खमंग, खुसखुशीत खाद्यपदार्थांची दावत

    दिनांक  15-Jul-2017   
 

 
 
खाद्यपदार्थांची-पाककृतींची अनेकानेक पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध आहेत. विविध चवीच्या, विविध ढंगाच्या, देशोदेशीच्या, इथल्या मातीतल्या, शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची रेलचेल असलेल्या रुचकर पुस्तकांच्या दुनियेत शेफ तुषार प्रीती देशमुख यांचे ‘प्रीत खाद्यपरंपरेची’ हे पुस्तक मात्र विशेष ठरते. कारण, स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासूनच झटपट आणि चविष्ट पाककृती कशा तयार करायच्या, याची माहिती आणि विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत. त्याचबरोबर या पुस्तकाला मायेचा ओलावाही आहे. शेफ तुषार देशमुख यांच्या आई मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटात शहीद झाल्या. त्यांची इच्छा होती की, तुषार यांनी शेफ व्हावे आणि अनंत अडचणींचा सामना करत त्यांनी त्यांच्या आईची इच्छा पूर्णही केली. आईने त्यांना जे शिकवले, जो ठेवा त्यांना दिला, तो त्यांनी जपला, जोपासला, वाढवला, स्वतःचे हॉटेल उभे केले. तोच आईने दिलेला ठेवा त्यांनी पुस्तकाच्या रुपाने समाजापुढे ठेवला आहे. नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थही चौरस कसे होतील, त्यातून घरातील सर्वांनाच पोषक घटक कसे मिळतील, त्याचबरोबर खाताना नाविन्याचा आनंद कसा मिळेल, जिभेचे चोचले पुरवताना स्वादाची विविधता कशी जपली जाईल, हे तुषार देशमुख यांच्या पुस्तकातील पाककृती पानापानांवर सांगतात.
 
तुषार देशमुख यांनी ‘प्रीत खाद्यपरंपरेची’ आणि ‘शेफ रे शेफ’च्या माध्यमातून पुढच्या नवीन पिढीला खाद्यपदार्थ तयार करण्याची आवड निर्माण करण्याचा वसाच घेतला. विविध प्रसारमाध्यमांचा योग्य वापर करुन आपली खाद्यपरंपरा कित्येक गृहिणी, सुगरणींपर्यंत पोहोचवली. ‘प्रीत खाद्यपरंपरेची’ या पुस्तकाचाही तोच उद्देश असल्याचे जाणवते. मुख्य म्हणजे, अचूक माप, प्रमाण आणि पसारा न करता सुटसुटीत जेवण पुरुषांनाही करता येईल, अशा पाककृतींची रेलचेल या पुस्तकात दिसते. या पुस्तकात केवळ पारंपरिक पदार्थांची पाककृती नाही, तर आपल्या पारंपरिक पदार्थांना आधुनिकतेची जोड देत सर्वसमावेशक अशा पाककृतीही दिल्या आहेत. उपवासाच्या पदार्थांपासून सुरु होणारा या पुस्तकाचा प्रवास नाश्त्याचे पदार्थ, छोट्या मुलांसाठी, विविध सूप्स, लोणची, चटणी, ठेचा, रोटी, पराठे, भाज्या, आमटी, भाताचे प्रकार, इंडियन चायनीज, नॉन व्हेज, गोड पदार्थ अशा विविध पाककृतीतून मुशाफिरी करुन जिभेवर पाणी आणतात नि लगेच हे पदार्थ स्वयंपाकघरात करुन बघावेत यासाठी प्रवृत्तही करतात.
 
‘प्रीत खाद्यपरंपरेची’ या पुस्तकात विविध खाद्यपदार्थांची माहिती तर आहेच, पण पाककृतींची आकर्षक छायाचित्रेही आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकघरातील विविध माहितीपूर्ण टीप्सही दिल्या आहेत; ज्याचा उपयोग प्रत्येक गृहिणीला आणि ज्याला स्वयंपाक करायचाय, स्वयंपाकघर सांभाळायचे आहे, त्या सर्वांनाच होईल. पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी रक्कमही आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे कुटुंबीय आणि शेतकर्‍यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे, त्यामुळे या पुस्तकाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचाही यशस्वी उपक्रमराबवला जात आहे.
 
पुस्तकातील पाककृती या सर्वांना आवडतील अशा तर आहेतच, पण त्यातील ‘मिक्स व्हेजिटेबल इन व्हाईट ग्रेव्ही’ ही भाजी आणि ‘मिश्र धान्यांचा खिचडा’ हा पौष्टिक भात विशेष उल्लेखनीय. पुस्तकात शेवटी शेफ तुषार देशमुख यांचे बालपण, आई, आईच्या आठवणी, ठेवा, त्यांची धडपड असे स्मृतिबिंबही दिले आहे. त्याचबरोबर अनेक तरुण उद्योजकांना ‘स्फूर्तीदायक असे स्वप्न पूर्ण कराच’ हे विशेष लेखनही आहे. पुस्तकाची छपाई उत्कृष्ट आहेच, त्याचबरोबर आकर्षक मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरील आईच्या आठवणीची भावपूर्ण कविताही आहे. एकूणच पुस्तक अगदी खुसखुशीत आणि वाचनीय... त्यामुळे खवय्यांच्या नक्की पसंतीस उतरेल, यात शंका नाही.  
 
पुस्तकाचे नाव - प्रीत खाद्यपरंपरेची
लेखक व प्रकाशक - तुषार प्रीती देशमुख
पाककृती - १७५ पेक्षा अधिक पदार्थ
पृष्ठे - १२७    मूल्य - १८०
अधिक माहितीसाठी संपर्क - ९९२०४०७४६५
 
 
- महेश पुराणिक