कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित - पांडुरंग फुंडकर

    दिनांक  27-Jun-2017

 

कर्जमाफीचा लाभ बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या ५९ हजार ४५० शेतकरी खातेदार सभासदांना होणार आहे. अशी माहिती कर्जमाफी नंतर पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २८५.९४ कोटी रूपयांची कर्जमाफी झाली आहे. तसेच दीड लाखांहून अधिक कर्ज असलेल्या १ हजार ८७० शेतकऱ्यांचे ३५.९८ कोटी रूपयांची कर्जमाफी करण्याची मागणी आहे. या शेतकऱ्यांना २८.०५ कोटी रूपयांची रक्कम प्रत्यक्षात मिळणार आहे. अशाप्रकारे बँकेला या कर्जमाफीच्या निर्णयामुळे ३१७.५३ कोटी रूपयांचा लाभ होणार आहे असे ते यावेळी म्हणाले.

Embeded Object

राज्य शासनाने कृषी कर्जमाफी प्रक्रियेमध्ये दीड लाख रुपयांपर्यंत मर्यादा वाढवल्याने राज्यातील जवळपास ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, असे प्रतिपादन पांडुरंग फुंडकर यांनी केले. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे पहिल्यांदाच बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

 

कर्जमाफीच्या निर्णयामुळे राज्यात मेटाकुटीला आलेला शेतकरी सुखावला आहे. शासनाने सर्व तांत्रिक कारणे निकाली लावून सर्वंकष असा हा निर्णय घेतला आहे. कुठल्याही प्रकारच्या जमिनीची अट शासनाने यामध्ये न ठेवता सरसकट दीड लाख रूपयापर्यंतची कर्जमाफी दिली आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत २५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

कर्जमाफीमुळे बुलढाणा जिल्हा बँकेला नवसंजीवनी मिळेल - पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आशावाद

बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही आर्थिक अडचणीत असणारी बँक होती. मात्र नाबार्ड व केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीने बँक अडचणीतून बाहेर यायला लागली आहे. यावर्षी बँकेने सीआरएआर १०.८४ टक्के राखून चांगली कामगिरी बजावली आहे. कर्जमाफीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेला सर्वात जास्त लाभ मिळणार आहे. ही कर्जमाफी जिल्हा बँकेला मिळालेली नवसंजीवनी असल्याचे मत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, नाबार्डचे सुभाष बोंदाडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी याप्रसंगी जिल्हा बँकेच्या कृषि कर्ज वितरणाचा आढावा घेतला.