गोष्ट एका मराठमोळ्या गांधीची...

    दिनांक  30-Jun-2017   
 

 
 
त्यांना पहिल्यांदा भेटलो. व्हिझिटिंग कार्डवर नाव वाचलं. थेट राष्ट्रपित्याशी नातं सांगणारं आडनाव. या आडनावाचा करिष्मा म्हणा किंवा आणखी काय, पण पहिल्याच भेटीत त्यांची ती शांत, स्थितप्रज्ञ मुद्रा त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण करून गेली. त्यानंतर अनेक उद्योजकांच्या तोंडून त्यांच्या स्वभावाच्या चांगुलपणाचे, व्यवसायातल्या कष्टप्रद प्रवासाचे अनेक किस्से ऐकले. मग मात्र या शांत चेहर्‍यामागचा दडलेला उद्योजकीय प्रवास जाणून घ्यायची इच्छा झाली. त्यांना भेटलो. अगदी अदबीने त्यांनी स्वागत केले. खरंतर अर्ध्या तासाची भेट ठरली होती. मात्र, त्यांच्या उद्योजकीय प्रवासाचे एकेक किस्से, आलेल्या समस्या, त्यावर केलेली मात हे सारं ऐकता ऐकता दोन तास कधी निघून गेले कळलंच नाही. ६५० रुपये पगाराच्या नोकरीने सुरुवात, नंतर २०० चौरस फूट जागेत सुरू केलेली फॅक्टरी आणि निव्वळ २० वर्षांत सहा कोटी रुपयांची उलाढाल हे सारंच अतर्क्य होतं. हे करून दाखवलंय प्रमोद गांधी यांनी...
 
मुंढर... गुहागर तालुक्यातील एक छोटंसं गाव. या गावात प्रमोद गांधी यांचा जन्म झाला. बाबा गावचे पोलीस पाटील, तर आई गृहिणी. २ भाऊ आणि ३ बहिणी असा परिवार. सहावीपर्यंतचं शिक्षण गावच्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. कोकणातला घरटी एक माणूस मुंबईत असतो, हा जवळपास अलिखित नियमच आहे. प्रमोदचे मोठे भाऊ, सुरेश गांधी मुंबईमध्ये गिरगावात राहायचे. त्यांचा १९८० पासून मेलिंग मशीनचा व्यवसाय होता. मेलिंगचा म्हणजे बँका, विमा कंपन्या यांची कार्यालयीन पत्रे पोस्टामार्फत पाठविण्याचा त्यांचा व्यवसाय होता. १९८६ साली प्रमोद सहावीनंतर पुढील शिक्षणासाठी भावाकडे मुंबईत आला. दहावी नंतर प्रमोदने सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये जायला लागल्यानंतर तो भावाच्या कंपनीत कामाला लागला. भावाने मात्र त्याला थेट केबिन वगैरे न देता महिना ६५० रुपये पगारावर कामगार म्हणून कामावर घेतलं. कुशल कामगारांना त्यांच्या कामात मदत करणं, आलेला माल गाडीतून उतरवणं, नवीन माल भरणं अशा कामांसोबतच पडेल ती कामे प्रमोदला करावी लागत. सकाळी कॉलेज आणि रात्री १२ - १२.३० पर्यंत काम हे जणू अंगवळणीच पडलं होतं. सुरुवातीला प्रमोदला भावाने असं काम दिलं म्हणून राग यायचा. आज मात्र त्या कामाचं मोलं त्याला पटतंय.
 
