गर्व से कहो, हम हिंदू है...

    दिनांक  24-Jun-2017   
 
 


 
 
 
हिंदू संस्कृती ही केवळ अभिनिवेशाने मांडत राहण्याची गोष्ट नसून, समग्रपणे तपशीलवार समजून घेण्याची ती एक जीवनपद्धती आहे. मानवी जीवनाकडे निकोपपणे पाहण्याचा दृष्टिकोन हिंदू संस्कृती आपल्याला प्रदान करते. भारताचा ‘लिबरल’ सामाजिक व राजकीय गाभा याच हिंदूचिंतनाचे प्रतीक आहे. हिंदू जीवन परंपरेतील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी, भारतीय संस्कृतीच्या जाणकार, संस्कृत भाषेच्या अभ्यासक आणि २०१५ पासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या धर्म-तत्त्वज्ञान विभागाच्या पालक म्हणून कार्यरत ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौरी माहुलीकर यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी विजय कुलकर्णी यांनी घेतलेली ही प्रदीर्घ मुलाखत...
 

 
प्राचीन भारतीय संस्कृती इतर संस्कृतींपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण कशी ठरते ?
 
सृष्टीच्या इतिहासात जेव्हा इतर राष्ट्रांचा उदयही झाला नव्हता, त्या काळापासून भारतीय संस्कृती प्रचलित आहे. हजारो वर्षे झाली असली, संस्कृतीच्या विविध पैलूंबाबत मतमतांतरे असली तरी ती प्राचीन आहे, याबाबत सर्वांचे एकमत आहे. तेव्हा, ग्रीक, इजिप्शियन, सुमेरियन संस्कृतींबरोबर सिंधू संस्कृती, सरस्वती संस्कृतीचाही आवर्जून अभ्यास केला जातो. कारण, या संस्कृती प्राचीनतम आहेत. काही संस्कृती काळाच्या ओघात नष्ट झाल्या असल्या तरी भारतीय संस्कृती मात्र अजूनही टिकून आहे. तेव्हा भारतीय संस्कृतीच्या प्राचीनत्वाला एक वेगळं परिमाण आहे, असं मला वाटतं.
 
 
अशा या आपल्या प्राचीन, संपन्न संस्कृतीचा शास्त्रीयदृष्ट्या तत्त्वनिष्ठ अभ्यास, सखोल संशोधन झाले आहे, असे आपल्याला वाटते का?
 
संस्कृतीच्या अभ्यासाला विविधांगी पैलू आहेत. जीवनमान, राहणीमान, खानपान असे अनेक पैलू संस्कृतीच्या अभ्यासाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जोडलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करणं म्हणजे संस्कृतीचा विचार करणं आणि आपल्याकडे हा विचार किती वर्षांपासून करण्यात आला आहे, याचा मागोवा घेणं गरजेचं आहे. हा मागोवा पाहिला, तर आपल्याला आश्चर्यचकित होण्याची वेळ येते, कारण या जीवनपैलूंवर तत्त्वनिष्ठ विचार झाला आहे. तत्त्वनिष्ठतेचे काही निकष असतात, प्रणाली असते. जेव्हा कुठल्याही गोष्टीचा सैद्धांतिक विचार होतो, तेव्हा तीन गोष्टी त्यामध्ये अविभाज्यपणे येतात. अध्ययन, अध्यापन आणि संशोधन प्रणाली. या तिन्ही गोष्टी विचारधारेची अंगे असतात आणि या तिन्ही अंगांमध्ये कसा कसा विचार होत गेला आहे, हे पाहिलं तर आपल्या संस्कृतीचा तत्त्वनिष्ठ विचार झाला आहे अथवा नाही, याचे उत्तर आपोआप मिळते.
 
आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल अनेक गैरसमज, अंधश्रद्धा प्रचलित आहेत. त्यात कितपत तथ्य आहे ?
 
