आधुनिक महादेव

14 Aug 2017 16:43:06

१८७१ ते १८८० पर्यंत रानडे पुण्यात सरकारी न्याय खात्यात होते. आधुनिक पश्चिमी मी सुधारणा भारतीय जीवनात, भारतीय जीवनमानाला उपयुक्त ठरेल, अशा रितीने उतरविण्याचं त्यांचं कार्य मुख्यत: याच कालखंडात झालं. या काळात त्यांनी पुण्यात अनेकविध कामं सुरू केली. स्वदेशीचा प्रचार, स्वदेशी उद्योगांना उत्तेजन, शिक्षण प्रसार, नव्या वाङ्‌मयाला उत्तेजन अशा अनेक कामांमुळे पुणे शहरात आणि एकंदर महाराष्ट्रात चैतन्याची एक लाटच उसळली.

 

डॉ. मगनलाल बुच हे भारताच्या इतिहासाचं राजकीय विश्लेषण उत्कृष्टरित्या करणारे एक विद्वान लेखक होते. राजा राममोहन राय यांच्या एकंदर कार्याचं मूल्यमापन करताना डॉ. बुच यांनी त्यांना ‘आधुनिक महादेव’ असं म्हटलं आहे. भगीरथ राजाने आपल्या तपश्चर्येने गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली, पण सहस्रधारांनी कोसळणार्‍या गंगेचा ओघ नि आवेग पृथ्वीला सोसवेना. तेव्हा महादेव शिवाने तो प्रचंड ओघ प्रथम आपल्या मस्तकावर धारण केला आणि सौम्य करून पृथ्वीवर सोडून दिला. तशीच पश्चिमेकडून इंग्रजी सत्तेबरोबर आलेली आधुनिकतेची गंगा सर्वप्रथम राजा राममोहन यांनी आपल्या शिरावर घेतली आणि शांतपणे भारतीय जीवनात सोडून दिली; हा डॉ. बुच यांच्या म्हणण्याचा आशय आहे.

 

अगदी हाच अभिप्राय महाराष्ट्रासाठी न्यायमूर्ती रानडे यांच्या बाबतीत देता येईल आणि त्यांचं नावच मुळी ‘महादेव’ होतं. इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल आणि मद्रास हे सुभे अगोदर जिंकले होते. त्यांचा महसूलही मोठा होता, कारण ते प्रांत संपन्न होते, सुपीक होते. पण, ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीला खरी स्थिरता लाभली, ती महाराष्ट्र म्हणजेच मराठी राज्य जिंकल्यावर. बंगाल आणि मद्रास प्रांतात इंग्रजांना तोडीस तोड उत्तर देणारी कुणीही प्रबळ संघटित शक्ती नव्हती. महाराष्ट्रात, किंबहुना संपूर्ण भारतात मराठेशाही हाच एकमेव टणक खडक होता. १८१८ साली मराठेशाही संपली आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्याला निर्वेधपणे सुरुवात झाली. परकीय आक्रमण भारताला नवीन नव्हतं. अत्यंत भीषण असं परकीय इस्लामी आक्रमण भारतीय समाज अगोदरची कित्येक शतकं अनुभवतच होता. पण, ते आक्रमण अगदी उघड उघड होतं. घोरी, खिलजी, तुघलक, लोदी, बहमनी, मुघल, आदिलशाही, निजामशाही इत्यादी सुलतानांना काबूलपासून रामेश्वरपर्यंत इस्लामी राज्य पसरवायचं होतं. त्यांना हिंदूंचं फक्त राज्यच संपवायचं नव्हतं, तर धर्म, संस्कृती, परंपरा, शेती, उद्योगधंदे, व्यापार हे सगळंच संपवून भारताचं पूर्णपणे इस्लामीकरण करायचं होतं. हे करताना कोणत्याही सुलतानाने आपल्या राज्याचा महसूल वाढेल, व्यापार, उद्योगधंदे, नौकानयन वाढेल, शेतसारा वाढेल याची जराही फिकीर केली नाही. अपवाद फक्त अकबर आणि वजीर मतिक अंबर यांचा.

 

इंग्रजी राज्याचं स्वरूप यापेक्षा फारच भिन्न होतं. इंग्रजांनी उघड-उघड धार्मिक जुलूम तर सोडाच, उघड धर्मप्रचारही केला नाही. त्यांचा सगळा भर व्यापार, उद्योगधंदे यांची वाढ आणि त्यातून वाढत जाणारा महसूल यावर होता. म्हणून तर मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानी असलेलं सुरत शहर हळूहळू माघारत गेलं आणि ईस्ट इंडिया कंपनीचं रोगट हवा नि दलदलींनी भरलेलं मुंबई शहर हळूहळू पुढारत गेलं. मुंबईत धार्मिक स्वातंत्र्याची, मालमत्ता आणि जीवित यांच्या सुरक्षेची हमी होती.

