ढोला-सदिया महासेतूचे सामरिक महत्त्व

    दिनांक  04-Jun-2017    
लष्करीदृष्ट्या पूर्वांचलमधील अरुणाचल प्रदेशात चीनने वेढा घातलेल्या सरहद्दीपासून संरक्षणात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या भागाला जोडणारा हा पूल युद्धकाळात साधनसामग्री, लष्करी साहित्य, दारुगोळा, इंधन, भारी वजनाच्या तोफा आणि मिसाईल्सचीसुद्धा वाहतूक करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याचबरोबर देशाच्या समुद्र किनार्‍यावर नद्या आणि खाड्यांवर, तसेच भारताच्या सरहद्दीवरील संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांना सैन्य दल आणि लष्करी सामग्रीची वाहतूक करण्यासाठी भारताच्या सीमेवर सेना दलाच्या वतीने ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ यांच्या वतीने चीन आणि पाकिस्तानने व्यापलेल्या प्रदेशावर पोहोचण्यासाठी दुर्गम भागात पूल उभारणी करण्यात येत आहे.
 
ढोला-सदिया पुलामुळे लोहित खोर्‍यातील प्रवास सोपा होईल. बाराही महिने या भागात प्रवेश करता येईल. त्यामुळे लोहित खोरे आणि अरुणाचलची आर्थिक प्रगती तर नक्कीच होईल; शिवाय सामरिकदृष्ट्या भारतीय सैन्याला या भागात जाण्याकरिता या पुलामुळे मदत होणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत सैन्याला ज्या वेगवान हालचाली कराव्या लागतात, त्यासाठी या पुलाचा मोठा उपयोग होणार आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्याने या भागातील सुरक्षा वाढविण्यास मदत होईल.
 
आसामच्या पूर्व भागातील लोहित नदीवर बांधलेल्या पुलाचे लोकार्पण नुकतेच झाले. हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि आसाममधील गायक भूपेन हजारिका यांचे नाव या पुलाला देण्यात आले आहे. पुलाची लांबी ही ९.२५ किलोमीटर आहे. भारतात असलेल्या वांद्रे-वरळी सी-लिंकपेक्षा हा पूल ३.५५ किलोमीटर अधिक लांबीचा आहे. त्यामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यादरम्यानचे अंतर १६५ किलोमीटरने कमी होणार आहे आणि प्रवासाचे पाच तास वाचणार आहेत. या पुलासाठी २,०५६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. वास्तविक हा पूल दहा वर्षांपूर्वीच पूर्ण व्हायला हवा होता, मात्र गेल्या सरकारांच्या काळातील ढिलाईमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. हा पूल पूर्णत्वास जाण्यासाठी सध्याचे दळणवळण आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना त्याचे श्रेय द्यायला हवे.
 
अत्यंत उपयुक्त पूल
लष्करीदृष्ट्या पूर्वांचलमधील अरुणाचल प्रदेशात चीनने वेढा घातलेल्या सरहद्दीपासून संरक्षणात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या भागाला जोडणारा हा पूल युद्धकाळात साधनसामग्री, लष्करी साहित्य, दारुगोळा, इंधन, भारी वजनाच्या तोफा आणि मिसाईल्सचीसुद्धा वाहतूक करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
 
याचबरोबर देशाच्या समुद्रकिनार्‍यावर नद्या आणि खाड्यांवर, तसेच भारताच्या सरहद्दीवरील संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांना सैन्य दल आणि लष्करी सामग्रीची वाहतूक करण्यासाठी भारताच्या सीमेवर सेनादलाच्या वतीने ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ यांच्या वतीने चीन आणि पाकिस्तानने व्यापलेल्या प्रदेशावर पोहोचण्यासाठी दुर्गम भागात पूल उभारणी करण्यात येत आहे.
 