जगातल्या सर्वच आदिम संस्कृतींमध्ये आपल्याला अंधश्रद्धेचा पगडा सर्वत्र दिसतो. त्यामुळे अंधश्रद्धा या केवळ भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत, असे अजिबात नाही. जेम्स हेस्टिंग नावाच्या एका विद्वानाचे ‘इन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन ऍण्ड एथिक्स‘ असे खंडच्या खंड प्रकाशित झाले आहेत. या खंडांमध्ये जगभरातील संस्कृतींमधील समज-गैरसमज, शकुन-अपशकुन असे विचार ग्रंथित केले आहेत. याकडे बघण्याचा दृष्टिकोन निसर्गाशीही निगडित आहे. सध्या आपण निसर्गापासून खूप तुटत चाललो आहोत, पण पूर्वी मनुष्य आणि निसर्ग यांचं एक सहजीवन होतं. आदिम संस्कृतीच्या विकास प्रक्रियेत मनुष्य निसर्गाच्या अगदी जवळ होता आणि निसर्ग म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूचा परिसर, पशु-पक्षी, झाडं-वेली आणि त्यामध्ये राहणारे काही ‘स्पिरीट्‌स’. जसे की, वनदेवता, स्थलदेवता, अरण्यदेवता. या देवता जरी आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नसल्या, तरी त्यांचे झाडं-वेली असे बाह्यरूप दिसते. पण यामागे काही कारण, चैतन्य असलं पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे. ते दिसत नसल्यामुळे नुसत्या कल्पनेने जग निर्माण करायचंय. जिथे नुसत्या कल्पनेने जग निर्माण करतात, तिथे अशा समजुती दिसून येतात, ज्याला आपण ‘अंधश्रद्धा’ म्हणतो. जसे की, झाडाची पूजा करायची, झाडाला लाथ मारायची नाही, कारण त्या झाडामधील देवतेचा अपमान होतो. तेव्हा ही भावना कशामुळे निर्माण झाली, तर त्यामागे काही तरी ‘स्पिरीट’ आहे, चैतन्यतत्त्व आहे आणि त्याला आपल्याला दुखवायचं नाही. मग जे चैतन्यतत्त्व आपल्याला दिसत नाही, त्याची आपण कल्पना करतो, मात्र कशाप्रकारे त्या चैतन्यतत्त्वाची आराधना करून त्याला प्रसन्न करता येईल, काय केलं नाही की त्याचा कोप होईल, हे आपणच ठरवत असतो. हे त्या तत्त्वाने कुठेही सांगितलेले नाही. आपणच त्यामागे अशा भावनांचा गुंता तयार केला आहे आणि त्यातूनच असे गैरसमज प्रचलित होतात. हे आपल्याच संस्कृतीबाबत होताना दिसते. कारण, आपली संस्कृती प्राचीन आहे. बाकीच्या संस्कृती कालौघात काळाच्या पडद्याआड गेल्या, तर काहींचा आज मागमूसही नाही आणि मग जी संस्कृती इतकी वर्षे भक्कमपणे टिकून आहे तिला ‘बुरसटलेली’, ‘अंधश्रद्धाळू’ असे म्हणण्याचा वाव टीकाकारांना नक्कीच मिळतो. 
 
 
संस्कृतीच्या अभ्यासात बरेचदा संशोधकांकडून, इतिहासकारांकडून आपापल्या दृष्टिकोनातून घटनांचे, व्यक्तीसंदर्भांचे अर्थ लावून निष्कर्ष काढले जातात. तेव्हा अशावेळी योग्य-अयोग्य साहित्याची पारख कशी करावी? नेमका कोणाच्या आणि कोणत्या संदर्भांवर विश्वास ठेवावा ?
 
