दुर्ग भ्रमंती - कळसूबाई शिखर

30 Jun 2017 18:02:58

 


महाराष्ट्रात असलेल्या गिरीदुर्गांच्या सोबतच सह्याद्रीच्या पर्वतराईत काही पर्वत शिखरे आहेत. त्यामध्ये पश्चिम घाटातील (सह्याद्री पर्वत रांगेतील) सर्वोच्च शिखर. कळसूबाई. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. कळसूबाई शिखराच्या परिसरात भंडारदरा धरण, रंधा धबधबा आणि इतर ही निसर्ग सौंदर्याने मनमोहक करणारी काही ठिकाणे आहेत.

 

पुण्याहून किंवा मुंबईहून संगमनेरला आल्यानंतर, संगमनेरहून अकोलेमार्गे बारी गावातून कळसूबाई शिखरावर जाता येते. नाशिककडून आल्यानंतर नाशिक - इगतपुरी मार्गावरील घोटी या गावापासून घोटी - भंडारदरा मार्गावर बारी हे गाव लागते. बारी गाव म्हणजे कळसुबाईचा पायथा. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी पायवाट आहे. या भागात कोळी महादेव या जमातीचे आदिवासी आहेत. येथील आदिवासी समाजाचा भातशेती करणे आणि भंडारदरा धरणाजवळ मासेमारी करणे हे मुख्य व्यवसाय आहेत.

 

कळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. पश्चिम घाटातील सह्याद्रीच्‍या पर्वत रांगेत पाच हजार फूटांवर तीन शिखरे आहेत. कळसूबाई (१६४६ मीटर), ‘साल्हेर’ वर असलेले ‘परशुराम मंदिर’ चे शिखर (१५६७ मीटर) आणि मुडा शिखर (१५३२ मीटर). त्यानंतर तोरणा आणि इतर शिखरांचा क्रमांक लागतो.

 

कळसूबाई शिखराबाबत :

महाराष्ट्रातील सर्वोच्च ठिकाण असलेल्या कळसूबाई शिखरावर कळसूबाई देवीचे मंदिर आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शिखरावर सर्वत्र धुक पसरलेलं असतं. शेजारी उभा असलेला माणूस देखील दिसतं नाही. येथे केशरी रंगातील एक छोटंसं कळसुबाईच मंदिर आहे. शिखरावर मंदिराशेजारी खडकात रोवलेला त्रिशुळ आणि त्या शेजारी खांबाला बांधून ठेवलेल्या घंटा आहेत. कळसुबाईच्या मंदिरात स्‍थानिक लोकांकडून पूजा केली जाते. नवरात्रीत आणि दसऱ्यामध्ये शिखरावर उत्‍सव साजरा केला जातो.

 

 


कळसूबाईया नावाचा इतिहास :

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरास कळसूबाई हे नाव का देण्यात आले, या विषयीची दंतकथा प्रचलित आहे. पूर्वी आदिवासी जमातीतील कळसू नावाची एक कोळ्याची मुलगी होती. कळसूबाई या उंच डोंगरावर जाऊन राहू लागली. त्यामुळे या डोंगरास कळसुबाईचा डोंगर हे नाव प्रचलित झाले. कळसुबाईशी संलग्न काही काल्पनिक घटनांवर  थाळेमेळ आणि काळदरा या नावाने ओळखली जाणारी दोन ठिकाणे पायथ्याशी आहेत. काही दंतकथांनुसार कळसूबाईने या उंच शिखरावर देहत्‍याग केला. त्‍यामुळे हे शिखर तिच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेथे तिचे मंदिर उभारण्‍यात आले असे म्हटले जाते.

 

दि किंग ऑफ डेक्कन हिल्स’ : इंग्रज सरकारच्या काळात रात्रीच्या वेळेस शिखरावर एका इंग्रज अधिकाऱ्याने चढाई केली. त्यावेळी त्याने धुक्यामध्ये सुर्योदयावेळी शिखरावरून सूर्योदय पाहिला. त्‍यावेळी त्या इंग्रज अधिकाऱ्याने कळसुबाई शिखरास ‘दि किंग ऑफ द डेक्कन हिल्स’ असे म्हटले! अशी आख्यायिका आहे. भंडारदरा आणि इगतपुरी परिसरात इंग्रज अधिकाऱ्यांचा रहिवास असल्यामुळे या शिखराची त्यावेळी सर्वांना ओळख झाली असावी, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

 

कळसूबाई भ्रमंती : शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावातून शिखराकडे जाण्यासाठी बैलगाडी रस्ता तसेच पायवाट आहे. पायथ्याच्या गावातून शिखराची उंची लक्षात येत नाही. परंतु शिखराकडे जात असताना अर्ध्यापर्यंत बैलगाडी रस्ता, पायवाट आणि पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली वाट आहे. बारी गावातून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर एक हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिरामागील बाजूने कळसूबाई शिखराकडे जाण्यासाठीची वाट आहे. शिखराकडे जात असताना मन मोहून टाकणारा निसर्ग, डोंगर उतारावरून खाली वाहणारा पाण्याचा प्रवाह पाहून शिखराकडे जाण्याची ओढ लागते. शिखराकडे जात असताना जसे जसे आपण उंचावर जावू तसे तसे भात शेती दिसू लागते. तसेच परिसरातील निसर्गाचे चैतन्य निर्माण करणारे सौंदर्य आकर्षक वाटू लागते.

