भारतात क्रीडा क्षेत्र म्हटलं की त्याची सुरूवात क्रिकेट पासून होते आणि शेवटही तिथेच येऊन थांबतो. याच्या मध्ये आधे कधी एखाद्या खेळाविषयी चित्रपट, शॉर्टफिल्म वैगेरे निघाल्या तर तेवढ्यापुरतं तो खेळ किंवा संबंधित खेळाडू लोकांना माहित होतो आणि पुढे पुन्हा पहिले पाढे क्रिकेटचेच... ‘चक दे इंडिया’ नंतर क्रिकेट बरोबर आपल्या देशात हॉकी हा खेळही खेळला जातो हे तमाम भारतीयांना कळालं (जरी तो आपला राष्ट्रीय खेळ असला तरी). त्यानंतर ‘भाग मिल्खा भाग’मुळे मिल्खा सिंग सारखा धावपटू प्रकाशझोतात आला. प्रियांकाच्या ‘मेरी कोम’ने मेरी कोमचे बॉक्सिंगचे स्पिरीट देशासमोर मांडले आणि अगदी आत्ता आत्ता ‘दंगल’मधून फोगट भगिनींचे कुस्ती प्रेम चित्रपटांमुळेच तर भारतीयांच्या लक्षात आले. आजपर्यंत कधी ना हार्दिक पांड्यावर चित्रपट आला ना कधी विराट कोहलीवर साधी शॉर्टफिल्म प्रसिद्ध झाली. पण तरीदेखील हे खेळाडू रातोरात स्टार बनले. पण या सगळ्या भाऊगर्दीत निश्चय लुथ्रा या भारतीय युवकाने क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी अचाट करणारी आहे आणि दुर्दैवाने याकडे अद्याप कोणाचेही लक्ष गेलेले नाही.
मुळ दिल्लीचा निश्चय लुथ्रा हा भारताचा एक ‘फिगर स्केटर’ आहे. आजमितीला तो केवळ 18 वर्षाचा एक तरूण आहे. पण तरीदेखील त्याच्या महत्त्वकांक्षा चट्टाणाएवढ्या आहेत. निश्चयने वयाच्या 10व्या वर्षीच ‘रोलर स्पीड स्केटिंग’ला सुरूवात केली होती. आपल्या मुलामधील स्पार्क त्याच्या आईने ओळखला व त्याच्यासाठी एक चांगला कोच तिने शोधून काढला. या शोधातून वासुदेव तंडी यांच्याशी संपर्क आला व तंडी यांनी भारतातल्या या ‘निश्चय’रूपी हिर्यास आज अक्षरश: घडविले आहे. निश्चयने अवघ्या आठ वर्षात राष्ट्रीय पातळीवर 9 सुवर्ण, 3 रूपेरी व आंतरराष्ट्रीय पातळीवर 1 सुवर्ण व रूपेरी आणि 2 रजत पदकांची कमाई करून विक्रम नोंदविला आहे.
निश्चयबाबत आज अचानक चर्चा करण्याचे कारण म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर #FanTheFire हे ट्रेंडिंग होत आहे. या हॅशटॅगद्वारे अॅडिदासनी निश्चयच्या समर्थनार्थ तयार केलेला एक व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचबरोबर ट्विटर अकाऊंटवरील आपले ‘डिस्प्ले’नाव बदलून त्याला सपोर्ट करण्याचे आवाहनही सोशल मीडियावरून केले जात आहे. खरतर या कॅम्पेनमुळे निश्चय लुथ्रा खर्या अर्थाने प्रकाशझोतात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यास रोज पहाटे तीन वाजता उठून तो करत असलेली मेहनत, त्याने आत्ता पर्यंत मिळविलेले यश, त्याच्या आईचे स्वप्न आणि भारताचे या खेळात नाव उज्ज्वल करण्याचे त्याचे उद्दिष्ट आपल्याला लक्षात येते. म्हणूनच प्रत्येक भारतीयाने हा व्हिडिओ आवश्य बघितला पाहिजे व तो अभिमानाने शेअर देखील केला पाहिजे.
रणवीर सिंग, रोहित शर्मा, रविंद्र जड्डेजा यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी या कॅम्पेनला सपोर्ट करीत आपापल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भाने पोस्ट केल्या आहेत. एकंदरीतच काही दिवसांपूर्वी प्रकाशझोतात नसलेला निश्चय सोशल मीडियाच्या निमित्ताने का होईना आपल्या समोर आला आहे.
शिमला येथे 2011 मध्ये झालेल्या राष्ट्रीय आईस स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये निश्चयने आपल्या बहारदार खेळाने सुवर्ण पदक मिळविले होते. त्यानंतर त्याने पुढील स्पर्धेसाठी सातत्याने गुरगावच्या इंडोअर स्केटिंग रिंकमध्ये सराव केला. त्यानंतर झालेल्या 2013च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने वैयक्तिक व जोडी विभागात रूपेरी पदक मिळविले. लगेचच 2014मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत निश्चयची कामगिरी आणखी सुधारली व त्याने वरील दोन्ही विभागात चक्क सुवर्ण पदक मिळविले. त्याच्य वर्षी त्याच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉईंट आला. फिलिपाईन्स येथे झालेल्या ‘वर्ल्ड डेव्हलपमेंट ट्रॉफी’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रजत पदक मिळविले.
या घवघवीत यशानंतर मात्र निश्चियने ऑलिंपिकमध्ये खेळण्याचा ठाम ‘निश्चय’च केला. पण आईस स्केटिंग हा तांत्रिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला खेळ आणि त्यातच भारतात या खेळासाठी तितके अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने निश्चयने या खेळाच्या ट्रेनिंगसाठी ‘युएसए’ला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्याने सहा महिन्यांचे ट्रेनिंग घेतले पण पुन्हा तिच समस्या निश्चयच्या समोर येऊन उभी ठाकली. ती म्हणजे पैशांची. निश्चयची आई एका सरकारी नोकरीत असल्याने या खेळासाठी लागणारे आर्थिक पाठबळ ती निश्चयला देऊ शकली नाही. याकारणाने तो पुन्हा भारतात आला. अशातही त्याने 2016मध्ये झालेल्या राष्ट्रीय आईस स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदकांवर शिक्कामोर्तब केला. त्याचा खेळ दिवसेंदिवस बहरतच चालला होता. पण खरी समस्या होती ती आर्थिक पाठबळाची...
2018 मध्ये होणार्या विंटर ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याचे निश्चयचे स्वप्न आहे. आणि याच स्वप्नपूर्तीसाठी निश्चय व त्याच्या आईने तमात भारतीयांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. याच आवाहनाला साद देत कदाचित अॅडिदासने वरील व्हिडिओ बनविला असावा व त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे सोशल मीडियावरून हे कॅम्पेनदेखील सुरू असावे. आईस स्केटिंगसारख्या एका वेगळ्या क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव सर्वोच्च पदावर गेल्याचे तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही देखील निश्चय लुथ्राला आवश्य सपोर्ट करा!