हा पूल उभारण्यात अनंत अडचणी होत्या. केवळ उंचावरून येणारा प्रवाहच नव्हे, तर उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे आणि पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे या महानद्यांना प्रचंड पूर आल्यामुळे काठावरील जमिनीची धूप, तसेच ब्रह्मपुत्रा नदीचे पात्रसुद्धा प्रवाहाने बदलल्यामुळे या नद्यांवर पूल उभारणे हे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. तसेच, दुर्गम भागात रस्त्यावरील पूल बांधताना जमीन खचणे, भूकंपग्रस्त क्षेत्र, भुसभुशीत मातीपासून पक्क्या कातळापर्यंत अनेक प्रकारे जमिनीचा प्रकार, दाट जंगल या सर्व कारणांमुळे हिमालयाच्या भागात पूल उभारणे हे एक मोठेच आव्हान ठरते.
 
ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यांच्यातील अंतर होणार कमी
ईशान्य भारताच्या भौगोलिक परिस्थितीकडे पाहता ईशान्य भारत आणि उर्वरित भारताला जोडणारे ‘सिलिगुडी कॉरिडॉर’ नावाचा एकच चिंचोळा मार्ग आहे. हा मार्ग इतका अरुंद आहे की, काही ठिकाणी त्याची रुंदी ५० किलोमीटरच्या आत आहे. म्हणजे शत्रूंनी ठरवले, तर या मार्गावर भूतान किंवा चीन सीमेवरील चुंबी खोर्‍यातून हल्ला करून ईशान्य भारताला इतर भारतापासून वेगळे करता येऊ शकते. बांगलादेशच्या निर्मितीनंतर भारत आणि ईशान्य भारत यांच्यातील अंतर हे जवळजवळ सात पटीने वाढले आहे. ईशान्य भारताचा नकाशा पाहिल्यास ईशान्य भारताची ९८ टक्के सीमा ही चीन, म्यानमार, भूतान आणि बांगलादेश यांच्याशी जोडलेली आहे. ङ्गक्त दोन टक्के सीमा ही उर्वरित भारताशी जोडलेली आहे. त्यामुळे ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. ईशान्य भारतातील बंडखोरीच्या समस्या, बांगलादेशी घुसखोरी किंवा उद्योगधंद्यांच्या उभारणीतील समस्या, रोजगाराची समस्या यांच्यावर मात करायची असेल, तर या भागामध्ये दळणवळणाच्या रस्ते, रेल्वेमार्ग हे ङ्गार मोठ्या प्रमाणात वाढविले पाहिजे. दुर्दैवाने इतक्या वर्षांत या संसाधननिर्मितीकडे दुर्लक्ष केले गेले.
 
चीनचे रस्ते आपल्या सीमेपर्यंत
अरुणाचल प्रदेशची सीमा, तर पूर्णपणे चीनशी जोडलेली आहे. चीनने तिबेट आणि भारत-चीन सीमा इथे मोठ्या प्रमाणावर रस्ते, रेल्वेलाईन, तेलमार्ग तयार केले आहे. चीनचे रस्ते आपल्या सीमेपर्यंत येऊन पोहोचले आहेत. या रस्त्यांची तुलना आपल्याकडील एक्सप्रेस हायवेशी करता येईल. एवढेच नव्हे, तर चीनची रेल्वेलाईन नेपाळची राजधानी काठमांडूला पोहोचण्याची शक्यता आहे. ही रेल्वेलाईन भारत-चीन सीमेला समांतर जाऊ शकते. युद्धाची वेळ आल्यास या रस्ते, रेल्वमार्ग यांचा वापर करून चीन सहा ते सात लाख सैन्य भारताच्या सीमेवर आणू शकतो. त्या तुलनेत भारताच्या परिस्थितीचा विचार करूया. अरुणाचल प्रदेशात सहा विविध नद्यांची खोरी आहेत. यामधील मोठी खोरी सुबनसिरी, सियांग, सियोग आणि लोहित. या नद्या एकमेकांत मिसळून आसाममध्ये यांचे नाव ‘ब्रह्मपुत्रा नदी’ असे होते. या भौगोलिक रचनेमुळे अरुणाचल प्रदेशात लोहित खोर्‍यातून सियांग खोर्‍यात जायचे असेल, अशा प्रकारचे रस्तेच नाहीत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशातील व्यक्तीला पुन्हा आसामच्या पठारावर यावे लागते. तिथून दुसर्‍या रस्त्यांनी वेगवेगळ्या खोर्‍यात प्रवेश करता येतो. 
 
