इतना सन्नाटा क्यों है भाई..?

    दिनांक  14-Jul-2017   
 

 
 
एकेकाळी आपल्या भारतीय क्रिकेट संघाची मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना होणार्‍या अवस्थेवरून पुष्कळ टिंगल व्हायची. बडेबडे धडाकेबाज वगैरे फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावायचे, मात्र खेळ ऐन रंगात येण्यापूर्वीच त्यांची विकेट पडायची. संघाची कामगिरी कशी होते, यापेक्षा ‘माझ्या नावावर किती शतकांची नोंद’ याकडेच लक्ष अधिक. तशी काहीशी अवस्था कॉंग्रेसचीही... पक्षातला एकेक नेता म्हणजे स्वतंत्र संस्थानच! मात्र, या सगळ्यांचा एकत्रित पक्ष म्हणून विचार केला असता मात्र हाती शून्यच!
 
महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला, तर यशवंतराव चव्हाणांपासून अनेक दिग्गज नेते ज्या पक्षात घडले, त्या कॉंग्रेसला आज आपल्या अस्तित्वासाठी धडपड करण्याची वेळ आली आहे. केंद्रात व राज्यात सत्तापरिवर्तन होऊन तीन वर्षे उलटल्यानंतरही आज कॉंग्रेस पक्षाबाबत काहीही मत व्यक्त करताना सातत्याने २०१४ चा उल्लेख करावा लागतो. कारण, खुद्द कॉंग्रेसचेच नेते अद्याप २०१४ मधील त्या दारुण पराभवातून बाहेर आलेले नाहीत. एका वरिष्ठ भाजप नेत्याने नुकतेच एका कार्यकर्ता बैठकीत कॉंग्रेसच्या सध्याच्या अवस्थेबाबत मार्मिक टिप्पणी केली. सत्ता आणि नेता यांना जोडणारा ‘संघटना’ नावाचा एका धागा असतो. कॉंग्रेस नेमका तोच धागा विसरली आणि आज त्यांच्यावर ही अशी वेळ आली! त्यामुळे दिमतीला एकाहून एक दिग्गज नेते असतानाही प्रचंड अंतर्गत मतभेद, विस्कळीत पक्षसंघटना आणि यातून आलेला एक निरुत्साहीपणा यामुळे एकेकाळची वैभवशाली परंपरा सांगणार्‍या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसची आजही दीनवाणी अवस्था झाली आहे. गेला आठवडाभर कॉंग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबाबत चालू असलेल्या उलटसुलट चर्चांमधून हीच गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध होते.
 
‘महाराष्ट्र कॉंग्रेस’ म्हटल्यावर आज आपल्या डोळ्यासमोर पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील आदी नावं येतात. यातील तिघे माजी मुख्यमंत्री पैकी एक सध्याचे प्रदेशाध्यक्ष, तर विखे विधिमंडळातील विरोधी पक्षनेते. प्रत्येकाची स्वतंत्र साम्राज्य. कोणाच्या मागे भलं-मोठं आर्थिक साम्राज्य, तर कोणाच्या मागे सहकारी संस्थांमधून उभं राहिलेलं मजबूत नेटवर्क. राणे वगळता प्रत्येकाने पिढीजात सत्तावैभव उपभोगलेलं. मात्र, तरीही या सगळ्यांची ‘एकत्रित कॉंग्रेस’ म्हणून होणारी कामगिरी मात्र संघभावनेच्या अभावामुळे अत्यंत दारुण आहे. त्यामुळेच कोणताही मुद्दा घेऊन लोकांपुढे जाताना आज कॉंग्रेसची पुरती दमछाक होते आहे. सध्या चालू असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या वादाचंच घ्या. प्रत्येक वेळी प्रत्येक नव्या सुधारणेनंतर त्याला विरोध करत कॉंग्रेसने राजकारण तापतं ठेवत पुन्हा जनतेची सहानुभूती खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची दखल ना जनतेने घेतली ना माध्यमांनी. अशोक चव्हाणांनी तर नुकताच मुख्यमंत्र्यांच्या आडनावाची खिल्ली उडविण्याचाही केविलवाणा प्रयत्न करून पाहिला. मात्र, हे सगळे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे राधाकृष्ण विखे-पाटील आणि नारायण राणे हे दोन दिग्गज मात्र सत्ताधारी भाजपशी या ना त्या मार्गाने सलगी करण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याने अंतिमतः सगळं मुसळ केरातच जाताना दिसत आहे.
 