खरं तर हा मुद्दा थेट ‘संशोधन प्रणाली’ या विषयाशी भिडणारा आहे. कारण, तुम्ही कुठल्या संशोधन पद्धतींचा अवलंब करता किंवा एखाद्या गोष्टीचा अर्थ कसा लावता, त्यासाठी जो दृष्टिकोन वापरता, त्यावरून विषयाचे अर्थनिर्धारण होत असते. त्याला ‘हरम्युनिटिक्स’ किंवा ‘Science of Interpretation'  म्हणजेच ‘अर्थनिर्धारणशास्त्र’ म्हणतात. एका उदाहरणाच्या माध्यमातून याचा विचार करू. इ. स. पूर्व सातव्या ते आठव्या शतकातील पाणिनीच्या व्याकरणाच्या किमान दोनशे वर्षे इतका प्राचीन असा ‘निरुक्त’ नावाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ व्युत्पत्तिशास्त्रावर आधारित आहे. यास्क मुनी हे या ग्रंथाचे कर्ता असून हा ग्रंथ ’वेदान्ग’ आहे. वेदातील ‘वृत्र’ ही संकल्पना त्यांनी एका वेगळ्या अर्थाने मांडली आहे. इंद्र-वृत्र युद्ध ही तशी ऋग्वेदातील सर्वात लोकप्रिय, बहुचर्चित कथा. या कथेनुसार, इंद्राने वृत्राचा नाश केला. या कथेला वेगवेगळे पैलू आहेत. यावर यास्क मुनी प्रश्न उपस्थित करतात की, ‘को नाम वृत्र:’ अर्थात, ‘हा वृत्र म्हणजे कोण?’ तर यास्कांनी संशोधन प्रणालीला अनुसरून याचे दोन अर्थ निर्धारित केले. एक म्हणजे, ‘मेघ इति नैरुक्ता’ अर्थात, वृत्र म्हणजे मेघ आहे. जे व्युत्पत्तिशास्त्राचा, निरुक्ताचा अभ्यास करतात, त्यांचे हे मत आहे आणि ‘त्वाष्ट्रः असुरः इति ऐतिहासिकाः’ अर्थात, तो एक असूर आहे, त्वष्ट्याचा मुलगा आहे, असे इतिहासकारांचे मत आहे. म्हणजे, एकच गोष्ट असलेल्या वृत्राविषयी दोन परस्पर विरुद्ध मते तयार झाली, ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. यास्कांनी सादर केलेली व्युत्पत्ति निरुक्तावर आधारित आहे. ‘वृ-वर्ण’ म्हणजे आच्छादन करणं. मेघ आसमंत आच्छादित करतो, तर ‘वृ-वर्ण’ या धातूच्या अर्थावरून त्यांनी निरुक्ती सांगितली आणि ज्यांचा आख्यायिकांवर विश्वास आहे, ज्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक आहे, त्यांना वाटते की, त्वष्टा हा देवांचा एक कारागीर होता. त्याचा मुलगा वृत्र आहे. इंद्र आणि वृत्रामध्ये युद्ध झालं आणि इंद्राने वृत्राचा पाडाव केला. म्हणजे, या घटनेला मानवीकरण करून इतिहासकारांनी एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं. आख्यायिका म्हणून सांगितलं तर निरुक्ताने केवळ एक नैसर्गिक घटना म्हणून याचा विचार केला. मेघामध्ये पाणी असतं. इंद्र वज्राने मेघाचं ताडन करतो. विद्युल्लतेने त्याचं पोट फाडतो आणि त्याचा नाश करतो. त्या पाण्याचा पर्जन्याच्या रूपाने जमिनीवर वर्षाव होतो. तेव्हा इंद्र-वृत्र युद्ध ही नैसर्गिक घटना आहे, त्यात वेगळं काही आख्यान नाही. अशा पद्धतीने ख्रिस्तपूर्व सातव्या ते आठव्या शतकामध्ये  Interpretations आढळतात. तेव्हा आपल्याकडे मुळात संशोधन प्रणाली नव्हती, तात्विक विचार नव्हते, याचा खंडन करणारा यापेक्षा मोठा पुरावा दुसरा कुठला बरं असू शकतो ? तेव्हा, आजच्या संशोधन प्रणाली १८ व्या शतकात विकसित झाल्या आहेत. तेव्हा, प्राचीन ग्रंथात केलेले हे लाक्षणिक स्पष्टीकरण त्यादृष्टीने महत्त्वाचे ठरते.
 
