खानाची खानदानी खोड

    दिनांक  29-Jun-2017   
 

 
   
’वाचाळवीर’ या शब्दालाही स्वत:ची खरं तर लाज वाटावी, अशी एका खानदानी खानाची कुंठलेली खोड अधूनमधून बेताल बरळून जाते. ही महान हस्ती म्हणजे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान. एका राजकीय पक्षाच्या सदस्याने, जे बोलणे कदापि अपेक्षित नाही, जे सत्याच्या आसपासही फिरकत नाही, अशा कपोलकल्पित कथा रंगविण्यात या खानांचा हात कुणी धरूच शकत नाही. चारित्र्याबरोबरच जिभेचा तोल तर आझम मियॉंचा फार पूर्वीच ढासळलेला! आता तर त्यांची जिव्हा अशा खालच्या थरांच्या वक्तव्यांचीच जणू धनी झालेली... पण यंदा कळस म्हणजे, या ‘खानदानी’ फुत्कारांनी थेट लष्कराच्या चारित्र्यशीलतेला आव्हान देत जम्मू-काश्मीरच्या महिलांनी भारतीय सैनिकांकडून बलात्काराचा बदला घेत त्यांच्यावर हल्ला करत त्यांची गुप्तांग कापल्याचा धक्कादायक निराधार आरोप आझम खानने केला. कुठलाही पुढचा-मागचा विचार न करता नेहमीप्रमाणे त्यांनी जीभ सैल सोडली आणि हल्लीच्या टीकाकारांच्या प्रथेप्रमाणे थेट लष्करावरच गलिच्छ आरोपांची चिखलफेक केली. आझम खान म्हणतो, ‘‘एकीकडे सीमेवर युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे काश्मिरी महिला भारतीय सैनिकांवर हल्ला करून बलात्काराच्या घटनांचे सूड उगवत आहेत. भारताला लाज वाटली पाहिजे, हा देश आता जगाला कुठल्या तोंडाने सामोरे जाणार आहे?’’ पण असे निलाजरे विधान करणार्‍या आझम खानांना याच सैनिकांनी पूरपरिस्थितीशी झगडून काश्मीरवासीयांना केलेल्या अविरत मदतीची मात्र जराही भ्रांत नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणेच मुळी गैर आहे म्हणा, पण कुठल्याही पुराव्याविना सैनिकांवर असे लांच्छनास्पद आरोप करण्यापूर्वी आझम खानने स्वत:च्या आणि बलात्काराचे आरोप असलेल्या गायत्री प्रजापतीसारख्या नेत्यांना शह देणार्‍या समाजवादी पक्षाच्या गिरेबानमध्ये एकदा झाकून बघावे. पण म्हणा, देशाला भगव्या आणि हिरव्या रंगात तोडायला निघालेल्या आझम सारख्या मुर्दाडांना धर्मनिरपेक्षता, ‘राष्ट्रीय एकात्मता’ या मूल्यांचेच मुळात वावडे. कारण, यापूर्वीही एकदा ‘‘१९९९ सालचा ऐतिहासिक कारगील विजय फतेह करणारे ते हिंदू सैनिक नव्हतेच, तर मुस्लीम सैनिकांनीच ‘कारगील’च्या डोंगरांवर विजय मिळवला होता,’’ असे हझम न होणारे विधान या आझमने केले होते. तेव्हा, कन्हैय्या कुमारने २०१६ साली भारतीय सैन्यावर केलेल्या त्याच आरोपांची ‘री’ ओढून आझम सारख्यांना काय सिद्ध करायचे आहे, ते त्यांच्या अल्लालाच ठाऊक! 
 
 
आझमवादी निर्बुद्धता

नैतिक-अनैतिक याच्याशी काहीही देणे-घेणे नसणार्‍या वाचाळवीरांचे शहजादे असलेल्या आझम खानचा राजकीय प्रवासही असाच बेडूक उड्यांसारख्या एका पक्षातून दुसर्‍या पक्षात डरॉंव डरॉंव करणारा. जनता दल, लोक दल, जनता पार्टी आणि नंतर मुस्लीम धार्जिण्या समाजवादी पक्षात रामपूर मतदारसंघाचे नेतृत्व करणार्‍या आझम खानच्या करतुदी वाचल्या, ऐकल्या की खरंच अशी बेमुवर्तखोर माणसाची कोणा राजकीय पक्षाला गरज भासावी, याचेच आश्चर्य वाटते. उदाहरणा दाखल हेच घ्या ना, त्यांच्याच पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्याबद्दल आझम बरळले होते, ‘’मुलायमसिंहांची मर्दानगी ही फक्त रामपूरमध्येच. कारण, इथून बाहेर ते ‘तृतीयपंथीय’च (त्यांनी उच्चारलेला शब्द वापरु शकत नाही म्हणून!)आहेत,’’ इतके खालच्या थराचे, राजकीय परंपरेलाही लाजवेल, असे विधान करणारे आझम आजही त्याच पक्षाच्या छत्रछायेखाली सुखेनैव नांदताहेत. तेव्हा काय म्हणावे त्या पक्षाच्या दिलदार नेतेमंडळींना, ज्यांनी अशी कीड आपल्याच शिवारात पाळली... मोठी केली...
 
जे आपल्या राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची आब राखत नाहीत, ते आपल्या समाजाचे तरी काय होणार म्हणा! होय, हिंदूद्वेष असला तरी मुस्लिमांविषयीही या आझम साहेबांना फार कळवळा आहे, यातला भाग नाही. मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येविषयी एकदा आझम म्हणाले होते, ‘‘आम्ही गरीब लोकं आहोत म्हणून जास्त मुलांना जन्माला घालतो. काही कामच नसतं आणि आमच्या बायकाही क्लबमध्ये जात नाहीत, मैत्रिणींबरोबर मैफल सजवत नाही. मग बिवी आणि शौहर एकटे अजून करणार तरी काय...’’ आता बोला, ज्याला जनाची, मनाची लाजच नाही, तो या देशाचे जीवावर बेतून संरक्षण करणार्‍या सैनिकांविषयी कौतुकोद्गार काढेल, याची अपेक्षाच करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा. पण किमान चार शब्द चांगले बोलता येत नाही, म्हणून अद्वातद्वा काहीही बेछूट बोलत सुटायचे, हीच या निर्बुद्धाची निव्वळ सवय. ईदच्या चंद्राप्रमाणे एकाएकी उगवायचे आणि आपल्या मनातल्या अंधाराचा काळोख जगत्‌सत्य म्हणून मिरवायचा, हीच त्याची वृत्ती. तेव्हा, ’’स्मृती इराणींचा बंगला आणि पंतप्रधानांचे निवासस्थान जोडणारे एक भुयार आहे,’’ अशी कमरेखालची विधाने असो वा २०१६ मधील उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील अल्पवयीन मुलगी व तिच्या आईवर झालेल्या बलात्काराच्या घटनेला आधी राजकीय रंग देऊन नंतर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला माफीनामा असो, आझमच्या कुकृत्यांचे हेच कारनामे जहन्नूमचे दार ठोठावायला पुरेसे नाही का?
 
 
- विजय कुलकर्णी