क्रौर्य इथले संपत नाही...

    दिनांक  30-Jun-2017   

 
’इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेच्या क्रूरकर्म्यांनी आपण दानवाचे वंशज असल्याचे पुनश्च सिद्ध केले. या जागतिक दहशतवादी संघटनेकडून एका यझिदी समुदायाच्या असाहय्य मातेवर तीन दिवस बलात्कार केल्यानंतर तिला अक्षरशः तिचेच बाळ शिजवून खाऊ घातल्याचा निर्घृण, किळसवाणा आणि पराकोटीचा अमानवीय प्रकार नुकताच उघडकीस आला. दगडालाही पाझर फुटेल, अशी क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या या कृतीमुळे मानवता आणि संवेदनशीलतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. ‘इसिस’च्या तावडीत सापडलेल्या महिलांवर नेहमीच अनन्वित अत्याचार केले जातात, त्यांना ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून वागवले जाते. यझिदी तर ‘इसिस’च्या नराधमांना दानव पूजकच मानतात. परंतु, आताच्या या कृतीने खरे दानव पूजक ‘इसिस’चे म्होरके आणि त्या संघटनेचे समर्थक, दहशतवादी, पाठीराखे हेच असल्याचे स्पष्ट होते. ‘इसिस’च्या हैवानी कृत्यांचा नंगानाच सीरिया, इराक, लिबिया आदी देशांमधील निष्पाप नागरिकांनी सहन केला. आता या संघटनेच्या सर्वनाशासाठी जगातील बडी राष्ट्रे पुढे सरसावली असली तरी ही संघटना दररोज काही ना काही काळी कृत्ये करत असल्याचेच समोर येते. यातून खरंच कोणाला ‘इसिस’च्या राक्षसाला संपविण्याची इच्छा आहे की, त्या संघटनेच्या समर्थन-विरोधातून आपला स्वार्थ साधायचा आहे, असा प्रश्न पडतो. रशिया किंवा अमेरिका दोघेही ‘इसिस’ला नष्ट करण्याची भाषा करतात, मात्र या दोघांमध्ये याबाबत एकमत होत नाही. आखाती देशही यामध्ये स्वतःची कातडी वाचवूनच भाग घेतात. अशावेळी ही सैतानी पिलावळ आणखी किती दिवस धुमाकूळ घालणार? जगभरातून आणि भारताच्या केरळातूनही अनेक तरुण ‘इसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी गेल्याचे गेल्या काही दिवसांतील घडामोडींतून दिसते परंतु, ‘इसिस’कडे तरुण आकर्षित का होतात, यावर विचार नव्हे तर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता आली आहे. ‘इसिस’केवळ अशी कृत्ये करूनच थांबत नाही तर यझिदी समुदायातील महिला-बालके यांना पकडून त्यांचे धर्मपरिवर्तनही करते, त्याला नकार दिल्यास त्यांना ठार मारले जाते. त्याचबरोबर महिलांना बाजारात विकलेही जाते, त्यामुळे या संघटनेची पाळेमुळे खणून काढून ठेचण्याची वेळ आली आहे, हे खरेच.
 
00000000000 
 

 
सायबर दरोडेखोरी
 
गेल्या काही वर्षांत माहिती-तंत्रज्ञान, संगणक, इंटरनेट आदी तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होताना दिसते, परंतु या प्रगतीसोबतच यातून दरोड्यांचा अत्याधुनिक प्रकारही समोर आला आहे. कॉम्प्युटर व्हायरसची लागण याआधीही संगणकात होत होती, मात्र त्यांचा उद्देश केवळ तेथील यंत्रणा ठप्प पाडण्यापुरता असे. पण आता जसजसे तंत्रज्ञान पुढे जात आहे, तसतसे या व्हायरसच्या हल्ल्यांतून खंडणीच्या माध्यमातून पैसा वसूल करण्याची वृत्तीही अतिशिक्षितांमध्ये वाढत आहे. कारण काल-परवाच जगातील अनेक देशांत रॅन्समवेअर या व्हायरसने संगणकविश्वास धुमाकूळ घातल्याचे अवघ्या जगाने पाहिले. अनेक प्रगत देश जसे की, अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी यांच्या संगणक प्रणालीवर या व्हायरसचा हल्ला झाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात झळ पोहोचली. कित्येक ठिकाणी कामकाजही ठप्प झाले. विविध क्षेत्रांतील बड्या कंपन्यांनाही या हल्ल्याची बाधा झाली. तसेच पुणे-मुंबईतील कंपन्यांनाही या व्हायरसने बेजार केले. कंपन्यांच्या संगणक सॉफ्टवेअर प्रणालीवर हल्ला करून त्यांच्याकडून कोट्यवधी डॉलर्सची खंडणी मागणे, हा या हल्ल्यांमागचा हल्लेखोरांचा उद्देश असतो, तर ही खंडणी बिटकॉइनच्या रूपात मागितली जाते. खंडणी देऊनही चोरलेली वा ज्यावर हल्ला झाला आहे, ती माहिती पुन्हा मिळेल की नाही याचीही हमी हल्लेखोर देत नाहीत. आतापर्यंत तलवार, चाकू, बंदूक, बॉम्ब वा आत्मघाती हल्ल्यांच्या माध्यमातून समाजस्वास्थ्य बिघडवून टाकण्याचे काम गुन्हेगारांकडून केले जाई, आता मात्र त्यांनी हल्ल्यांचा हा नवा प्रकार आणला आहे. अशा हल्ल्यांतून केवळ ती कंपनीच नव्हे तर लाखो लोकांना फटका बसण्याची शक्यता असते. याचा वापर करून भविष्यात शत्रूराष्ट्रे सायबर युद्धेही छेडण्याची शक्यता बळावते. अशा वेळी प्रत्येक देशाने आणि कंपनीने आपल्याकडील संगणक, माहिती आणि सॉफ्टवेअर प्रणालीचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक ठरते. यासाठी सरकारनेही प्रयत्न करायला हवेत. तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांनी असे हल्ले होऊ नयेत किंवा सायबर हल्लेखोरांना अटकाव करण्यासाठी या विरोधात कृती करणे महत्त्वाचे आहे. आपली संगणकप्रणाली जास्तीत जास्त सुरक्षित कशी होईल, याचाही विचार करायला हवा. सध्या जवळपास सर्वच जग इंटरनेटच्या जाळ्याने जोडले आहे, तर अनेक कागदपत्रे, दस्तावेज, सरकारी कार्यालये, बँका, कंपन्या सर्वच डिजिटलीकरणाकडे वळत आहेत, अशावेळी या सायबर हल्ला आणि संगणक सुरक्षिततेबद्दल सर्वांना माहिती असणेही तितकेच गरजेचे आहे. तसेच नवीन पिढीला याची माहिती करून देणे हीदेखील बदलत्या काळाची गरज असल्याचे स्पष्ट होते.
 
- महेश पुराणिक