 
साहित्याच्या अभ्यासाकडे कोणत्या दृष्टिकोतून पहावे ?
 
सर्वप्रथम कोणतेही साहित्य चूक किंवा बरोबर नसून त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा योग्य किंवा अयोग्य असतो. संपूर्ण वैदिक साहित्य ‘प्राचीन’ म्हणून आपण प्रमाणभूत मानतो. याविषयीही विचारवंतांचे दोन गट आहेत. त्यापैकी एक गट मानतो की, भारतीय साहित्यात काहीच नाही, केवळ देवता स्तुती आहे, तर ‘सगळं आमच्याकडे आहे,’ असं मानणारा दुराग्रही, अभिनिवेशी असा दुसरा गट. तेव्हा या दोन्ही गटांच्या विचारपद्धतीचा सुवर्णमध्य गाठला पाहिजे, असं मला वाटतं. तेव्हा, टोकाची भूमिका न घेता वेगवेगळे निकष लावून, व्याकरणदृष्ट्या जर साहित्याचा अभ्यास केला, तर त्याला आव्हानं देणारं कुणी नाही. नैरुक्तांचा दृष्टिकोन त्यामुळे अधिक विश्वासार्ह असून या दृष्टीने अभ्यास केल्यास साहित्यात अयथार्थ असं काही येणार नाही. 
 
 
त्याचबरोबर बर्‍याच साहित्यिकांवर साहित्याचे ‘ब्राह्मणीकरण’ केल्याचा ठपका ठेवला जातो. त्यावर तुम्ही काय भाष्य कराल?
 
त्याला ‘ब्राह्मणीकरण’ नाही, तर फार फार ‘भारतीयीकरण’ असेच म्हणायला हवे. कारण, भारत हा केवळ ब्राह्मणांचा कधीच नव्हता. कारण, ते संख्येने मूठभरच आहेत. ज्ञानाची प्रेरणा देणारा, संपादन करणारा एक वर्ग असतो, प्रत्यक्ष कर्म करणारा दुसरा आणि त्याची फळं चाखणारा तिसरा वर्ग असतो; ही समाजाची घडी आहे. त्यामुळे ‘ब्राह्मणीकरणा’चा प्रश्नच उद्भवत नाही. वेदांमध्ये तर अब्राह्मण लोक पुष्कळ आहेत. व्यास-वाल्मिकी तर ब्राह्मण नव्हतेच. त्यामुळे हिंदू धर्म ज्यावर आधारित आहे, त्याचे कर्ते तरी कुठे ब्राह्मण आहेत ? त्यामुळे साहित्याच्या, संस्कृतीच्या ‘ब्राह्मणीकरणा’चा दावा त्यामुळे अगदी गैर लागूच आहे.
 
 
भारतीय संस्कृतीच्या एक जाणकार, अभ्यासक म्हणून वेद, उपनिषदे, भारतीय पौराणिक ग्रंथांचे अध्ययन वर्तमानात आणि भविष्यात आपल्याला कसे आणि कितपत महत्त्वाचे वाटते ?
 
एक संस्कृती अभ्यासक म्हणून मला असं निश्चितच वाटतं की, वेद, उपनिषदांच्या अभ्यासाला उपयुक्तता आहेच. कारण, अनुपयुक्त, अप्रासंगिक अशा गोष्टी टिकतच नाहीत. आज जगभरामध्ये जर वेद-वेदान्ताचा अभ्यास होत असेल, तर त्यामध्ये निश्चितच गाभा आहे. कारण, त्यातून काही बाहेर येईल, असं लोकांना वाटतं. ज्या गोष्टी कालौघात पाच हजार वर्षांहूनही अधिक काळ टिकल्या, त्या केवळ त्यांच्यामध्ये उपयुक्तता असल्यामुळेच. साध्या डार्विनच्या सिद्धांतातच पाहा ना. तो जरी प्रमाण मानला तरी, जी गोष्ट शेपटीसारखी अनुपयुक्त आहे, ती सहज गळून पडते. असे असेल तर मग ज्या गोष्टींचा कधीच कुणाला उपयोग नव्हता, त्या गोष्टी का नाही गळून पडल्या?
 
