जिल्हास्तरीय निवडणूकीत कोणीही मतदान यंत्रात छेडछाड केली नव्हती

    दिनांक  25-Jul-2017

 

बुलडाणा : फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत चुकीच्या पद्धतीने मतदान झाल्याची तक्रार एका अपक्ष पक्ष उमेदवाराने केली होती. जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावात मतदान केंद्र क्रमांक ५७/६ मधील एका यंत्रात बिघाड झाला होता. मतदान यंत्रात कोणीतीही छेडछांड  करण्यात आलेली नाही. मतदान प्रक्रियेत वापरलेली इतर सर्व मतदान यंत्र योग्य होती. सर्व ठिकाणी प्रत्येक मतदान यंत्राची तपासणी करून ती सर्व यंत्र योग्य असल्याची खातरजमा करण्यात आली होती. त्यानंतरच मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

याविषयी दिलेल्या स्पष्टीकरणात जिल्हाधिकारी म्हणाले, याच ठिकाणी पंचायत समिती मतदारसंघाकरीता उपयोगात येणाऱ्या मतदान यंत्रात कुठलाही बिघाड नव्हता. तसेच जिल्ह्यात उर्वरित १६९० मतदान केंद्रांमधून अशाप्रकारची कुठलीही तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली नाही. सुलतानपूरच्या प्रकरणाविषयी कुठलीही निवडणूकीविषयक याचिका दाखल झालेली नाही, असेही पत्रकात नमूद आहे.

 

आशा अरुण झोरे या अपक्ष निवडणूक लढवत होत्या. मतदान करताना इतर पक्षासमोरील चिन्हांवर लाइट लागत असल्याची तक्रार संबंधित मतदान केंद्र अधिकाऱ्यांना त्यांनी केली होती. त्याचवेळी मतदान प्रक्रिया तात्पुरती स्थगित करून शहानिशा करून दुसरे मतदान यंत्र देण्यात आले होते. या मतदान केंद्रावर फेरमतदान होऊन २३ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले होते.