अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या २० जणांवर गुन्हे दाखल

    दिनांक  25-Jul-2017

 

बुलढाणा : राज्यात शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पीककर्ज माफीची घोषणा राज्य सरकारने केली असतानाच बुलढाण्यात अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या १७ प्रकरणांत विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी धडक कारवाई केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ नुसार दाखल झालेल्या १७ प्रकरणांची शहानिशा करून त्यातील १३ प्रकरणात २० सावकार दोषी आढळले आहेत. त्यांनी गहाण ठेवलेल्या शेतजमिनी मूळ मालकांना परत करण्यात आल्या आहेत.

 

जळगांव-जामोद, शेगांव, धामणगांव, चिखली, अंढेरा, डोणगांव  येथील पोलीस स्थानकांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. अवैध सावकारांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध सावकारी तक्रारी प्रकरणांचा आढावा घेतला. सर्व दोषींवर दाखल झालेल्या गुन्ह्यांनुसार पुढील कारवाई होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.