स्वातंत्र्यदिनी गावागावात होणार ग्रामसभा

    दिनांक  11-Aug-2017


बुलडाणा : ' ग्रामपंचायतीचे कर्तव्य, जबाबदाऱ्या, अधिकार याची माहिती गावातील जनतेला व्हावी, तसेच ग्रामसभेला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी येत्या १५ तारखेला स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे' असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका बैठकीत त्या बोलत होत्या. तसेच शासनाच्या योजना, परिषदेची कामे, ग्रामपंचायतीचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, सामान्य नागरिकांचे हक्क यासंबंधी संपूर्ण माहिती यावेळी गावातील जनतेला दिली जावी, असे देखील त्या म्हणाल्या आहेत.


सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वातंत्र्य दिनाला १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. ग्रामसभा ही पंचायत राज व्यवस्थेतील महत्वाची यंत्रणा आहे. या ग्रामसभेमध्ये विविध १४ विषयांवर चर्चा करण्यात यावी. ग्रामसभांना ग्रामसभा सदस्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे. दिव्यांग बांधवांनी आपली नावे आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करीता ग्रामसभेमध्ये द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


विशेष म्हणजे दिव्यांग नोंदवहीनुसार चर्चा तसेच दिव्यांगाची नाव नोंदणी करणे, राज्य शासनाच्या सेवा हमी कायद्याच्या २०१५ च्या शासन निर्णयाचे वाचन करणे, आपले सरकार सेवा केंद्राच्या पोर्टलवरून देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांची माहिती देणे, आपले सरकार सेवा केंद्र, यंदाच्या ग्राम विकास आराखड्यास मान्यता घेणे व ग्रामपंचायतीच्या विकासाच्यादृष्टीने ग्रामपंचायत विकास आराखडा याबाबत आढावा घेणे, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०१७-१८ चे वार्षिक नियोजन आराखडे व लेबर बजेटला मंजूरी घेणे या सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जावी, असे त्या म्हणाल्या.