 

इस्लामी सुलतानांनी प्रजेच्या शिक्षणाबिक्षणाची कधी फिकीरच केली नव्हती. ईस्ट इंडिया कंपनीने १८५७ साली मुंबई आणि कलकत्यात विद्यापीठे स्थापन केली. तिथे पश्चिमेप्रमाणेच आधुनिक शिक्षण मिळणार होतं. ते ख्रिश्चन धर्माचं शिक्षण नव्हतं, तर सर्व प्रकारच्या भाषा, कला, शास्त्रं इत्यादींचं शिक्षण होतं नि सर्वधर्मीयांना खुलं होतं. इस्लामी राज्ययंत्र आणि राज्यतंत्र यांच्यात आधुनिकतेचा पत्ता नव्हता. कारण मुळात इस्लामी जीवनातच आधुनिकता नव्हती. या उलट इंग्रजी कंपनी यशस्वी झाली तीच मुळी आधुनिक शस्त्रास्त्रं आणि युद्धपद्धती यांच्या जोरावर.

 

त्यामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आधुनिकता आली. काही ठळक उदाहरणं द्यायची तर सैन्यामध्ये तोफखान्याचा सहभाग वाढला, यंत्राच्या शोधामुळे आणि सुसंघटित टपाल व्यवस्थेमुळे दळणवळण वाढलं आणि रेल्वे आल्यामुळे प्रवासालाही एक सुनियोजित संघटित रूप आलं. कंपनी सरकारच्या या आणि अशा अनेक उपलब्धी या इतक्या थारेपालटी आणि क्रांतिकारक होत्या की, सामान्य भारतीय जनता आश्चर्याने थक्क होऊन, दिङमूढ होऊन पाहातच राहिली होती. अशा त्या अव्वल इंग्रजी आमदनीच्या काळात महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८४२ साली नाशिक जिह्यात निफाड या गावी झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण कोल्हापूर संस्थानात झालं. १८५६ साली पुढच्या शिक्षणासाठी ते मुंबईला आले.

 

१८५७ साली उत्तर भारतात कंपनी सरकारविरुद्ध क्रांतीचा भयंकर वणवा पेटला. तो पेटविण्यात मराठी क्रांतिकारकच अग्रगण्य होते. मात्र, प्रबळ राज्ययंत्र, आधुनिक राज्यतंत्र यांच्या जोरावर इंग्रजांनी ही क्रांती चिरडून टाकली आणि आता कंपनी सरकार हा बाह्य देखावा गुंडाळण्यात येऊन रीतसर व्हिक्टोरिया राणीचं राज्य म्हणजेच ब्रिटिश पार्लमेटंचं राज्य भारतावर सुरू झालं.

 

१८५७ सालीच मुंबई आणि कलकत्ता या ठिकाणी इंग्रजांनी विद्यापीठं स्थापन केली. १८५९ साली मॅट्रिक्युलेशनची पहिली परीक्षा मुंबई विद्यापीठाने घेतली. महादेव गोविंद रानडे हा त्या परीक्षेला बसणार्‍या मूठभर विद्यार्थ्यांपैकी एक. १८६२ साली मुंबई विद्यापीठाने ग्रॅज्युएशनची म्हणजे बी.ए. ची पहिली परीक्षा घेतली. महादेवराव त्यात पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. पुढे १८९४ साली ते एम.ए आणि १८९५ साली एल.एल. बी. झाले.

 

शिक्षण काळात महादेवरावांची तळपती बुद्धिमत्ता पाहून हा विद्यार्थी पुढे फार कर्तबगार होणार, अशी त्यांच्या सर्वच इंग्रज प्राध्यापकांना खात्री होती. १८६१ साली म्हणजे बी.ए. उत्तीर्ण होण्यापूर्वीच त्यांना अध्यापनाचं काम सोपविण्यात आलं होतं. इतिहास, भूगोल, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी विषय ते फारच उत्तम रीतीने शिकवत असत.

 

यापूर्वीच महाराष्ट्रात समाजसुधारणेची चळवळ सुरू झालेली होती. लोकहितवादी, विष्णुशास्त्री पंडित, महात्मा फुले ही मंडळी या कार्यात प्रमुख होती. महादेवराव रानडे १८६२ सालापासून या कार्यात सहभागी झाले. त्यावर्षी त्यांनी ‘इंदुप्रकाश’ या दैनिकातून समाजसुधारणेवर सातत्याने लेख लिहिले. हे लेख नुसतेच वर्तमानपत्राचे लेख नसून अत्यंत अभ्यासपूर्ण प्रश्चांचं सखोल विवेचन करणारे असे होते. रानड्यांचा समाजाचा अभ्यास ग्रंथातून उमटून दिसत होता.

