कॉंग्रेसी राजकारण आणि कर्माचा सिद्धांत

    दिनांक  21-Jul-2017    

या निवडणुकीत जर तुमचे ८ आमदार फुटतात, तर प्रत्यक्ष मध्यावधी वगैरे झाल्यास किती फुटतील याचा विचार करण्याचा जणू इशाराच भाजपने कॉंग्रेस-राष्ट्रवादीला दिला आहे. कॉंग्रेससारख्या एकेकाळच्या बलाढ्य पक्षाला आपण निवडणुकीत नेस्तनाबूत करू शकतोच, पण राजकीय डावपेचांमध्येही त्यांच्याच पद्धतीने त्यांना मात देऊ शकतो, असा आत्मविश्वास आज भाजपमध्ये निर्माण झाला असून आणि तो त्यांच्या कृतीतून स्पष्टपणे दाखवून देणारी ही घटना आहे. हे श्रेय जसं राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे जातं, तसंच ते राज्यात अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातं.

गुरुवार, दि. २१ जुलै रोजी दुपारपर्यंत राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा अंतिमनिकाल जाहीर झाला आणि देशभरात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एकच जल्लोष केला. भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते रामनाथ कोविंद यांची तब्बल सव्वातीन लाखांहून अधिक मताधिक्याने निवड करण्यात आली. या ऐतिहासिक घटनेचे राष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारे विश्लेषण सुरू झाले. हे सुरू असताना इकडे महाराष्ट्रात मात्र वेगळ्याच गोष्टीचं विश्लेषण सुरू होतं. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्यांनी केलेल्या मतदानाची आकडेवारी हाती येताच यातील विरोधी पक्षांच्या सदस्यांची संपुआच्या उमेदवार मीरा कुमार यांना अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाल्याचं आणि ती मतं रामनाथ कोविंद यांना मिळाल्याचं लक्षात आलं आणि चांगलीच खळबळ उडाली. मंत्रालय परिसरात लागलीच कोणाची किती मतं फुटली असावीत, याची आकडेमोड सुरू झाली. असाच पत्रकारांचा एक गट मंत्रालयाबाहेर संध्याकाळच्या चहासोबत या आकडेमोडीचा आस्वाद घेत होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रमेश कदमांचं एक घोषित आणि आणखी एक अघोषित अशी दोन मतं फुटली असल्यावर एकमत झालं. राहिलेली ६ कॉंग्रेसची यावरही एकमत झाल्यावर ‘ती नेमकी कोणाची’ यावर चर्चा सुरू झाली. मग नितेश राणे, कालिदास कोळंबकर वगैरे करत आकडा ५ वर पोहोचला. उरलेलं ‘शेवटचं एक मत कोणाचं?’ या रहस्याचा काही केल्या उलगडा होईना. तेवढ्यात त्यातील एकाने ते मत बहुधा राधाकृष्ण विखे-पाटलांचं असावं, अशी टिप्पणी केली आणि चर्चेच्या अखेरीस एकच हास्यकल्लोळ उडाला.

यातील विनोदाचा भाग बाजूला काढून महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत या घटनेचा विचार केला, तर त्याचं गांभीर्य लक्षात येईल. जगातील महासत्ता मानल्या गेलेल्या अमेरिकेने आशियात आखाती देशांमध्ये तेलाच्या हव्यासातून व वर्चस्वाच्या लालसेने अशांततेला खतपाणी घातलं आणि कालांतराने त्यातूनच वर आलेला इस्लामी दहशतवादाचा भस्मासूर अमेरिकेवरच उलटला. आज तशीच काहीशी अवस्था भारतात विशेषतः महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाची झाली आहे. एकेकाळी अनिर्बंध सत्ता लाभलेली असताना ती सत्ता आणखी वाढविण्याच्या आणि टिकविण्याच्या हव्यासापोटी ‘बेरजेचं राजकारण’ वगैरे गोंडस नावं देऊन त्याचं रूपांतर फोडाफोडीच्या राजकारणात केलं. ‘माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच’ अशी वृत्ती जपणार्‍यांना ‘मुरब्बी,’ ‘मुत्सद्दी’ वगैरे बिरूदं मिळाली. त्यातही फारच पुढे गेलेले तर थेट ‘जाणते राजे’च झाले. आज हाच फोडाफोडीच्या राजकारणाचा भस्मासूर या कॉंग्रेसी नेत्यांवरच उलटला आहे आणि राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांची फुटलेली मतं हे याचं उत्तमउदाहरण आहे. वास्तविक पाहता केंद्रात आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांच्या विधानसभांत भाजपचं संख्याबळ पाहता, रामनाथ कोविंद यांचा विजय आधीच निश्चित झाला होता. त्यामुळे भाजपला या वाढीव आठ-दहा मतांची काहीच गरज नव्हती. शिवाय मतदान गुप्त असल्याने नावंही कळणार नव्हती. तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील काही सदस्यांनी कोविंद यांना मतदान केलं. त्यामुळे वरकरणी ही घटना किरकोळ जरी वाटली तरी राज्यात गेले दोन-तीन महिने वर्तविल्या जात असलेल्या वेगवेगळ्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर ती अतिशय महत्त्वाची आहे.

रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्र विधानसभेतून भाजप- १२२, शिवसेना- ६२, बविआ- ३, मनसे- १, रासप-१, अपक्ष- ७ अशी एकूण १९६ मतं मिळणं अपेक्षित होतं. पैकी क्षितिज ठाकूर अनुपस्थित राहिल्याने झाली १९५. प्रत्यक्षात मिळाली २०८! यावरच्या १३ मतांमध्ये अगदी कुंपणावरचा कम्युनिस्ट शेकापची ३, प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाचं १, अबू आझमींचं १ अशी जरी ५ धरली तरी उरतात ८, जी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आहेत. राष्ट्रवादीच्या तुरुंगवासी आमदार रमेश कदमयांनी आपणहूनच कोविंद यांना मत दिल्याचं जाहीर करून टाकलं होतं. राष्ट्रवादीने आपलं तेवढं एकच मत फुटलं असल्याचं जाहीर करत जबाबदारी कॉंग्रेसवर ढकलली, तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावर बोलताना ‘आम्ही काही आमच्या सदस्यांना व्हीप जारी केला नव्हता, आम्ही १७-१८ पक्ष मिळून ही निवडणूक लढलो होतो, ही निवडणूक आम्ही तात्त्विक लढाई म्हणून लढत होतो, त्यामुळे नेमकी मतं कोणाची फुटली हे नक्की सांगता येणार नाही, त्याची माहिती घ्यावी लागेल,’ अशी काही तरी अगम्यच प्रतिक्रिया दिली, ज्याचा अर्थबोध खुद्द त्यांनाही न व्हावा. चव्हाण यांची ही प्रतिक्रिया केवळ गोंधळलेलीच नव्हती, तर अवती-भोवती नेमकं काय चालू आहे याचा पत्ताच लागत नसल्याने ते पुरते सैरभैर, हताश झाल्याचं दाखवून देणारी होती; परंतु खरंतर ही सैरभैर प्रतिक्रिया आज केवळ कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीच नाही, तर सर्वच भाजपेतर पक्षांची आहे. कारण या घटनेला भाजपला मिळालेल्या या २०८च्या संख्याबळाप्रमाणेच एकट्या भाजपकडे उपलब्ध असलेल्या १४६ या विधानसभेतील स्पष्ट बहुमताचाही संदर्भ आहे.

राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यात मध्यावधी निवडणूक होणार, अशा बातम्यांचं गेल्या दोन-तीन महिन्यांत पेव फुटलं आणि शिवसेनेसह कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपणहून यात उडी घेतली. कॉंग्रेसने आपण मध्यावधीला तयार असल्याचं सांगून टाकलं. शिवसेनेने तर थेट जुलैमध्ये राजकीय भूकंप घडविण्याचीच भाषा केली, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यापर्यंत सर्वांनीच मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यताही नाकारली आणि अखेर राष्ट्रपतिपदाची बहुप्रतीक्षित निवडणूक पार पडल्यावर भाजपकडे असलेला १४६चा आकडा आज समोर आला आहे. एकीकडे शिवसेनेने केवळ ‘बोलून दाखविलं,’ तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात ‘करून दाखविलं’ आहे. याचसोबत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. शेतकरी कर्जमाफी करण्यात आलेली असून सोबतच पाऊसही उत्तमपडत आहे. त्यामुळे अधिवेशनातही मांडण्यासाठी व लॉबीमध्ये उतरून कामकाज चालविण्यासाठी (?) मुद्द्यांचाही सद्यस्थितीत विरोधकांकडे अभावच दिसतो. या परिस्थितीत हा प्रस्तावित भूकंपाचा जुलै महिना काहीजणांसाठी दुष्काळातला तेरावा महिना ठरत असून यातूनच आता अशा सैरभैर, हताश प्रतिक्रिया येत आहेत, येणार आहेत. निकाल आधीपासूनच निश्चित असलेल्या, एकतर्फी निवडणुकीतही भाजपने विरोधकांची फोडलेली १३ मतं भाजपचे आगामी मनसुबे स्पष्ट करतात. या निवडणुकीत जर तुमचे ८ आमदार फुटतात, तर प्रत्यक्ष मध्यावधी वगैरे झाल्यास किती फुटतील याचा विचार करण्याचा जणू इशाराच भाजपने कॉंग्रेस-राष्ट्रवादीला दिला आहे. कॉंग्रेससारख्या एकेकाळच्या बलाढ्य पक्षाला आपण निवडणुकीत नेस्तनाबूत करू शकतोच, पण राजकीय डावपेचांमध्येही त्यांच्याच पद्धतीने त्यांना मात देऊ शकतो, असा आत्मविश्वास आज भाजपमध्ये निर्माण झाला असून आणि तो त्यांच्या कृतीतून स्पष्टपणे दाखवून देणारी ही घटना आहे. हे श्रेय जसं राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे जातं, तसंच ते राज्यात अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातं.

भारतीय दर्शनांत कर्माच्या सिद्धांताविषयी बरंच चिंतन झालं आहे. आपण जे वर्तमानात काही बरं-वाईट कर्म करतो त्याचीच बरी-वाईट फळं भविष्यात आपल्या वाट्याला येतात. ‘तुम्ही-आम्ही भले’ या संकल्पनांवर विश्वास ठेवू अथवा न ठेऊ, पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मात्र गेल्या तीन-साडेतीन वर्षांच्या काळानंतर आता या कर्माच्या सिद्धांतावर पक्का विश्वास बसू लागला असण्याची शक्यता आहे!

 -निमेश वहाळकर