
कवी रवीन्द्रनाथ टागोर यांची रचना ‘जन गण मन’ भारताचे राष्ट्रगीत आहे. संपूर्ण देशाचे विविधतेने नटलेले एकसंधतेने परिपूर्ण वर्णन या गीतामध्ये करण्यात आले आहे. राष्ट्रगीत म्हणताना त्यामध्ये अनेकदा काही शब्द चूकीच्या पद्धतीने उच्चारले जातात. कोणीही जाणूनबुजून राष्ट्रगीत चूकीचे म्हणत नसेल पण योग्य राष्ट्रगीत पुन्हा एकदा जाणून घेणे हे आपले कर्तव्य आहे. रवीन्द्रनाथ टागोर यांनी केलेल्या बंगाली रचनेनुसार हिंदी भाषेतील राष्ट्रगीत सध्या आपण म्हणतो.
ही रचना पुढीलप्रमाणे :
‘जन-गण-मन अधिनायक, जय हे
भारत-भाग्य-विधाता,
पंजाब-सिंधु गुजरात-मराठा,
द्रविड़-उत्कल बंग,
विन्ध्य-हिमाचल-यमुना गंगा,
उच्छल-जलधि-तरंग,
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष मांगे,
गाहे तव जय गाथा,
जन-गण-मंगल दायक जय हे
भारत-भाग्य-विधाता
जय हे, जय हे, जय हे
जय जय जय जय हे।’
राष्ट्रगीत डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
राष्ट्रगीत गायन अवघे ५२ सेकंदात पूर्ण होते. पण एक मिनिटांचा कालावधी राखीव ठेवून राष्ट्रगीन गायन केले जाते. कारण राष्ट्रगीत गायनाला सुरुवात करताना आधी ढोल वाजवून अथवा तोंडी सूचना देऊन सर्व उपस्थित राष्ट्रगीत सन्मानासाठी उभे असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. त्यानंतरच राष्ट्रगीत गायन सुरू करता येते.
राष्ट्रगीत म्हणून रवींद्रनाथ टागोर यांच्या रचनेचा स्वीकार करताना पहिल्या कडव्याचा स्वीकार करण्यात आला आहे. मूळ भारतविधाता ही काव्यरचना पाच कडव्यांची आहे. काही प्रसंगात फक्त ध्रुवपदाचे संगीत वाजवूनही राष्ट्रगीतापरी सन्मान व्यक्त करता येतो. संक्षिप्त स्वरूपातील राष्ट्रगीत २० सेकंदांचे आहे.
पुढीलप्रमाणे संक्षिप्त राष्ट्रगीत गायले जावे असे निर्देश आहेत.:
‘जन-गण-मन अधिनायक, जय हे
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे
जय जय जय जय हे।’
राष्ट्रगीताच्या गायन-वादनासंबंधी प्रत्येक राष्ट्रात विशिष्ट नियम, संकेत व रूढी निर्देशित केलेल्या आहेत. भारत देशाचे नागरिकत्व स्वीकारलेल्या सर्वांनी राष्ट्रगीत गायन सुरू असताना सावधान मुद्रेमध्ये उभे राहून राष्ट्राच्या सन्मान राखणे गरजेचे आहे. तसेच राष्ट्रगीत गायन सुरू असताना इतर उपस्थितांनीही उभे रहावे अशी विनंती करणे बंधनकारक आहे. या संकेतांचा भंग केल्यास राष्ट्राची अप्रतिष्ठा केली असे गृहीत धरून त्यासाठी योग्य दंड अथवा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
आज भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ही माहिती देत आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या बंगाली कादंबरीतील (१८८२) ‘वंदे मातरम्’ या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त झाला. या गीतातील काही भाग देशातील मुसलमान धर्मियांपैकी काहींना आक्षेपार्ह वाटल्याने त्यासंबंधी त्यावेळी वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे सुरुवातीची दोन कडवी वगळता उर्वरित गीत म्हणण्यास सार्वजनिक ठिकाणी निर्बंध लादले गेले. १५ ऑगस्ट, १९४७च्या स्वातंत्र्य सोहळ्याची सुरुवात ‘वंदे मातरम्’ या गीताने झाली.
पहिल्यांदा कलकत्ता येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सभेत हे गीत २७ डिसेंबर, १९११ रोजी प्रथम गायले गेले होते. न्यू-यॉर्कमध्ये १९४७ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत भारतीय राष्ट्रगीताची चाल मागवली गेली. भारतीय अधिकार्यांनी तेव्हा ‘जन गण मन’ची ध्वनिमुद्रिका युनोला दिली. युनोच्या वाद्यवृंदाने राष्ट्रगीताची धून सर्वांसमोर सादर करताच भारताचे राष्ट्रगीत अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींना खूप आवडले. अनेक देशांच्या प्रतिनिधींनी नव्या चालीच्या स्वर-लिपीची मागणी केली. पुढे भारतीय संविधान समितीद्वारे २४ जानेवारी, १९५० रोजी रवींद्रनाथ टागोर लिखित ‘भारतभाग्योविधाता’ या गीतातील पहिल्या कडव्याचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करण्यात आला.