 

१८६५ साली विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना झाली. अकाली वैधत्व आलेल्या महिलाचं जिणं परावलंबी आणि केविलवाणं होत असे. कारण विधवेचा पुनर्विवाह करण्यास हिंदू धर्मशास्त्राची मान्यता नव्हती. १८६९ साली या मंडळाने एका विधवेचा पुनर्विवाह लावून दिला. त्याबरोबर सनातनी लोक खवळले. त्यांनी शंकराचार्यांच्या अनुमतीने विधवा विवाह मंडळाच्या लोकांवर बहिष्कार घातला. इतर सर्व लोक प्रायश्चित घेऊन सुटून गेले. रानड्यांनी मात्र माफी मागण्यास साफ नकार दिला. याचा त्यांना फार त्रास झाला. तो त्यांनी धैर्याने सोसला, पण हे करत असताना आपण कोणीतरी फार मोठे क्रांतिकारक आहोत, त्यागी धीरोदात्त नायक आहोत, हिंदू धर्मशास्त्र आणि त्याला चिकटून बसलेले सनातनी हे कुणी राक्षसी खलनायक आहेत नि ते आपला कसा अनन्वित छळ करत आहेत वगैरे आक्रस्ताळी, कंठाळी भूमिकाही त्यांनी घेतली नाही. उलट त्यांनी श्रुति, स्मृति, पुराण ग्रंथ आणि परंपरा यांचा कसून अभ्यास केला आणि ‘धर्मसुधारणा’ या विषयावर एक अप्रतिम निबंध लिहिला. राजकारण, धर्मकारण, अर्थकारण आणि समाजकारण ही क्षेत्र वरकरणी भिन्न भासली तरी ती एकमेकांशी संबद्धच आहेत. त्यामुळे कुणा एकाचीच सुधारणा करू असं न म्हणता, सर्वांगीण सुधारणेचा विचार केला पाहिजे, हे त्यांचं तत्त्व होतं आणि ते त्यांच्या अफाट अभ्यासातून परिणत झालं होतं.

 

 

१८७१ साली सरकारने रानड्यांची पुण्याला न्याय खात्यात नेमणूक केली. आदल्याच वर्षी म्हणजे १८७० साली पुण्यात ‘सार्वजनिक सभा’ या संस्थेची स्थापना झाली होती. गणेश वासुदेव जोशी ऊर्फ ‘सार्वजनिक काका’ हे तिचे चिटणीस होते. रानड्यांनी त्या संस्थेची सूत्रं आपल्या हाती घेतली. इंग्रजी सत्ता सर्वोच्च शिखरावर असताना आणि स्वत: सरकारी नोकर असताना सनदशीर राजकारण कसं करावं, याचा आदर्श रानड्यांनी सार्वजनिक सभेद्वारे निर्माण केला. इंग्रजी सत्तेमुळे भारताच्या शेती आणि उद्योगधंद्यांची वाताहत होत आहे, त्यासाठी स्वदेशी उद्योगाचा मूलमंत्र लोकहितवादी यांनी अगोदरच दिला होता. पण ‘स्वदेशी’ या तत्त्वाचा प्रचार आणि संघटना कशी करावी, हे रानडे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सार्वजनिक काका’ यांनी दाखवून दिलं.

 

आपला देश दरिद्री आहे आणि इंग्रजी सत्तेमुळे तो आणखीनच दरिद्री बनतो आहे, याची रानड्यांना पूर्ण कल्पना होती. पण, यासाठी केवळ इंग्रजी सत्तेला झोडपणं आणि राजकीय स्वातंत्र्य मिळालं की सगळे प्रश्न सुटतील, असं ते मानत नसत. रानडे म्हणतात, ’’आपण जी राजकीय प्रगती साधू इच्छितो, तिच्यापूर्वी नसली तरी निदान तिच्या बरोबरीने सामाजिक प्रगती झाली पाहिजे, बंधनाऐवजी स्वातंत्र्य, भोळेपणाऐवजी श्रद्धा, ‘बाबावाक्यम् प्रमाणम्’ ऐवजी बुद्धिवाद, असंघटित जीवनाऐवजी संघटित जीवन, असहिष्णुतेऐवजी सहिष्णुता आणि आंधळ्या दैववादाऐवजी मानवी प्रतिष्ठा असा बदल आपल्याला घडवून आणायचा आहे. आपली समाजव्यवस्था अधिक परिपूर्ण बनेल, तर दुष्काळाची अर्धी तीव्रता कमी होईल आणि आपले राजकीय प्रश्र्नही खरेच सोपे बनतील. कोणताही प्रश्र्न केवळ राजकीय वा सामाजिक, आर्थिक वा धार्मिक नसतो. व्यक्तीचाच सर्वांगीण विकास करावयास हवा. यात तिचे हित व परमेश्र्वराचा विजय आहे.’’

