कर्मचार्‍यांसाठी खुशखबर!

    दिनांक  15-Aug-2017   
 

 
 
देशभरात कामकरत असलेल्या लाखो कर्मचार्‍यांच्या आयुष्यात महत्त्वाचा बदल घडवणारी घटना नुकतीच घडली आहे. ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी’ अर्थात ‘इपीएफओ’ ने देशभरातील कर्मचार्‍यांना ही खुशखबर दिली आहे. आता जे कर्मचारी ज्या कोणत्याही ठिकाणी काम करत असतील, त्यांनी आपल्या नोकरीचे ठिकाण बदलले तरी त्यांचे भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफचे खाते आपोआप ट्रान्स्फर होणार आहे. कोणत्याही कर्मचार्‍याने आपली नोकरी बदलली की, त्याच्यापुढे एक मोठी समस्या निर्माण होते. ती म्हणजे, आपले पीएफ खाते बदलण्याची किंवा नव्या नोकरीच्या ठिकाणी जुनाच पीएफ खाते क्रमांक द्यायची. परंतु, आता भविष्य निर्वाह निधी कार्यालयानेच यासंबंधी कर्मचारी हिताचा निर्णय घेत कर्मचार्‍यांची ही चिंता मिटवली आहे. गेल्या काही काळापासून भविष्य निर्वाह निधी मिळण्याची प्रक्रिया कर्मचार्‍यांकरिता अधिक सोयीस्कर व्हावी, यादृष्टीने मोठ्या प्रमाणात बदल केले जात आहेत. मात्र, सध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेकदा कर्मचारी आहे त्याच ठिकाणी कायम स्वरूपी काम करण्याऐवजी नव्या संधीच्या शोधात असतात. त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीपुढे सध्या मध्येच बंद होणार्‍या पीएफ खात्यांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. याच समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इपीएफओने थेट खातेच ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नोकरी बदलली की अनेक पीएफ खाती बंद होतात. मग कर्मचारी नव्या कंपनीत आपले खाते नव्याने उघडतात. पण आता पीएफ खात्याच्या नोंदणीसाठी आधारकार्ड सक्तीचे केल्याने हे खाते बंद होणार नाही. पीएफ हे एक कायमस्वरूपी खाते आहे. कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी असे एकच खाते असणे केव्हाही चांगले. त्यामुळे आता जर कोणी नोकरी बदलली, तर अर्जाशिवायच त्याचे पीएफ खात्यातले पैसे तीन दिवसांत ट्रान्सफर होतील. जर कर्मचार्‍याकडे आधार आयडी आणि व्हेरिफाईड आयडी असेल, तर तो देशात कुठेही नोकरीसाठी गेला तरी त्याचे पीएफ खाते ट्रान्सफर होईल. ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे. त्या माध्यमातून कौटुंबिक आणि वैयक्तिक गरजाही पूर्ण केल्या जातात. मात्र, आता नोकरी बदलली तरी पीएफ खाते नव्या नोकरीच्या ठिकाणी ट्रान्सफर होणार असल्याने कर्मचार्‍यांसाठी ही आनंदाची घटना आहे.
 
 
 
अपघाती मृत्यू
 
दररोज वर्तमानपत्रे उघडली, वृत्तवाहिन्यांचे चॅनेल्स लावली अथवा आकाशवाणीवरील बातम्या ऐकल्या तरी देशात कुठे ना कुठे अपघात झाल्याचे आणि त्यात कोणीतरी जीव गमावल्याचे वृत्त असतेच असते. मात्र, दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्याने अथवा चारचाकी गाडीत बसल्यानंतर सीटबेल्ट न लावल्याने मृत्युमुखी पडणार्‍या लोकांची आकडेवारी याआधी कधी समोर आली नव्हती. याचाच अभ्यास करून यामुळे जीव गमावणार्‍या लोकांची संख्या किती, याची आकडेवारी प्रथमच जाहीर करण्यात आली आहे, ज्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. देशातील सर्व राज्यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रस्त्यांवर २०१६ मध्ये सुसाट वेगात दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्याने दररोज २८ दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले, तर सीटबेल्ट न लावल्यामुळे मागील वर्षी दररोज १५ जण अपघातात मृत्युमुखी पडले, हे प्रमाण नक्कीच चिंताजनक असेच आहे. या आकडेवारीतून असेही समोर आले आहे की, अपघातात मृत्युमुखी पडणार्‍या पाचपैकी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने होतो, असे एकूण १० हजार १३५ दुचाकीस्वार गेल्या वर्षभरात ठार झाले. अशा प्रकारे जीव गमावणार्‍यांची संख्या उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे ३,८१८ एवढी आहे. त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये १,९४६, तर महाराष्ट्रात १,११३ जणांना यामुळे जीव गमवावा लागला. हेल्मेट घातल्याने अपघात झाला तरीही ४२ टक्के लोकांचा जीव वाचू शकतो, असे संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या एका अभ्यासातून पुढे आले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे, हे त्यांच्या स्वतःच्या जीवितासह कुटुंबीयांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते. दुचाकी हा वाहतुकीचा सर्वात असुरक्षित पर्याय असल्याचे या आकडेवारीतून समजते, मात्र यामुळे केवळ दुचाकीस्वारांनाच नव्हे तर रस्त्यावरील अन्य लोकांनाही जीव गमावण्याचा धोका असतो. याचसंदर्भात आणखी एक आकडेवारी म्हणजे, चारचाकी गाडीमध्ये सीटबेल्ट न लावल्यामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या होय. २०१६ मध्ये झालेल्या अपघातांमध्ये ५,६३८ लोकांना सीटबेल्ट न लावल्यामुळे जीव गमवावा लागला. ही संख्या उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे २,७४१ एवढी होती. दुसरीकडे पादचार्‍यांसाठीही भारतीय रस्ते सुरक्षित नसल्याचे याच आकडेवारीतून पुढे आले आहे. २०१५ साली १३ हजार ८९४, तर २०१६ मध्ये १५ हजार ७९६ पादचार्‍यांनी देशभरात झालेल्या विविध अपघातांत आपला जीव गमावला आहे. रस्त्यांवर दररोज घडणार्‍या या अपघातांवर नियंत्रण आणणे, हे मात्र वानहचालकांच्याच हातात आहे. देशातील सर्वच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केले आणि स्वतःसह समोरच्या व्यक्तीच्या जीवाचा विचार करून गाड्या चालवल्या, तर या अपघातांच्या संख्येत नक्कीच घट होऊ शकते. त्यामुळे सर्वांनीच सर्वांच्याच सुरक्षेचा विचार करणे गरजेचे आहे. 
 
- महेश पुराणिक