अतुल भोसले यांची पंढरपूर संस्थानच्या अध्यक्षपदी निवड

    दिनांक  03-Jul-2017

 


मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समस्त वारकरी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कारभार पाहण्यासाठी राज्य सरकारने नव्या समितीच्या स्थापना केली आहे. या ९ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी कऱ्हाडचे भाजप नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असलेले मंदिर संस्थानाला आत स्वतंत्र समिती मिळाली आहे.


विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानाच कारभार सरकारच्या ताब्यात दिल्यापासून मंदिराला स्वतंत्र समिती नेमण्यात आली नव्हती. त्यामुळे गेल्या ४ वर्षांपासून मंदिर संस्थान जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात होते. त्यामुळे जिल्हाधिकारी हेच समितीचे सभापती होते. या विरोधात भाविकाकडून नव्या समितीच्या स्थापणेसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना ३० जूनपर्यंत सरकारने समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करावी, असे आदेश दिले होते.


न्यायालयाच्या या आदेशानुसार समितीच्या अध्यक्षपदासाठी एमआयटीचे डॉ. विश्वनाथ कराड, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, गहनीनाथ औसेकर महाराज तसेच भोसले यांच्या नावांची चर्चा केली जात होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षाला विश्वासात घेत भोसले यांच्या नावाला आपली पसंती दिली. याच बरोबर विधानसभा सदस्य रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे यांच्यासह अन्य ८ सदस्यांची नियुक्ती केली आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या अध्यक्षांसाठी देखील समितीत सदस्य पद राखून ठेवण्यात आले आहे. पालिकेचे अध्यक्ष हे देखील यापुढे समितीच्या सदस्यपदी असणार आहेत.

 

कोण आहेत अतुल भोसले ?

भोसले हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत. तसेच भोसले हे राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई आहेत, विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांची कन्या अतुल भोसले यांची पत्नी आहे .