ढोला-सदिया पुलाचे महत्त्व
ढोला-सदिया या पुलाचे महत्त्व यामुळेच वाढते. डोंगराळ भागातील मोठी नदी असलेल्या लोहित नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. पठारी भागात पोहोचल्यावर ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र एवढे मोठे होते की, तिथे जाण्याकरिता याआधी रस्ते नव्हते. पावसाळ्याच्या काळात तेथील लोकांना ब्रह्मपुत्रा नदी ही एखाद्या समुद्राएवढी मोठी झाल्याने आजूबाजूच्या प्रदेशात प्रवास करणे अशक्यच होते. भारत-चीन सीमेवर असणार्‍या सैन्यालाही पावसाळ्याच्या काळात हालचाल करणे शक्य होत नाही. बाकीच्या ऋतूतही या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला रेल्वेलाईन, रस्ते, काही ठिकाणी हत्तीवरून प्रवास करणे भाग होते. लष्करात असताना मी १९८३-१९८६ काळात तिथे काम केले तेव्हा आमच्या ब्रिगेडला ‘हाथी ब्रिगेड’ असे नाव दिले होते. नदी पार करण्यासाठी लष्कराचे स्वत:चे हत्ती पण ठेवलेले होते. आपल्या देशातील नद्या पार करण्यासाठी गेल्या ७० वर्षांपासून हत्तीचा वापर करत आलो आहोत. युद्धजन्य परिस्थितीत हे किती धोकादायक असेल याची कल्पना केलेलीच बरी. या नव्या पुलामुळे लोहित खोर्‍यातील प्रवास सोपा होईल. बाराही महिने या भागात प्रवेश करता येईल. त्यामुळे लोहित खोरे आणि अरुणाचलची आर्थिक प्रगती, तर नक्कीच होईल. पण सामरिकदृष्ट्या भारतीय सैन्याला या भागात जाण्याकरिता या पुलामुळे मदत होणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत सैन्याला ज्या प्रचंड आणि वेगवान हालचाली कराव्या लागतात, त्यासाठी या पुलाचा प्रचंड मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे या भागातील सुरक्षा वाढविण्यास मदत होईल. एक पूल अपुराच हा पूल बांधला गेला ही बाब चांगली असली तरीही तेवढे पुरेसे नाही. अजूनही आपल्याला रस्ते बांधणीमध्ये खूप प्रगती करावी लागेल. भौगोलिकदृष्ट्या ईशान्य भारताकडे पाहिले तर असे दिसते की, ईशान्य भारतातील ७५ टक्के भाग हा डोंगराळ आहे. २५ टक्के भाग हा पठारी प्रदेश आहे. ईशान्य भारतातील मधला भाग ज्याला ‘आसाम’ म्हणतो तो परिसर ब्रह्मपुत्रेमुळे दोन भागांत विभागला गेला आहे. दक्षिण आसाममधून नदी पार करून उत्तर आसाममध्ये जावे लागते. ब्रह्मपुत्रा नदीवर एकच रेल्वेचा पूल आहे, तर रस्ते ओलांडण्यासाठी पाच ठिकाणी पूल आहे. त्यात या सहाव्या पुलाची भर पडल्याने दळणवळण करणे सोपे होणार आहे.
 
- (नि.) ब्रि. हेमंत महाजन