दुधाळ जनावरांचा लाभ मिळण्यासाठी १४ तारखेपासून करता येणार अर्ज

    दिनांक  12-Aug-2017


बुलढाणा : आदिवासी उपयोजनेतंर्गत जिल्हा परिषदेकडून अनुसूचित जमातीच्या आर्थिक विकासासाठी त्यांना ओटीएसपी योजनेनुसार ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे व शेळी गट वाटप करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांचे अर्ज येत्या १४ तारखेपासून पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात जमा करण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा पशु संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच फक्त १५ कुटुंबांनांचा या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचेही पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


एका कुटूंबातील केवळ एकाच व्यक्तीला अर्ज करता येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच बरोबर अर्जदार हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील व दारिद्र्य रेषेखालील असावा, अर्जदाराने किंवा त्याच्या कुटूंबातील सदस्याने या योजनेचा याआधी लाभ घेतलेला नसावा, ही योजना ७५ टक्के शासकीय अनुदान व २५ टक्के बँकेचे अर्थसहाय्य अशा स्वरूपाची असल्यामुळे अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा अशा काही अटी यासाठी घालण्यात आल्या आहेत.अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही १३ सप्टेंबर असून नागरिकांनी पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती यांच्याकडून अर्जाचा नमुना घ्यावा. व योग्य कागदपात्रांच्या पूर्ततेसह अर्ज जमा करावा. तसेच मागील वर्षी अर्ज केले परंतु योजनेचा लाभ न मिळालेल्यांनी पुन्हा एकदा नव्याने अर्ज करावा. या योजनेमध्ये ३ टक्के अपंग व ३० टक्के महिला अर्जदारांसाठी काही अर्ज राखीव ठेवण्यात आल्याचे देखील विभागाकडून सांगण्यात आले आहे.