 

अद्भुत, आनंददायक आणि मन प्रसन्न करणारी भ्रमंती असल्याचा अनुभव वाढत जातो. वाट काढत काढतं शेताच्या बांधावरून भात शेतांमधून आपण एका पाठरासारख्या सपाट तळावर जावून पोचतो. या पुढे शिखराचा खरा प्रवास सुरु होतो. लोखंडी कडे असलेल्या पायऱ्या, शिड्या आणि कुठे कुठे रेलिंग सुद्धा असा हा प्रवास शिखरापर्यंत जातो.

 

शिखरावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी शिड्या खूप जुन्या नाहीत, तसेच जास्त जीर्ण देखील झालेल्या नाहीत. शिड्यांच्या पायऱ्या काहीशा अरुंद आहेत, परंतु लांबीला जास्त आहेत. त्यामुळे गर्दी न करता, सावकाशपणे चढाई करावी लागते. पायऱ्या आणि लोखंडी शिडीमुळे चढाई अधिक सोपी आणि जलद होते. परंतु शिडी शिवाय चढाई करणे विचार सुद्धा करवत नाही. असा उभा कातळ कडा याठिकाणी आहे. शिडी चढून गेल्यानंतर एका ठिकाणी कातळात कोरलेली पावले दिसतात. ही पावले कळसुबाईची असल्याची गावकरी सांगतात.  शिड्या आणि अवघड वळणे चढून वरती गेल्यानंतर शिखराचा माथा दिसू लागतो. थोडेसे धुके, थोडा पाऊस अशा वातावरणात हा आपला प्रवास सुरु असतो. शिखराकडे पावसाळ्यात जाण्याची मज्जा वेगळीच असते. अचानक धो धो पाऊस, तर कधी प्रचंड धुक असा अनुभव येतो. आपण ढगांमधून जात आहोत, असा भास होतो.

 

शिखराकडे जात असताना शेवटच्या टप्प्यात एक विहीर आहे. या विहिरीजवळ एक हॉटेल आहे. याठिकाणी पावसाळ्यात सतत पाऊस आणि धुक असतं. यापुढे अखेरची शिडी थोडी जास्त उंच आहे. शेवटची शिडी चढत असताना धुक आणि पावसाच्या खेळामध्ये आजुबाजूला दूरवर दिसणाऱ्या आणि हिरवाईने नटलेला परिसर पाहून आपण स्वर्गातच आलो आहोत, असा भास होतो. त्यात तुम्ही सुर्योदयावेळी याठिकाणी असाल तर प्रश्नच नाही. शेवटच्या टप्प्यात शिडीवर चढून, वर गेल्यानंतर पूर्वेकडे विश्रामगड आणि अलंग- मलंग- कुलंग दिसतात. तर उत्तरेकडे रामसेज, हरिहरगड, ब्रम्हगिरी, अंजनगिरी हे गड दिसतात. दक्षिणेकडे दूरवर हरिश्चंद्रगड, रतनगड आणि कात्राबाईचा डोंगर दिसतो. शिखरावरून भंडारदऱ्याचा विस्‍तीर्ण जलाशय देखील दिसतो. परंतु ही सर्व ठिकाणे दिसण्यासाठी परिसरात धुके आणि पाऊस नसावा, तरच ही सर्व ठिकाणे दिसू शकतात. शेवटी शिखरावर पोचल्यानंतर समोर कळसुबाईच मंदिर पाहुन शिखर सर केल्याचा आनंद खूप दिलासादायक असतो. आपण काही तरी वेगळं आणि खूप छान केलं आहे असा भास होतो.

 

कळसूबाई शिखरावर भ्रमंती केल्यानंतर आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केल्याचा अनुभव घेवून परतीच्या वाटेने चालत असताना आपण खूप समाधानी आणि तेवढेच उत्साही असतो. खाली पायथ्याशी आल्यानंतर भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा याठिकाणी होणारा सूर्यास्त अनुभवता येतो. शेवटी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर जावून आल्याचा अनुभव आणि समाधान घेवून आपण परत फिरतो.

- नागेश कुलकर्णी

Powered By Sangraha 9.0