कचरामुक्त गंगा नदी...

    दिनांक  13-Jul-2017   
 


हरिद्वार ते उन्नावदरम्यान वाहणार्‍या गंगा नदीत आणि ५०० मीटरच्या परिसरात कचरा टाकल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने घेतला आहे. गंगा नदीकाठच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. गंगा नदीकाठचा १०० मीटरचा परिसर राष्ट्रीय हरित लवादाकडून ‘नो डेव्हलपमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या भागात कोणतेही बांधकामकरता येणार नाही. हरिद्वार ते उन्नाव या दरम्यानच्या भागासाठी हा नियमलागू असणार आहे.

हरित लवादाने घेतलेला हा निर्णय अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. पर्यावरणाचा, प्रदुषणाचा, आरोग्याचा विचार करता भारतातील अनेक नद्यांची अवस्था कचराकुंडीसारखी झाल्याचे दिसते. गाव असो वा शहरे वा मोठी नगरे बर्‍याचदा या सर्व परिसरातील टाकाऊ पदार्थ नद्यांमध्ये फेकून देण्याची प्रवृत्ती आपल्याकडे फोफावलेली आहे. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक पाणी आणि रसायने, प्रक्रिया न केलेले सांडपाणी सर्रास नद्यांमध्ये सोडले जाते. आजूबाजूला राहणारे नागरिकही घरातील एखादी वस्तू, जुने सामान, साहित्य, खाद्यपदार्थ, कचरा, भंगलेल्या मूर्त्या नदीमध्ये फेकून देत असल्याचे चित्र आढळते. मात्र, नदी ही आपली जीवनदायिनी आहे, तिची आपण काळजी घेतली तरच आपल्याला स्वच्छ, सुंदर, शुद्ध पर्यावरण, नैसर्गिक परिसर उपलब्ध होईल, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. यासाठी अनेकदा काही पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था, संघटना नदी प्रदूषणाविरोधात आवाज उठवतात. अनेकदा आंदोलनेही केली जातात. परंतु, आपण जिथे राहतो, तो परिसर स्वच्छ असला पाहिजे, तेथील नैसर्गिक संपदा सुरक्षित आणि सुस्थितीत राहिली पाहिजे, हा विचार सर्वांनीच करायला हवा. मात्र, निसर्गाची जेवढी हानी करता येईल, नद्यामध्ये भराव टाकून वा वाळू उपसा करुन जेवढे ओरबाडता येईल, तेवढे खणून काढण्यालाच आतापर्यंत मानवाने प्राधान्य दिल्याचे दिसते. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने घेतलेला निर्णय गंगा नदीचे प्रदूषण कमी करण्याच्यादृष्टीने उपयुक्त आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून गंगा नदीच्या प्रदूषणाची चर्चा होत आहे. गंगा शुद्धीकरणासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत, त्याचबरोबर यासाठी विविध करारही केले आहेत. नुकतेच इस्रायलनेही गंगा शुद्धीकरण मोहिमेत सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले. गंगा शुद्ध झाली, तर उत्तर भारतातील शेतीसाठी आणि पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा करता येईल. तसेच परदेशात असलेल्या नितळ पाण्याच्या नद्यांसारखी गंगाही अखंड निर्मळपणे प्रवाहित होईल.
 
- महेश पुराणिक