दुर्ग भ्रमंती - पन्हाळगड

28 Jul 2017 16:10:15

 

कोकण आणि देश यांच्या मध्यावर वसलेला एक विस्तीर्ण किल्ला अशी पन्हाळगडाची ओळख आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात विशिष्ठ महत्त्व असलेल्या पन्हाळगडाने राजधानीचा देखील मान मिळवलेला आहे. आजच्या दिवशी पन्हाळगडावर लोकवस्ती आहे, त्यामुळे गडावर वाहन घेवून जाता येते. पन्हाळगडावर पोहचण्यासाठी कोल्हापूरहून एस. टी. बस आहेत.

चार दरवाजामार्गे : कोल्हापूरहून एस. टी. बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजामार्गे गडावर जाते. या वाटेने गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते.

तीन दरवाजामार्गे : शिसे ओतून तयार करण्यात आलेल्या गडावरील या दरवाज्यास तीन दरवाजा असे म्हणतात. पन्हाळगडावर प्रवेश करण्यासाठी दुसरा मार्ग म्हणून या दरवाज्याचा वापर केला जातो.

 

पन्हाळगडाचा इतिहास :

प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत इ. स. पू. तिसर्‍या शतकात पन्हाळगड बांधण्यात आला. शिलाहर राजा भोज याचे पन्हाळगड हे राजधानीचे ठिकाण होते. असे म्हणतात की, पन्हाळगड हा पूर्वी नाग जमातीतील लोकांच्या ताब्यात होता. पन्हाळगडाचे नाव ‘पन्नग्नालय’ असे होते. पराशर मुनींनी याठिकाणी तपश्चर्या केली, त्यामुळे यास "पराशराश्रम" या नावानेही ओळखले जात असे. तसेच काही आख्यायिकानुसार या गडास "ब्रम्हशैल’ आणि "पद्मालय" असे ही म्हटले जात असे.

पन्हाळगड यादव, यादवांनंतर आदिलशाही यांच्या ताब्यात होता. त्यानंतर पन्हाळगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वातील स्वराज्यात आला. सिद्दी जौहरचा पन्हाळगडास वेढा आणि त्यासंबंधीचा इतिहास तर आपल्याला माहिती आहेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात पन्हाळगडावर मुघलांचा राबता होता. पुढे काही काळ पन्हाळगडावर मुघल आणि मराठेशाही यांच्यामध्ये आलटून पालटून सत्ता राहिली. शेवटी इ. स. १७०५ मध्ये महाराणी ताराबाई साहेब यांनी पन्हाळागडावर कोल्हापूरची दुसरी गादी तयार केली. पन्हाळगड कोल्हापूर संस्थांनाची राजधानी म्हणून ओळखला जावू लागला. त्यानंतर जवळपास इ. स. १७८२ पर्यंत "पन्हाळागड" हे कोल्हापूरच्या राजधानीचे ठिकाण होते. या ठिकाणी पन्हाळगड पाहत असताना गडावरील वाटाडे (गाईड) आपल्याला पन्हाळगडाबाबत बरीच माहिती देतात.

पावन खिंडीतील लढाई : इ. स. १६६० च्या मार्च महिन्यात महाराज गडावर असताना, सिद्दी जौहरने पन्हाळगडास वेढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. एका रात्री ६०० मावळ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निसटले. त्यावेळी त्यांच्या बरोबर वीर बाजीप्रभू देशपांडे होते. त्यावेळी बाजी प्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत केलेला पराक्रम आपल्या सर्वाना माहित आहेच. त्यावेळी या घोड खिंडीची पावन खिंड झाली.

 

पन्हाळगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

चार दरवाजा : पन्हाळगडावर येत असताना गडाच्या पूर्वेस चार दरवाजा आहे. हा दरवाजा इंग्रजांनी पाडलेला आहे. त्यामुळे सध्या त्याचे अवशेष शिल्लक आहेत. येथेच ‘शिवा काशीद’ यांचा पुतळा देखील आहे.

तीन दरवाजा : पन्हाळगडाच्या पश्चिम दिशेस तीन दरवाजा आहे. याला कोकण दरवाजा असे देखील म्हणतात. या दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. शिसे ओतून तयार करण्यात आलेल्या या दरवाज्यावर नक्षीकाम केलेले आहे. याच ठिकाणी विष्णू चौक आणि विष्णू तीर्थ आहे. 

अंधारबाव (श्रुंगार बाव) : तीन दरवाज्याजवळच एक इमारत आहे. या इमारतीमध्ये खालच्या बाजुस सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. या इमारतीमध्ये बाहेर जाण्यासाठी खिडकीसारखा चोर दरवाजा आहे.

राजवाडा : महाराणी ताराबाई यांनी इ. स. १७०८ मध्ये राजवाडा बांधला. पन्हाळगडावर लोकवस्ती असल्यामुळे आजच्या दिवशी या राजवाड्यामध्ये नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल आणि हॉस्टेल आहे.