 

१८७१ ते १८८० पर्यंत रानडे पुण्यात सरकारी न्याय खात्यात होते. आधुनिक पश्चिमी सुधारणा भारतीय जीवनात, भारतीय जीवनमानाला उपयुक्त ठरेल, अशा रितीने उतरविण्याचं त्यांचं कार्य मुख्यत: याच कालखंडात झालं. या काळात त्यांनी पुण्यात अनेकविध कामं सुरू केली. स्वदेशीचा प्रचार, स्वदेशी उद्योगांना उत्तेजन, शिक्षण प्रसार, नव्या वाङ्‌मयाला उत्तेजन, सनदशीर राजकारणाला सुरुवात, हिंदू धर्माचा पूर्ण अभिमान राखून, मान ठेवून, धर्मशास्त्रांचा अभ्यास करून धर्मसुधारणा अशा कामांमुळे पुणे शहरात आणि एकंदर महाराष्ट्रात चैतन्याची एक लाटच उसळली.

 

या काळात महाराष्ट्रात वारंवार दुष्काळ पडला. असं झालं की, सरकार चौकशी समिती नेमत असे. रानडे या संधीचा पुरेपूर फायदा उठवत. सार्वजनिक सभेतर्फे या चौकशी समितीला अहवाल सादर केला जात असे. हा अहवाल बनवण्यासाठी सार्वजनिक सभेचे प्रतिनिधी गावोगाव फिरत असत. ते फक्त दुष्काळाची माहिती गोळा करून थांबत नसत, तर सरकारने ‘फॅमिन कोड’ अन्वये लोकांना कोणते हक्क देऊ केले आहेत, हे लोकांना सांगत असत. अशा प्रकारे रानड्यांचा सगळा रोख लोकशिक्षण आणि लोकजागृती यांच्यावर होता.

 

एकदा गोपाळ कृष्ण गोखले यांनी रानड्यांना विचारलं की, ’’आपण एवढी निवेदनं, अहवाल सादर करतो. चौकशी समिती ते धड वाचतही नाही. त्यांची उत्तरंही आपल्याला मिळत नाहीत.’’ यावर रानड्यांनी त्यांना लोकशिक्षण आणि लोकजागृतीचं तत्त्व सांगितलं. सरकारी यंत्रणा नेहमी सावकाशच चालते. त्यामुळे १८७६ सालच्या दुष्काळाबाबत रानड्यांनी केलेलं निवेदन आणि सूचना सरकारने १८८४ साली बर्‍याच प्रमाणात स्विकारल्या. रानड्यांच्या सनदशीर राजकारणाची ही फळं होती.

 

लोकमान्य टिळक रानड्यांची थोरवी वर्णन करताना लिहितात, ’’महाराष्ट्र देश म्हणजे त्या वेळा एक थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्यास कोणत्या रीतीने ऊब दिली असता तो पुन: सजीव होईल व हातपाय हलवू लागेल याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी अनेक रीतीने त्यास पुन्हा सजीव करण्याचे दुर्धर कार्य अंगावर घेऊन त्याजकरिता जीवापाड जर कोणी मेहनत केली असेल, तर ती प्रथमत: माधवरावजींनीच (महादेव) केली असे म्हटले पाहिजे व आमच्या मते हेच त्यांच्या थोरवीचे किंवा असामान्य मोठेपणाचे मुख्य चिन्ह होय.’’

 

एखाद्या समाजाचा जेव्हा असा थंड गोळा बनतो तेव्हा त्याला सजीव करण्यासाठी चौकस बुद्धी लागते. शांतपणे एकेका प्रश्नांचा अभ्यास करून त्याच्या सोडवणुकीची उपाययोजना सुचविण्याची विधायक वृत्ती लागते आणि अखेरीस या सगळ्याला संघटित प्रयत्नांची जोड लागते. न्यायमूर्ती रानडे यांच्यापाशी हे सगळे गुण होते. त्यामुळेच राजकीय, लष्करी पराभवाने हतबल आणि इंग्रजांच्या आधुनिक विद्येमुळे स्तिमित होऊन थंड गोळा बनलेल्या महाराष्ट्राला त्यांनी त्याच आधुनिक विद्येच्या आधारे चैतन्यमय बनवले.

 

- मल्हार कृष्ण गोखले

 

 

 

 

 

Powered By Sangraha 9.0