मितालीचे क्रिकेट राज

    दिनांक  13-Jul-2017   
 

 
 
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या विक्रमाला गवसणी घालत अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात मितालीने आपल्या कारकिर्दीतील सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे, या विक्रमासोबतच सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली ही विश्वातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. मितालीने इंग्लंडची माजी क्रिकेटपटू चार्लोट एडवर्डचा १९१ एकदिवसीय सामन्यातील १८० डावांमधील पाच हजार, ९९२ धावांचा विक्रममोडत आपल्या १८३ सामन्यांतील १६४व्या डावातच ही किमया साधली. एवढेच नव्हे, तर तिने आपल्या नावावर एक अनोखा विक्रमही करत क्रिकेटमध्ये आपलेच राज असल्याचे सिद्ध केले.

मितालीने केवळ चार्लोट एडवर्डचाच विक्रममोडला असे नव्हे, तर एकूणच क्रिकेटविश्वातील सर्वच विक्रममोडीत काढले. ‘क्रिकेटचा देव’ असे ज्याला समजले जाते, त्या सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू रिकी पॉंटिंग यांच्या विक्रमांनाही मितालीने मागे टाकले. सचिन तेंडुलकरने खेळलेल्या १७०व्या डावांत सहा हजार धावा करण्याचा विक्रमकेला होता, तर रिकी पॉंटिंगने १६६व्या डावांत सहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही १६६व्या डावांत सहा हजार धावा केल्या होत्या. परंतु, मिताली या सर्वांपेक्षा सरस ठरली. तिने केवळ १६४व्या डावांतच सहा हजार धावा पूर्ण केल्या. मितालीच्या एकदिवसीय कारकिर्दीचा विचार केल्यास मितालीच्या खात्यात आतापर्यंत पाच शतके आणि ४८ अर्धशतकांची नोंद आहे. एकदिवसीय सामन्यात तर मितालीच्या खेळाची जादू चाललीच मात्र, कसोटी क्रिकेटवरही मितालीनेच राज केले आहे.

२००२ साली इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्यात मितालीने २१४ धावा केल्या होत्या. हा विक्रमआजही तिच्याच नावावर आहे. ३ डिसेंबर, १९८२ रोजी जन्मलेली मिताली राज एक उत्कृष्ट भरतनाट्यमनृत्यांगनाही आहे. परंतु, क्रिकेटमुळे ती भरनाट्यमपासून जशी दूर राहू लागली, तशी तिच्या नृत्याच्या शिक्षकांनी तिला भरतनाट्यम् आणि क्रिकेट यापैकी एकाची निवड करायला सांगितले आणि तिने क्रिकेटची निवड केली. तिने निवडलेल्या क्षेत्रात ती आता तर सर्वोच्च पातळीवर पोहोचली. भरतनाट्यममधील पदलालित्य तिने क्रिकेटमध्येही दाखवत आपली छाप पाडली. भारत सरकारनेही तिच्या खेळातील कौशल्याचा गौरव करत मितालीला २००४ साली ‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. मितालीला भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा.
 
-महेश पुराणिक