देर आये दुरुस्त आये

    दिनांक  10-Aug-2017   

 

नुकतेच राजस्थानच्या शैक्षणिक विभागाने इतिहासाच्या पुस्तकातील चुकीची दुरुस्ती केली. इतके दिवस शालेय पुस्तकांमधून मुलांना असे शिकवले जात होते की, हलदीघाटीची १५७६ मधील लढाईत, महाराणा प्रतापला अकबरशी तह करावा लागला. आता ते दुरुस्त करून, महाराणा प्रतापने अकबरला या लढाईत हरवले, व अकबरला युद्धभूमीतून माघार घ्यावी लागली असे लिहिले आहे.

दुरुस्तीचे कारण असे आहे की, या लढाईनंतर अकबरने सहा वेळा महाराणा प्रताप वर हल्ला केला. अकबर जर जिंकला असता, तर त्याला परत परत हल्ला करावा लागला नसता. शिवाय या लढाई नंतर, महाराणा प्रतापने हलदीघाटी जवळच्या जमिनी दान दिल्याचे ताम्रपट उपलब्ध आहेत. महाराणा प्रताप हरला असता, तर त्याने इथल्या जमिनी कशा काय दिल्या असत्या असा प्रश्न उपस्थित होतो. हे पुरावे लक्षात घेऊन पुस्तकांमध्ये योग्य ती दुरुस्ती करण्यात आली आहे.   

त्यानंतर लगेचच महाराष्ट्राच्या शैक्षणिक विभागाने शालेय पुस्तकात दुरुस्त्या केल्या. इतिहासाच्या पुस्तकांमधून मुघल साम्राज्यावर दिलेला भर कमी करून, स्थानिक मराठा साम्राज्यावर भर दिला आहे. या शिवाय “अकबर हा महान राजा होता, व तो सहिष्णू राज्यकर्ता होता” ही चूक दुरुस्त करून, “अकबरने संपूर्ण भारत आपल्या अधिपत्याखाली आणायचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजींसारख्या राजांनी विरोध केला.” असे सत्य मांडले आहे.

महाराष्ट्र शासनाने व राजस्थान शासनाने सत्य इतिहास शिकवण्याच्या बाबतीत उचललेले पाऊल अतिशय स्तुत्य आहे. त्याबद्दल दोन्ही शासनांचे हार्दिक अभिनंदन! नवीन पिढीला आपला उज्ज्वल इतिहास शिकवणे ही स्वाभिमानी तरुण निपजण्याची पहिली पायरी आहे. हा स्वाभिमान प्रत्येक क्षेत्रात उमलतांना निश्चितपणे दिसेल, व भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल यात शंका नाही.

ही दुरुस्ती केवळ राज्यस्तरीय न राहता, भारतातील इतर राज्यात जिथे महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी शिकवले जातात तिथे तिथे प्रतिबिंबित व्हावी ही अपेक्षा. 

या निमित्ताने इतिहासाच्या पुस्तकातील आणखी दोन घोड चुका दुरुस्त करायाला हव्यात.

पहिली चूक आहे - महान सिकंदर आणि पंजाबचा राजा पुरू यांच्या लढाई बद्दलचा. शिकवला जाणारा इतिहास असा आहे - इ.स. पूर्व ३२६ मध्ये ग्रीक सिकंदरने, इजिप्त, सायरीया, आशिया मायनर, व पर्शिया जिंकले आणि  झेलम नदी ओलांडून पुरू राजावर आक्रमण केले. झेलमच्या तीरावर पुरूला हरवले. जेंव्हा पुरूला बंदी करून सिकंदरच्या समोर आणण्यात आले, तेंव्हा सिकंदरने त्याला विचारले, “बोल, तुझ्याशी कसा व्यवहार करायला हवा?” तेंव्हा पुरू राजाने सांगितले की, “एका राजाने दुसऱ्या राजाशी जसा व्यवहार करावा, तसाच.” पुरूच्या निर्भयतेवर व लढाईतील शौर्यावर खुश होऊन सिकंदरने त्याचे राज्य त्याला परत दिलेच शिवाय आणखी जास्त भूभाग पुरूला दिला. आणि त्या नंतर तो ग्रीसला परत निघून गेला!