यापूर्वी ‘जन-गण-मन...’ या गीताचा अनुवाद सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचे कॅप्टन अबिद अली व मुमताज हुसैन यांनी हिंदी भाषेत सन १९४३ रोजी केला आहे. या ‘शुभ-सुख-चैन की बरखा बरसे, भारत भाग है जागा’ गीताला आझाद हिंद सेनेचे कॅप्टन राम सिंग ठाकूर यांनी चाल दिली आहे. आझाद हिंद सेनेच्या संगीतपथकातील आघाडीचे संगीतकार राम सिंग ठाकूर यांनी ‘कदम कदम बढाते जा, खुशी के गीत गाये जा’ या स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणा गीतालाही चाल दिली आहे. रवीन्द्रनाथ टागोर लिखित या गीताला राम सिंग ठाकून यांनी दिलेली चाल कायम ठेवण्यात आली आहे. मूळ ‘जन-गण-मन...’ गीताची चाल राग अल्हैया बिलावलनुसार रचण्यात आली आहे.
आबिद अली व सुभाषचंद्र बोस यांनी अनुवादित केलेल्या हिंदी भाषेतील राष्ट्रगीताची रचना पुढीलप्रमाणे:
‘शुभ सुख चैन की बरखा बरसे
भारत भाग्य है जागा
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा
द्राविड़, उत्कल, बंगा
चंचल सागर, विंध्य हिमालय
नीला यमुना गंगा
तेरे नित गुण गाएं
तुझसे जीवन पाएं
सब जन पाएं आशा
सूरज बनकर जग पर चमके
भारत नाम सुभागा
जय हो, जय हो, जय हो, जय जय जय जय हो
भारत नाम सुभागा
सबके मन में प्रीत बसाए
तेरी मीठी वाणी
हर सूबे के रहनेवाले
हर मज़हब के प्राणी
सब भेद और फर्क मिटाके
सब गोद में तेरी आगे
गूँथें प्रेम की माला
सूरज बनकर जग पर चमके
भारत नाम सुभागा
जय हो जय हो जय हो
जय हो, जय हो, जय हो, जय जय जय जय हो
भारत नाम सुभागा
सुबह सवेरे पंख पखेरू
तेरे ही गुण गाएं
बास भरी भरपूर हवाएं
जीवन मं ॠतु लाएं
सब मिलकर हिंद पुकारें
जय आज़ाद हिंद के नारे
प्यारा देश हमारा सूरज बनकर जग पर चमके
भारत नाम सुभागा
जय हो, जय हो, जय हो, जय जय जय जय हो
भारत नाम सुभागा’
राष्ट्रगीताचा अर्थ समजून घेताना सुभाषचंद्र बोस यांनी केलेली रचना महत्त्वाची आहे. राष्ट्रगीत गायन करताना स्थिरपणे उभे राहून ताठ मानाने मानवंदना दिली जावी असे निर्देश आहे. पण दिव्यांग व्यक्ती अथवा आजारी व्यक्ती, वयोवृद्ध यांना यामधून सवलत देण्यात आली आहे. राष्ट्रगीत सुरू असताना हालचाल करणे अथवा अपमान दर्शक वागणे हे राष्ट्रध्वज अथवा राष्ट्रगीत सन्मान संहितेचा भंग मानला जातो. सिनेमा, नाट्य अथवा टिव्हीवरील काही प्रसंगामध्ये राष्ट्रगीत वापरण्यात आले तर प्रेक्षकांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहणे अपेक्षित नसते.
अतिशय सुंदर वर्णन असलेले राष्ट्रगीत लिखाणाचा कालावधी आणि राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्याचा काळ या दरम्यान फाळणी होऊन भारत व पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश झाले. त्यामुळे रवीन्द्रनाथ यांनी लिहिलेल्या मूळ गीतातील भौगोलिक उल्लेखांवरून वाद काही वर्षांपूर्वी उद्भवले होते. पण सिंधू नदी आणि सिंध प्रांत असा शाब्दिक बदल करण्यापेक्षा अधिक विचारात्मक भूमिका घेऊन वादासाठी वाद घालणे बाजूला ठेवले जाणे आवश्यक आहे. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज ज्या पद्धतीने संंपूर्ण राष्ट्राचे व गौरवपूर्ण इतिहासाचे प्रतिक म्हणून गौरवाने त्याचा स्वीकार होणे महत्त्वाचे आहे.
जय हिंद! वन्दे मातरम्!
- नम्रता देसाई