कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - फुंडकर

    दिनांक  15-Aug-2017


बुलढाणा : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेती क्षेत्राचा विकास होणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील शेतकरी हा सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कसलेही संकट आले तर अशा स्थिती शासन शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही,' असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले. देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.


शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात दीड लाखापर्यंत पीक कर्ज असलेल्या १ लाख ७० हजार ८५० शेतकऱ्यांच्या ९१३.२७ कोटी रूपयांच्या कर्जमाफीला मान्यता मिळाली आहे. तसेच दीड लाखावर कर्ज असलेल्या ४ हजार ९८० शेतकऱ्यांना ११८.६१ कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


याच बरोबर राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने हमीभावाने तुर खरेदीचा निर्णय घेतला. भाव स्थिरता आणि बाजार हस्तक्षेप योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रावर ४९ हजार ८११ शेतकऱ्यांची एकुण ८. ८९ लाख क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे व या खरेदीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ४२८.३८ लाख रूपयांचे चुकारे जमा करण्यात आलेले असल्याचेही ते म्हणाले.