मत्स्यकास्तकारांना मत्स्यजिरे खरेदीसाठी उपलब्ध

    दिनांक  05-Jul-2017

 

अलीकडे शेततळ्यांमधील मत्स्य उत्पादनाचे प्रमाण वाढत आहे. राज्यामध्ये भुजलाशयीन मत्स्यव्यवसायात मोठ्या प्रमाणात वापर होणारे भारतीय प्रमुख कार्प कटला, रोहु व मृगळ यांचा प्रजनन काळ वर्ष २०१७-१८साठी सुरू झाला आहे. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यामधील कोराडी येथे मत्स्यबीज उत्पादन केंद्रावर मत्स्यजीरे खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.

राज्यामध्ये १९५५ साली रायगड जिल्ह्यात खोपोली येथे पहिले मत्स्यबीज केंद्र स्थापन करण्यात आले. १९५७-५८ मध्ये प्रेरित प्रजननाचे प्रयोग यशस्वी झाल्यापासून मत्स्यबीज उत्पादनात राज्याने भरीव प्रगती केली आहे. मत्स्यबीजाची गरज भागविण्यास पूर्वी पश्चिम बंगालमधून प्रमुख कार्प जातीचे बीज आयात केले जात असे. १९९०-९१ पासून महामारी क्षत रोग प्रतिबंधक उपाय योजनेचा भाग म्हणून कलकत्त्याहून मत्स्यबीजाची होणारी आयात शासनाने बंद केली. त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावर मत्स्यबीज विक्री केली जात आहे. राज्यातील मत्स्य उत्पादनात विदर्भ विभागाने गेल्या वर्षी ५० टक्के वाटा उचलला आहे.

सध्या मत्स्यबीजाचा मत्स्यजिरे हा प्रकार विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. मत्स्यबीजाच्या मागणीसाठी सहायक आयुक्त स.ई.नायकवडी यांच्या कार्यालयात पूर्वनोंदणी झाल्यावर मत्स्यजिरे उपलब्ध करण्यात येत आहेत.

वर्ष २०१७-१८साठी २०१४-१५पासून अंमलात आलेले दर कायम ठेवण्यात आले आहेत.

वर्ष २०१७-१८साठी मत्स्यजिरे प्रकारातील मत्स्यबीजाचा दर पुढीलप्रमाणे -

  • मत्स्यबीजाचा आकार ७ ते १२ मि.मी - १५०० रुपये प्रति लाख

  • मत्स्यबीजाचा आकार १२ ते १५ मि.मी - २०० रुपये प्रति हजार

  • मत्स्यबीजाचा आकार २५ ते ५० मि.मी (अर्ध बोटुकली) - ३०० रुपये प्रति हजार

  • मत्स्यबीजांच्या पॅकिंगसाठी प्रति बॅग १५ रुपये असा दर आकारला जाणार आहे.

मच्छीमारी सहकारी संस्था, जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थांचा संघ, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक मत्स्यकास्तकार यांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज केंद्रामधून मत्स्यबीज खरेदी करणे बंधनकारक आहे, असे आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मत्स्यबीज उत्पादन केंद्राने स्पष्ट केले आहे.