विरोधी पक्षनेता कसा नसावा याचं विखे-पाटील हे उत्तम उदाहरण ठरावेत. एकेकाळी महाराष्ट्र विधानसभेने छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे यांच्यासारखे प्रभावी विरोधी पक्षनेते पाहिले आणि याच विधानसभेत सत्ताधारी पक्षाशी अत्यंत सुमधूर संबंध असलेला आणि मनाने सत्ताधारी पक्षातच गेलेला, शिवाय वक्तृत्व आणि एकूण देहबोलीतूनच कमकुवतपणा दिसून येणारा नेता सभागृहाचा विरोधी पक्षनेता म्हणून निवडणं म्हणजे कॉंग्रेसच्या विनाशकाले विपरीत बुद्धीचं उत्कृष्ट उदाहरण ठरावं. ‘‘आमच्या सरकारमधील मंत्र्यांपेक्षा मला भाजप सरकारमधील मंत्री जास्त जवळचे वाटतात,’’ हे विखे महोदयांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केलेलं जाहीर वक्तव्य. आता संबंध असणं यात गैर काही नाही; उलट ते परिपक्व राजकारणाचं लक्षण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते विरोधी पक्षात असल्यापासून विखेंचे उत्तमसंबंध आहेत. मात्र, हे संबंध व्यक्त करताना आधीच गटांगळ्या खाणार्‍या स्वपक्षालाच बुडवायचं नसतं, हे विखेंसारख्या मुरलेल्या राजकारण्याला माहीत नसण्याची मुळीच शक्यता नाही. त्यामुळे या वक्तव्यातून विखे यांनी स्वपक्षाला योग्य तो संदेश दिला असल्याचे मानले जात असून आता विखे यांच्या भाजप प्रवेशाच्याही बातम्याही वार्‍यासारख्या अगदी सोसाट्याने सुटल्या आहेत. विखे-पाटील विरोधी पक्षनेते झाल्यापासूनच भाजपच्या ‘वेटिंग लिस्ट’वर होते, हे राज्याचं राजकारण जवळून पाहणार्‍यांना चांगलचं माहीत आहे. मात्र, ते आता तीन वर्षांनंतर या अशा वेळी उघडपणे व्यक्त होतील याची कल्पना मात्र फारशी कोणी केली नव्हती. विखे-पाटील घराण्याचे अहमदनगर जिल्ह्यात ‘प्रवरा’चं सहकाराचं मोठं साम्राज्य आहे. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या निधनानंतर राधाकृष्ण व त्यांचे बंधू अशोक यांच्यात ‘प्रवरा’च्या वर्चस्वावरून मोठा वाद पेटला आहे. अशोक विखे-पाटील रोज नवनवे आरोप करत आहेत. शिवाय दिमतीला अहमदनगर जिल्ह्यात कॉंग्रेसअंतर्गत ‘बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-पाटील’ असाही जुना वाद आहे. या सगळ्यातून दिलासा मिळेल, अशा आशेनेच विखे-पाटलांनी सरकारशी सलगी करण्याचा प्रयत्न केला, असं समजायलाही वाव आहे. नुकत्याच झालेल्या शेतकरी संपादरम्यान नगर जिल्ह्यातच पुणतांबे गावांत संपाचा जोर असताना व कॉंग्रेसनेही त्यात उडी घेण्याचा प्रयत्न चालविला असताना राधाकृष्ण विखे-पाटील मात्र शांत होते व अजूनही आहेत, यावरूनच काय ते लक्षात येईल.
 
जी गोष्ट विखेंची तिच नारायण राणेंची. पण गेल्या महिन्यात राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या बातम्यांचा जोर आता काहीसा ओसरला आहे. भाजप आपल्या काही अटींवर ठाम असून राणे त्या अटी मान्य कराव्या की नाही या गोंधळात असल्याचं समजतं. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र लांबूनच सगळ्याची मजा बघण्याच्या भूमिकेत दिसतात. मात्र, ती मजा त्यांना अजून हवी तशी घेता येत नाही, कारण पक्षाचा सामान्य कार्यकर्ता, आमदार-खासदार मात्र आज तीन वर्षांनंतरही २०१४ मध्ये झालेल्या अवस्थेसाठी पृथ्वीराजबाबांनाच जबाबदार मानतो. पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात फक्त एकदाच फाईलवर सही केली आणि तिही कॉंग्रेसच्या २०१४च्या निवडणुकीसाठी बनविलेल्या जाहिरातीत, हा आजही विधिमंडळ व मंत्रालयात आवडीने सांगितला जाणारा विनोद. त्यामुळे तूर्तास ‘जे चाललंय ते चालू द्या,’ हीच भूमिका त्यांनी स्वीकारल्याचं दिसतं. या सगळ्या नेत्यांचे स्वतःचं बिर्‍हाड सुखरूप ठेवण्यासाठी ना ना तर्‍हेचे हे असे प्रयत्न चालू आहेत. मात्र, सगळ्याचा एकत्रित परिणामपक्षाच्या कामगिरीवर होत असून दिवसेंदिवस कॉंग्रेस पक्ष अधिकच गाळात रुतत चालला आहे. सुदृढ लोकशाहीत विरोधी पक्षाचे अनन्यसाधारण स्थान असते आणि हा विरोधी पक्षच असा गोंधळलेला, विभागलेला आणि कंटाळलेला दिसतो. ही परिस्थिती जनतेला कळते आहे, तशी कॉंग्रेसच्या नेत्यांनाही चांगलीच ठावूक आहे, पण ती वळवून घेण्याची मानसिकता मात्र आज त्यांच्यापाशी नाही. कॉंग्रेस नेत्यांची हीच मानसिकता कायम राहिल्यास आगामी काळात दिल्लीतून हायकमांडकडून मुंबईतील कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात येणार्‍या प्रत्येकावर ‘इतना सन्नाटा क्यों है भाई..? हा एकच प्रश्न (कदाचित भाई जगतापांना उद्देशून) विचारण्याची वेळ येईल हे निश्चित! 

- निमेश वहाळकर