#ओवी लाईव्ह - कैवल्याचा पुतळा

    दिनांक  04-Jun-2017   

 

उन्हाळ्याची सुट्टी संपत आली, तेंव्हा कुठे रजू आणि रघु मामाच्या गावाहून परत घरी आले. आल्यापासून सारखे मामाकडे काय केले, मामीने काय काय पदार्थ केले, नितीनदा बरोबरचे खेळ, रयुबिक क्यूबची सूत्रे आणि पूजा ताईच्या गोष्टी हेच बोलत होते!


नीला आजीने विचारले, “राघवेंद्रा, कोणत्या गोष्टी सांगितल्या पूजाताईने?”

“पूजाताईने खूप गोष्टी सांगितल्या, विक्रम-वेताळच्या, शेरलॉक होम्सच्या आणि ज्ञानेश्वरांच्या पण गोष्टी सांगितल्या!”, रघु म्हणाला.

“आजी, एकनाथांची पण एक गोष्ट सांगितली ताईने. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली त्या बद्दल.”, रजू म्हणाली.

“अग, ते तर फार थोर उपकार आहेत एकनाथांचे! एकनाथांना ज्ञानदेवांचा दृष्टांत झाला होता. एकनाथ सांगतात -

ज्ञानदेव स्वप्नी सांगे मजलागी।


अजानवृक्षाची मुळी कंठासी लागली।


येउनि आनंदस्थली |


काढ वेगी ||


“अजान वृक्षाचे मुळ गळ्याला टोचत आहे. तर तू लवकर येऊन ते बाजूला कर! असे ज्ञानदेवांनी स्वप्नात सांगितल्यावर, काही वारकरी भक्तांना बरोबर घेऊन एकनाथ आळंदीला आले. अडीचशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती. आता एकनाथ आळंदी मध्ये आले तेंव्हा समाधीचा काही मागमूस देखील नव्हता. सगळीकडे गवत आणि काटेरी झुडपे वाढली होती. एकनाथांनी समाधीचा शोध सुरु केला. शिवमंदिरा समोरील नंदी खालून समाधीकडे रस्ता आहे असे त्यांना कळले. तेंव्हा नंदी बाजूला करून एकनाथ त्या द्वारातून समाधीत उतरले. अजान वृक्षाची मुळी बाजूला करून, ज्ञानेश्वरांचा आदेश घेऊन, एकनाथ तीन तासांनी समाधीतून बाहेर आले.

“एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीवर चौथरा बांधविला आणि समाधीचा जीर्णोद्धार केला. ज्ञानेश्वरांच्या आज्ञेप्रमाणे, नाथांनी ज्ञानेश्वरीची अनेक हस्तलिखिते मिळवली. गोदातीरी, पैठणी या प्रतींचे संशोधन करून इतरांनी मागाऊन घातलेल्या मनच्या ओव्या वगळून, लिखाणातील इतर चुका दुरुस्त करून, ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. शुद्धप्रतीची अनेक हस्तलिखिते तयार करवून घेतली. आणि या शुद्धप्रती सर्वत्र पाठवल्या.

“आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती नाथांनी शुद्ध केलेली. नाथांनी हे कार्य केले नसते तर काळाच्या ओघात जशी महाराजांची समाधी हरवली होती, तशीच ज्ञानेश्वरी सुद्धा हरवून गेली असती.”, नीला आजी म्हणाली.

“पण आजी, त्या नवीन प्रतीमध्ये पुन्हा कोणी ओव्या लिहिल्या असत्या तर?”, रघूने शंका उपस्थित केली.

“साहजिकच नाथांना देखील असे वाटले असावे. ज्ञानेश्वरीमध्ये कोणी नवीन ओव्या घुसडू नये, म्हणून नाथ म्हणतात -

ज्ञानेश्वरी पाठी |
जो ओवी करील मऱ्हाटी |
तेणे अमृताचे ताटी |
जाण नरोटी ठेविली ||

“ज्ञानेश्वरीमध्ये जर कोणी नवीन ओवी लिहित असेल तर असे जाणा की आपण अमृताच्या ताटात नारळाची करवंटी ठेवत आहोत!”, नीला आजी म्हणाली.

“म्हणजे एकनाथांना ज्ञानेश्वरी वाचून अमृता सेवन केल्यासारखे वाटले असणार!”, रजू म्हणाली.

“राजश्री, काळाचा महिमा कसा आहे बघ! कधी ज्ञानोबा आळंदीहून पैठणला गेले होते शुद्धीपत्र मिळवण्यासाठी. आणि नंतर पैठणहून एकनाथ आळंदीला आले होते ज्ञानेश्वरीची शुद्धप्रती मिळवण्यासाठी! नाथांना ज्ञानेश्वरांबद्दल किती प्रेम व आदर वाटत होता ते त्यांच्या अभंगांतून दिसते. काही ठिकाणी एकनाथ ‘ज्ञानाचा एकनाथ’ अशी सही करतात, तर एका अभंगात ज्ञानेश्वरांबद्दल ते म्हणतात –

कैवल्याचा पुतळा | प्रगटला भूतळा |
चैतन्याचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा ||


 

दीपाली पाटवदकर