ग्रीक इतिहासकरांनी लिहिलेला हा संपूर्ण प्रसंग हस्यास्पद आहे. जग जिंकायला निघालेला, गावे जाळून राज्य बळकावणारा, क्रूर स्वभावाचा सिकंदर असे जिंकलेले राज्य परत कसा देऊन टाकेल? तो जिथे जिथे जिंकला तिथे तिथे त्याने आपले टोलेमी, निकेटर, पोंटस् इत्यादी सरदार नेमले.  इथे सुद्धा त्याने तसेच केले असते.

तक्षशिलेचा राजा अंभी याला सिकंदरने प्रचंड नजराणा पाठवून त्याने पुरू कडून लढू नये अशी व्यवस्था केली होती. पुरूच्या राज्यासाठी त्याने आधीच २५,००० किलो सोने मोजले होते. ते तो का बरे वाया जाऊ देईल?  

ही लढाई होती घोड्यावर स्वार असलेल्या सडपातळ बांध्याच्या ५’४” उंच सिकंदर व हत्तीवर स्वार असलेल्या भारदस्त, सात फुट उंच पुरुषोत्तम राजाची. या लढाईत सिकंदरचा आवडता घोडा मारला गेला. जखमी सिकंदरला त्याचे सेवक उचलून घेउन गेले. सिकंदरचा इथे सपशेल पराभव झाला.

पुरू राजाच्या सैन्यातील ८० हत्ती, ग्रीक सैन्याने प्रथमच पहिले होते. लढाऊ हत्तींच्या या पहिल्या सामान्यानेच ते गारद झाले होते. सिकंदरला पुढे गंगेपर्यंत आपले राज्य प्रस्थापित करायचे होते. पण मगधच्या नंद  राजाच्या सैन्यात ६००० हत्ती आहेत हे ऐकून सिकंदरचे सैन्य गलितगात्र झाले.

झेलमची लढाई जुलै मध्ये झाली. या लढाईत जखमी झालेला सिकंदर मेला आहे अशी अफवा त्याच्या सैन्यात उठली. तेंव्हा सिकंदरला बाहेर आणून तो जिवंत असल्याचे सैन्याला दाखवावे लागले होते. याच दरम्यान सिकंदरने काश्मीरचा राजा अभिसार याला भेटायला बोलावले. पण अभिसारने सरळ नकार दिला! सिकंदर जर पंजाबचे राज्य जिंकला असता तर अभिसारची काय टाप होती जगत् जेत्याला नाही म्हणायची? या नकारातून हे स्पष्ट होते की सिकंदर पंजाबात हरला होता. ऑगस्टच्या राखी पौर्णिमेला, सिकंदरने आपली बायको रोक्सना हीला राखी घेऊन पुरूकडे पाठवले. त्यातला संदेश असा होता की, “माझ्या सौभाग्याचे रक्षण कर!”. कोणता जिंकलेला राजा अशी लाजिरवाणी गोष्ट करेल? सप्टेंबर मध्ये सिकंदरने इथूनच माघार घेतली.

भारतीय इतिहासातील सिकंदरच्या धड्याचे नाव “तो आला, त्याने पहिले, आणि तो पळून गेला!” असे असले पाहिजे किंवा “सिकंदर आणि महान पुरू” असे असले पाहिजे.

दुसरी चूक या पेक्षा प्राचीन आहे. इ.स. पूर्व १५०० मधली. शिकवला जाणारा इतिहास असा आहे – इ.स. पूर्व ३००० पासून इ.स. पूर्व १५०० पर्यंत सिंधू नदीच्या तीरावर हरप्पन संस्कृती भरभराटीस आली होती. नगरे बांधणारी, नौका बांधून समुद्रातून व्यापार करणारी, उद्योगी, नागरी, प्रगत, युरोपपेक्षा मोठे क्षेत्रफळ व अधिक लोकसंख्या असलेल्या संस्कृतीवर युरोपियन टोळ्यांनी हल्ला करून मारून अथवा हाकलून लावले. हिंदूकुश सारख्या पर्वतमय भागातून हे लोक घोडागाडीतून आले. इथे आल्यावर त्यांनी आपली संस्कृत भाषा विकसित केली. सगळ्या नद्या-पर्वतांना नवीन संस्कृत नावे दिली. वेद, उपनिषदे, शास्त्रे, रामायण, महाभारत, पुराण वगैरे सगळ लिहिले. तोपर्यंत गौतम बुद्धाचा जन्म झाला.  

