जलयुक्त शिवारचा असाही फायदा , तुकोबांच्या पादुकांना तीन वर्षातून नीरा स्नान

    दिनांक  30-Jun-2017महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेली पंढरीची वारी सध्या पंढरपूर जवळ पोहचली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी काल इंदापूर-अकलूजमार्गे माळीनगर येथे पोहचली आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाची पालखी वेळापूर येथे पोहचली आहे. पुणे शहरातील मुक्कामानंतर दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने रवाना होता. पुणे शहर ओलांडल्यानंतर सासवडच्या पुढे माउलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने स्नान घातले जाते. तुकोबांच्या पादुकांना इंदापूरच्या पुढे अकलूजजवळ नीरेच्या पाण्याने स्नान घातले जाते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पडलेल्या दुष्काळामुळे तुकोबांच्या पादुकांना नीरेच्या पाण्याचा स्पर्श झाला नव्हता. महाराजांच्या पादुकांच्या स्नानासाठी प्रशासनाला नाईलाजाने पाण्याचा टँकर बोलावून पादुकांना स्नान घालावे लागत होते. परंतु यंदा तब्बल तीन वर्षांनंतर नीरेच्या पात्रात भरपूर पाणी असल्यामुळे महाराजांच्या पादुकांना खऱ्या नीरेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले आहे. याच बरोबर वारकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणत नीरा स्नानाचा आनंद लुटला. वारकऱ्यांच्या स्नान आणि नीरे काठी सुकण्यासाठी टाकलेल्या रंगेबेरंगी वस्त्रांमुळे अवघा नीरेचा काठ उठून दिसत होता.


यंदा नदीची पाणी पातळी जास्त असल्यामुळे सर्वाना नीरा स्नानाचा आनंद लुटता आला. पालखीची तसेच वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक वर्षी नदीला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी पालखी प्रमुखांकडून करण्यात आली आहे. यावर प्रशासनाने देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली. याला कारण म्हणजे नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेले 'जलयुक्त शिवारची कामे'. नीरा नदीच्या उगामापासून ते ती वाहत असलेल्या भोर, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील तिच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणत जलयुक्त शिवारच्या माध्यामतून जलसंवर्धनाची कामे झाली आहेत. त्यामुळे यंदा नीरेसह आसपासच्या प्रदेशातील भूजलसाठी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नदीकाठच्या तसेच नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्याकाठच्या प्रदेशात शासनाकडून मोठ्या प्रमाणत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. याच्या परिणाम स्वरूप यंदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आणि याचाच फायदा नदीकाठ नागरिकांबरोबरच दिंडीतील वारकऱ्यांना देखील झाला आहे.


महराष्ट्र शासने सुरु केलेल्या 'जलयुक्त शिवार' योजनेअंतर्गत २०१५ मध्ये भोर, पुरंदर आणि बारामती तालुक्यांमध्ये लक्षावधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. यामध्ये शेतात चर खोदून पाणी शेतात जिरवणे, नवीन बंधारे बांधणे, नाला खोलीकरण, हायड्रो फ्रॅक्चरींग व रिचार्ज शाफ्टच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये भोर तालुक्यात २०१५ पर्यंत ११४३.०६ लक्ष रुपयांची तर पुरंदर तालुक्यात २५२३.६१ लक्ष रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे भोर आणि पुरंदरमधील नीरेच्या पाणलोटक्षेत्रात अनुक्रमे अंदाजे १४४४ आणि ६९९ टीसीएस इतका पाणीसाठी प्रत्येक वर्षी निर्माण झाला आहे. यामुळे वीर धरणाबरोबरच नदीच्य पाणी पातळीत गेल्या दोन वर्षापासून वाढ झाली आहे.


गेल्या दीड वर्षांमध्ये भोरसह, पुरंदर, बारामतीमधील सर्व बंधारे आणि जलाशय तुडुंब भरले आहेत. राज्याचे जलसंवर्धन मंत्री विजयबापू शिवतारे यांनी स्वतः या भागांची पाहणी करून जलयुक्त शिवारच्या कमचे कौतुक केले होते. तसेच याचा नागरिकांना भविष्यात देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे मत व्यक्त केले होते.


नीरेवर बांधण्यात आलेल्या वीर धरणाची पाणी क्षमता २३.५० टीएमसी इतकी आहे. गेली वर्षी वीर धरण क्षेत्रात ४७८ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे दोन महिन्यात वीर धरण सलग तीन वेळा ओव्हर फ्लो झाले होते. यानंतर तब्बल दोन वर्षानंतर वीर धरणातून सलग तीन वेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे नदीच्या परिसरातील दुष्काळ हटल्याची चिन्हे दिसत होती. यावर शेतकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला होता. जलयुक्त शिवारच्या कामामुळे संपूर्ण नदी खोऱ्यातील पाणलोक्षेत्र आणि भूजलाची पातळी वाढली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात देखील नदीला भरपूर पाणी असल्याचे पाहायला मिळत होते. तसेच नदीकाठच्या परिसरात झालेल्या वृक्ष लागवडीमुळे मृदा संवर्धनाबरोबरच सगळीकडे हिरवळ देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे सगळीकडे एक सुखद वातावरण निर्माण झाले आहे. याचा गावकऱ्यांबरोबरच, प्रवासी आणि वारीला येणाऱ्या वारकऱ्यांनी देखील फायदा झाला आहे.


राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्यातील पाणीसाठा वाढणे गरजेचे आहे. व यासाठी भूजलाची क्षमता वाढवणे गरजे आहे. ही गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही महत्त्वकांक्षी योजन संपूर्ण राज्यभर हाती घेतली आहे. या योजनेमार्फत नागपूर ते मुंबईपर्यंत मोठ्या प्रमाणत कामांची पूर्तता झाली आहे. यामुळे राज्यातील पाणी साठा तर वाढला आहेच, पण राज्यातील हंगामी नद्या देखील बारा ही महिने वाहताना दिसत आहेत. जलयुक्त शिवारचे हे कार्य असेच सुरु राहिल्यास राज्यात पुन्हा कधीही दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही.