शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे - जिल्हाधिकारी

    दिनांक  03-Jun-2017सेंद्रीय शेतमालाच्या उत्पादनाला जगभरात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज धान्य महोत्सवाचे उद्घाटन करताना केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर नियोजन समिती सभागृहात सेंद्रीय शेती या विषयावर कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहु. संस्था सावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


सेंद्रीय शेतीची कास धरल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निश्चितच कमी होणार असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, शेतीला जोडधंदा असायला पाहिजे. दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मधुमक्षिका पालन आदींसह शेतीशी निगडीत व्यवसाय करावे. शेळीपालन व एकंदरीतच पशुसंवर्धनाशी निगडीत योजनांचा लाभ घ्यावा. सेंद्रीय शेतमालाच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र जिल्ह्यात निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.