महालक्ष्मी मंदिर : राजवाड्यातून बाहेर पडल्यानंतर समोरील बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे पन्हाळगडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे.

शिव मंदिर : छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेले, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर महाराणी ताराबाई यांच्या राजवाड्या समोर आहे. या मंदिराच्या मागील बाजूस गुहा आहेत.

सज्जा कोठी : राजवाड्यापासून पुढे गेल्यानंतर सज्जाकोठी ची इमारत दिसते. सज्जा कोठीची ही इमारत दोन मजली आहे.


अंबारखाना : असे म्हणतात की, अंबारखाना हा पूर्वी बालेकिल्ला होता. पन्हाळगडावरील वाटाडे, एक कथा सांगतात, त्यानुसार या अंबरखान्यामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत.

सोमेश्वर (सोमाळे) तलाव : पन्हाळगडावरील पेठेजवळ असलेल्या तलावास सोमेश्वर तलाव असे म्हणतात. या तलावाच्या काठावरती सोमेश्वराचे मंदिर आहे.

रामचंद्रपंत अमात्य समाधी स्थळ : सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यानंतर, आपल्याला जवळच रामचंद्र पंत अमात्य आणि त्यांच्या पत्नीची समाधी दिसते.

रेडे महाल : पन्हाळगडावर एक पागा आहे, त्यास रेडे महाल म्हणतात. पन्हाळगडावर येणाऱ्या खास लोकांच्या राहण्याची व्यवस्था येथे करण्यात येत असे, असे म्हटले जाते. परंतु याठिकाणी काही काळ गुरे बांधली जात, त्यामुळे यास इमारतीस रेडे महाल हे नाव देण्यात आले.

संभाजी मंदिर : रेडे महालाच्या पुढे एक छोटे मंदिर आहे. छत्रपती राजाराम महाराजांचे युवराज संभाजी राजे यांचे हे मंदिर आहे. मंदिरामध्ये तसा शिलालेख आहे.

धर्म कोठी : संभाजीच्या मंदिरापुढे गेल्यानंतर आपण धर्मकोठीजवळ येवून पोहचतो. याठिकाणी राज्यांकडून गोरगरीब आणि गरजू लोकांना दानधर्म केला जात असे.

पुसाटी बुरुज : पन्हाळगडाच्या पश्चिम बाजूस पुसाटी बुरुज आहे. त्यास पिछाडी बुरुज असे देखील म्हणातात.

नागझरी : पन्हाळगडावर बारमाही पाण्यासाठी दगडात बांधलेले एक कुंड आहे, या कुंडाला नागझरी असे म्हणतात. या कुंडाजवळ जवळच हरिहरेश्वर आणि विठ्ठल मंदिर आहे.

दुतोंडी बुरुज : पन्हाळगडावरील न्यायालयाजवळ दोन्ही बाजूंनी पायर्‍या असलेला एक बुरुज आहे, त्याला दुतोंडी बुरुज असे म्हणतात. या बुरुजापासून काही अंतरावर असलेल्या बुरुजाला दौलत बुरुज म्हणतात.

राजदिंडी : पन्हाळगडावरून खाली उतरणाऱ्या वाटेस राज दिंडी असे म्हणतात.  याच वाटेचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराज सिध्दी जौहरच्या वेढ्यामधून निसटले होते. त्यामुळे पावनखिंडीमार्गे  पन्हाळगड ते विशाळगड जाणाऱ्या या मार्गावर गिरीप्रेमी आजही भ्रमंती करत असतात.

याशिवाय पन्हाळगड आणि परिसरात शिवा काशीद स्मारक, कलावंतिणीचा महाल, साधोबा दर्गा, मोरोपंत ग्रंथालय, मसाई पठार इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.

पन्हाळगडावर आजच्या परीस्थित्त लोकवस्ती जास्त आहे. त्यामुळे गडाचा खरा इतिहास झाकोळत चालला आहे. तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आणि इतर सरकारी कार्यालये यामुळे गडास एखाद्या गावासारखे रूप आलेले आहे. परंतु गडावरील काही ठराविक वास्तू आजही आपणास तेथे घडलेल्या इतिहासाची आठवण करून देतात. आणि पन्हाळगडावर येणारे पर्यटक पाहता, येथील स्थानिक लोकांना एक प्रकारे रोजगाराचे साधन उपलब्ध होत असल्यामुळे, स्थानिक लोक देखील गडाची उत्तमरीत्या देखभाल करत आहेत. त्यामुळे पन्हाळगडासारख्या ऐतिहासिक वास्तूवर भ्रमंती करून आपणही हा ऐतिहासिक आनंद घेणे, आवश्यक आहे.

 

– नागेश कुलकर्णी

Powered By Sangraha 9.0