काहीतरी करून “आर्यांना” युरोप मधून भारतात आणणे १९ व्या शतकातील युरोपीय राज्यकर्त्यांची राजकीय गरज होती. त्याने एका दगडात अनेक पक्षी मारता येत होते. एक तर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नवतरुणाला “तू इथला भूमिपुत्र नाहीस.  तू पण आमच्या प्रमाणे इथे परप्रांतातून आलेला आहेस.” असे म्हणता येत होते. इंग्रजांशी लढणाऱ्या भारतीय नवतरुणाच्या स्वाभिमानाचे खच्चीकरण करता येत होते. युरोपिय लोक भारतीयांपेक्षा फार पूर्वी पासून अधिक प्रगत होते हे दाखवता येत होते. “संस्कृत व वेद ही आम्ही गोऱ्यानीच तुम्हाला दिलेली भेट आहे” असेही म्हणता येत होते. शिवाय भारतीयांमध्ये आर्य – द्रविड अशी फुट पाडणे सोयीचे होते. 

पण “आर्यांना” बाहेरून भारतात आणायच्या खटाटोपात त्या सिद्धांतात अनेक त्रुटी दिसतात -

सिंधू खोऱ्यातून हाकललेले लोक दक्षिणेत ‘द्रविड’ म्हणून स्थायिक झाले. दक्षिण भारतात इ.स. पूर्व १५०० पर्यंत मनुष्य वस्ती नव्हती असे म्हणणे फारच धाडसाचे होते. मग द्रविड लोकांनी कुणाला विस्थापित केले?

शेकडो वर्ष होऊन सुद्धा अजूनही अमेरिकेतून Red Indians ना, Canada मधून Inuits ना, ऑस्ट्रेलिया मधून Aboriginals ना हकलून देणे जमले नाही. मग ‘आर्यांना’ किंवा ‘द्रविडांना’ ते कसे काय जमले?

अजूनही अमेरिकेत राज्यांना व नद्यांना Red Indian नावे दिसतात. जसे Arizona, Idaho, Illinois, Iowa, Wisconsin, Mississippi, Missouri इत्यादी. तशी ‘आर्यांच्या’ आधीची नावे कुठे आहेत?

एक बायबल लिहायला १५०० वर्ष लागली. मग बायबलच्या शेकडो पट मोठे वेद, ब्राह्मण, उपनिषदे, सूत्रे, शास्त्रे, रामायण, महाभारत, पुराण वगैरे १,००० वर्षात कसे काय लिहून झाले?

हे आणि असे अनेक प्रश्न असून सुद्धा हा आर्यन आक्रमणाचा सिद्धांत शाळेत शिकवला जातो, त्या मधेही दुरुस्ती व्हायला हवी.

“बाहेरच्यांनी आक्रमण केले आणि त्यांनी भूमी जिंकली” हा आक्रमकांनी लिहिलेला खोटा इतिहास दुरुस्त करायलाच हवा. त्या बरोबरच संपूर्ण युरोपला त्राही त्राही करणाऱ्या हुणांना समुद्रगुप्त राजाने हरवले हे सुद्धा शिकवायला हवे. आणि मित्तांनी, कस्सी, छोल आदि भारतीय राजांनी बाहेरच्या जगात आपली राज्ये वसवलेला इतिहास सुद्धा शिकवायला हवा. 

 

References - 

 India cultures quarterly, Volume 25, School of Research, Leonard Theological College, 1968  ... They themselves took her to Porus and there she performed the ceremony of raksha bandhan ...

 

- दिपाली पाटवदकर