तेव्हा, ‘वेदान्त फॉर युथ’ याची आजच्या काळातही गरज आहे. त्याचा प्रयोग एकेकाळी स्वामी विवेकानंदांनी केला. पण, विवेकानंदांच्या आधीसुद्धा वेदांमधील ज्ञान अधोरेखित करणारे अनेक विचारवंत होऊन गेले. फक्त हे तत्त्वज्ञान जागतिक व्यासपीठावर मांडण्याचं काम विवेकानंदांनी हिरीरीने केलं आणि त्याला चालना मिळाली. वेदाभ्यास मुख्यतः तरुणांसाठी का, तर आजचा तरुण हा नैराश्यग्रस्त आहे, पुष्कळ ताणतणावाखाली तो वावरतो, दुविधेमध्ये तो अडकला आहे, तेव्हा त्याला योग्य मार्गदर्शन करणं, त्याचं मन:स्वास्थ्य राखणं ही गोष्ट वेदान्तांच्याद्वारे शक्य होऊ शकते. त्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे, आजच्या काळात झालेल्या नीतिमूल्यांचा र्‍हास आणि जर या नीतिमूल्यांची पुनःप्रतिष्ठापना करायची असेल, तर तुम्हाला वेदान्ताकडे वळावे लागेल. मग शाळांमधील मूल्यशिक्षणाचा तास असो वा ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’च्या रामायण-महाभारतावर आधारित परीक्षा, त्यांचा मूळ स्रोत हा वेदांमध्येच आहे. त्यामुळे जोवर माणूस भूतलावर आहे, जोवर तो तत्त्वज्ञानाचा विचार करणार आहे, तोवर तो नीतिशास्त्राचा विचार करणार आहे आणि जोवर तो नीतिशास्त्राचा विचार करणार आहे, तोवर त्याला वेद-वेदान्ताचा अभ्यास करणं गरजेचे आहे. त्यामुळे भूतलावर मानवी वस्ती असेपर्यंत हा अभ्यास भविष्यातदेखील निश्चितच होणार आहे. 
 
 
वेद-वेदान्ताच्या अभ्यासाला अधिकाधिक चालना देण्याची गरज आहे का ? आणि या विषयात जितकं सखोल संशोधन व्हायला पाहिजे, ते झालं आहे, असं तुम्हाला वाटतं का ?
 
नाही, वेद-वेदान्ताच्या विषयात सखोल संशोधन झालं असं मला वाटत नाही. याचे प्राथमिक कारण म्हणजे, आपले गैरसमज आणि संस्कृत भाषेविषयीची एकूणच अनास्था. संस्कृत भाषा दुर्लक्षित झाली, ‘मृतभाषा’ म्हणून संस्कृतचा अपप्रचार झाला आणि संस्कृत भाषेतील साहित्य कायम दुर्लक्षित राहिलं. त्यामुळे संस्कृत भाषा लोकभाषा होवो ना होवो; परंतु ज्ञानभाषा म्हणून तिचं महत्त्व अधोरेखित झालं पाहिजे. त्यामुळे संस्कृत भाषेमध्ये उपलब्ध असलेली विविध विषयांची, शास्त्रांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून वेद-वेदान्ताच्या अभ्यासाला चालना मिळेल.
 
 
संस्कृत, प्राकृत आणि मराठी भाषा यांच्या परस्पर संबंधांविषयी, व्युत्पत्तिविषयी विचारवंतांची मतमतांतरे आहेत. त्याविषयी तुमचं मत काय ? 
 