कॉमर्स पदवीच्या पहिल्या वर्षानंतर प्रमोदने कॉलेजला रामराम ठोकला. शिक्षणात नाही, पण व्यवसायात तो स्थिरावू शकतो, हे सुरेश दादांनी हेरले. प्रमोद आता सगळी कामे चोखपणे करू शकतो, हा विश्वास आल्यानंतर सुरेश दादांनी प्रमोदला स्वत:चा व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले. २०० चौरस फूटांची जागा मिळाली. तिथेच मेलिंगची कामे सुरू केली आणि ‘परफेक्ट सर्व्हिसेस’चा जन्म झाला. संबंधित उद्योगामधील सखोल माहिती, कुशलता या जोरावर काहीच दिवसांत प्रमोदचा जम बसला. खरंतर भावाकडे कामगार म्हणून केलेल्या कामाचा इथे फायदा झाला. खुले समभाग बाजारात आणणार्‍या कंपन्यांची कामे प्रामुख्याने ‘परफेक्ट सर्व्हिसेस’ करत असे. २००४ साली आजूबाजूच्या परिसरातील जवळपास १०० कुटुंबांना प्रमोदने रोजगार दिला. मात्र, आधुनिक तंत्राने या व्यवसायावर आणीबाणीची परिस्थिती उद्भवली. डिमॅट अकाऊंट आल्याने पत्रव्यवहार थंडावला. सर्वच पत्रव्यवहार ऑनलाईन होऊ लागला. याच्याच जोडीला बँका आणि विमा कंपन्यांनी देखील इनहाऊस मेलिंग चालू केलं. यामुळे व्यवसाय कमी झाला. मात्र, जिथे आव्हान आहे, तिथे संधी पण असतेच. ही संधी होती प्रिंटिंगची...
 

 
२००७ मध्ये प्रमोद गांधींनी प्रिंटिंग व्यवसायाला सुरुवात केली. प्रिंटिंग आणि मेलिंग अशा सेवा एकाच छताखाली मिळू लागल्याने विस्कळीत झालेला ग्राहक पुन्हा गांधींकडे वळला, तर काही बँका, विमा कंपन्या, बेस्टची विद्युत देयके, रिटेल इंडस्ट्रीमधील शॉपर्स स्टॉप, पॅन्टलूनसारखी दुकाने नव्या ग्राहक यादीत समाविष्ट झाली. दरम्यान कारखानादेखील विस्तारला. आज एमआयडीसी, अंधेरी येथे दहा हजार चौरस फुटांमध्ये ‘परफेक्ट सर्व्हिसेस’चा कारखाना आहे. या कारखान्यात १०० हून अधिक कर्मचारी कार्यरत असून दररोज दोन ते तीन लाख पत्रे टपाल केली जातात. त्याचप्रमाणे तब्बल १० लाखांच्या ५ मशीन्स आज ‘परफेक्ट सर्व्हिसेस’कडे आहेत. ६५० रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आज सहा कोटी रुपयांच्या उलाढालीवर पोहोचलाय. लवकरच ही उलाढाल १० कोटींवर झेपावणार आहे.
 
कोकणातलं जेवण रुचकर असतं. विशेषत: माशांचं जेवण अप्रतिमच! कोकणातील या अस्सल कोकणी पदार्थांची चव मुंबईकरांना मिळावी म्हणून प्रमोद गांधींनी ’कोकण कट्टा’ नावाचं हॉटेल सुरू केलं आहे. त्यांची पत्नी प्रियांका गांधी या संपूर्ण हॉटेलची जबाबदारी सांभाळतात. इथे देखील थेट हॉटेल सुरू न करता प्रियांका गांधींनी एक कॅन्टीन चालविण्यास घेतले. वर्षभर उत्तमरित्या कॅन्टीन चालविल्यानंतर त्या हॉटेल उद्योगात उतरल्या. भविष्याचा विचार करून गांधी दाम्पत्याने आपला मुलगा विक्रांत याला हॉटेल व्यवस्थापनाचे धडे गिरविण्यास चेन्नई येथे पाठविले आहे. काही वर्षांतच विक्रांत तरबेज होऊन हॉटेल व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळेल. ‘‘मराठी मुलांनी नोकरी न करता छोटा उद्योग सुरू करावा. कष्टाने, कौशल्याने व्यवसाय वाढवावा, अचूक संधी हेरण्याचं कौशल्य आणि बाजारपेठेचा अंदाज या दोन गोष्टींमुळे व्यवसायात यश मिळतेच. आयुष्यात शॉर्टकट न वापरता चिकाटीने व्यवसाय केल्यास यश तुमचेच आहे,’’ असे गांधी सांगतात.
 
असे हे मराठमोळे कोकणातल्या मातीतले गांधी... ‘गांधी’ नावातल्या साधर्म्यामुळे त्यांना बहुतांश लोक गुजरातीच समजतात. मात्र, या मराठमोळ्या गांधीने गुजराती बांधवांची व्यावसायिकता अंगी बाणवली आणि आपण देखील ‘परफेक्ट’ उद्योजक होऊ शकतो, हे सिद्ध केले. 
 
- प्रमोद सावंत