अवैध्यरित्या पाणी उपसा करण्यावर बंदी

    दिनांक  16-Aug-2017


बुलढाणा : गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे भविष्य काळात जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जलाशयांमधून अवैध्यरित्या होणाऱ्या पाणी उपशावर बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक पथक देखील तयार करण्यात आले आहे.


जिल्ह्यात सध्या पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्यामुळे ग्रामीण व नागरी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. तसेच येत्या काही दिवसांमध्ये योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर जलाशय परिसरातील शेतकरी, नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर जलायश, बोअरवेल, विहीरींमध्ये मोटार पंपाद्वारे अवैधरित्या पाणी उपसा केल्यास पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांची पातळी झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा जलायशयांमधून पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आला आहे.


तसेच तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता, गटविकास अधिकारी, महावितरणचे उपअभियंता, मुख्याधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक ग्रामीण व नागरी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयातून होत असलेल्या अवैध पाणी उपसा बंद करण्यासाठी जलाशयाजवळ असलेल्या विद्युत मोटारी, मोटार पंप जप्त करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अवैध पाणी उपसा करू नये, असे आवाहन जिल्हा कार्यालयाकडून करण्यात आले आहे.