजिप्तमध्ये नेटकर्‍यांच्या पसंतीस उतरलेले ‘साराह’ अल्पावधीत भारतीयांच्याही मोबाईलमध्ये घर करून गेले. जगभरात या ऍपच्या डाऊनलोडस्‌ने ३०० दशलक्षचा टप्पा ओलांडला, तर भारतातही ५० लाखांहून अधिक नेटकरींनी ‘साराह’ची वाट धरली. ‘साराह’च्या वापरकर्त्यांना या ऍपचे बरे-वाईट अनुभव आले असले तरी शेवटी ‘मोबाईल तुमच्या हाती’ हे विसरून कसे चालेल? पण ते म्हणतात ना, मस्करीची कुस्करी व्हायला फारसा वेळ लागत नाही. ती बाब ‘साराह’च्या बाबतीतही तंतोतंत लागू पडते. ‘साराह’ डाऊनलोड केल्यानंतर शिवीगाळ तर सोडाच, काहींना चक्क अश्लील आणि ब्लॅकमेल करणारेही संदेश आले. मुलींना खासकरून अशाप्रकारच्या ‘सायबर बुलिंग’ला एरवीही ऑनलाईन सामोरे जावे लागते आणि इथे तर अनामिकांची अख्खी फौजच! त्यामुळे ट्रोलर्सच्या या ऑनलाईन छेडखानीच्या काही घटनाही उजेडात आल्या. पण, आता ‘साराह’ वरून आलेल्या मेसेजेसला ट्रेस करणेही सोपे नाही. त्यामुळे तक्रार दाखल करूनही अशा केसेस कितपत निकालात निघतील, याची साशंकताच. २०१६च्या एका आकडेवारीनुसार, ‘सायबर बुलिंग’च्या घटनांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियामध्ये ‘सायबर बुलिंग’चे प्रमाण ८८ टक्के, अमेरिकेत ८० टक्के, सिंगापूरमध्ये ७१ टक्के, तर भारतात हेच प्रमाण ५७ टक्के इतके आहे. त्यामुळे खोटी प्रोफाईल बनवणे, लग्नाचे आमिष दाखवून मुलींची फसवणूक करणे, चुकीची माहिती शेअर करणे इत्यादी प्रकारांचे आपल्या देशातील वाढलेले प्रमाणही तितकेच चिंताजनक आहे.
 
  जसजसे भारतात इंटरनेट वापरकर्त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, त्याच प्रमाणात सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होताना दिसते. त्यातच सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींच्या नोंदणीविषयी असलेले एकूणच अज्ञान आणि अनास्थाही अशा गुन्ह्यांच्या वाढीला अप्रत्यक्ष पोषक ठरते. त्यामुळे सर्वप्रथमएक जबाबदार नेटिझन म्हणून प्रत्येक भारतीयाने सायबर गुन्हे, त्याचे प्रकार आणि त्यासंबंधी नियम-कायदे यांची पुरेपूर माहिती घेणे आवश्यक आहे. २०१५ साली सायबर गुन्हेगारीसंदर्भात भारतात ११ हजार ५९२ घटना नोंदविण्यात आल्या आणि वर्षागणिक हे प्रमाणही अधिकाधिक वाढण्याची भीती सायबरतज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे ‘साराह’ असो वा इतर कुठलेही सोशल मीडियाचे व्यासपीठ, त्याचा नेमका कसा आणि कशासाठी वापर करायचा, हा निर्णय प्रत्येकाच्या विवेकाचा. कारण, या आभासी दुनियेत फसवणूक करणे, पळवाटा शोधणे सोपे असले तरी गुन्हेगारी फार काळ झाकता येत नाही. ‘साराह’ वापरा अगर नाही, पण सायबर दक्ष जरूर राहा.
 
- विजय कुलकर्णी