बर्‍याचशा भारतीय भाषा या संस्कृतोद्भव आहेत. कन्नड, तामिळ, तेलगू या अभिजात भाषा प्राचीन समजल्या तरी त्या संस्कृत इतक्या प्राचीन नाहीत. त्यामुळे कन्नड, मल्याळम भाषेमध्ये संस्कृतचे तसेच्या तसे शब्द (तत्सम आणि तद्भव) आढळतात. तेव्हा संस्कृत ही इतर भाषांपेक्षा प्राचीन आहे आणि मातृवत आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. तसेच मराठीचं मूळ रूप हे ‘महाराष्ट्री’ असं होतं, नंतर ते ‘मराठी’ झालं. उदा. ज्ञानेश्वरी वाचायला गेलो तर त्यातले अनेक शब्द आपल्याला कळत नाहीत. म्हणजेच, मराठी आलं म्हणून ज्ञानेश्वरीचा अर्थबोध झाला असं होत नाही. तसेच जुन्या प्राकृत भाषा वाचल्या की, अर्थबोध होतोच असं नाही, पण म्हणून त्याचे मूळ मान्य नाही, हा विचार योग्य नाही. तेव्हा, आधुनिकतेकडे गेल्यावर भाषा अधिक सुलभ झालेली दिसते. संस्कृत आणि मग प्राकृत आणि त्यानंतर येणार्‍या इतर भारतीय भाषा असा तो क्रम आहे. या सगळ्या भाषा संस्कृतोद्भव आहेत, असं माझं ठाम मत आहे. संस्कृत ज्याची प्रकृती आहे, ते ‘प्राकृत.’ त्यामुळे संस्कृत साहित्य हे मुळात आहे, त्यामुळे संस्कृत हीच प्रकृती आहे आणि संस्कृतपासूनच इतर भाषा निर्माण झाल्या आहेत.
 
 
आजच्या काळात संस्कृत भाषेचे शिक्षण तरुणांनी का घ्यावे ? या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी काय सांगाल ?
 
प्राचीनतम साहित्य ज्या भाषेत आहे, अशी संस्कृत भाषाही शिकली पाहिजे. तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल, पण आजही संस्कृत भाषा हजारो लोक बोलतात. कर्नाटकमधील उडपी जवळच्या मत्तूर गावामध्ये आम्ही मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाची शैक्षणिक सहल नेली होती. त्या गावात घराघरांत संस्कृत भाषा बोलली जाते. त्यामुळे संस्कृत भाषा टिकली पाहिजे आणि ती टिकणार हे निश्चित आहे आणि जर भाषा टिकली, तर या ज्ञानभाषेच्या विविध अंगांचा अभ्यास होणंही गरजेचं आहे. मी जेव्हा १९७५ साली मुंबई विद्यापीठातून संस्कृतमध्ये एम.ए. केलं, तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम १५ ते २० होती, आजघडीला ती ५० ते ६० च्या घरात पोहोचली आहे. कोर्सेसची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून शनिवार-रविवारीही नोकरदार वर्गांसाठी स्वतंत्र बॅचेस विद्यापीठाने सुरू केल्या आहेत, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे संस्कृत भाषेला अजिबात मरण नाही.
 
मायथॉलॉजी, मॅन्युस्क्रिप्टोलॉजी, मिस्टिसिझम, भक्ती, तत्त्वज्ञान असे विविधांगी संस्कृत संलग्न कोर्सेसही विद्यापीठात उपलब्ध असून त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
 

 
संस्कृतबरोबरच पाली भाषा, मोडी लिपीचीही प्राचीन ग्रंथ अध्ययनात महत्त्वाची भूमिका आहे. तेव्हा याविषयी मुंबई विद्यापीठात कोर्सेस उपलब्ध आहेत का ? आणि असतील तर त्यांना मिळणारा प्रतिसाद कसा आहे ?
 
१०-१२ वर्षांपूर्वी पाली विभाग हा मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचा भाग होता, पण आता तो स्वतंत्र विभाग आहे. कारण, पाली आणि प्राकृत भाषा संस्कृतोद्भव आहेत. म्हणून पूर्वी त्या संस्कृत विभागाअंतर्गत शिकवल्या जायच्या. पालीमध्येही पुष्कळ साहित्य ग्रंथित आहे. बौद्ध धर्माविषयक जे साहित्य आहे, ते पाली भाषेमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये अनेक हस्तलिखितांचाही समावेश आहे. जैन धर्मीयांची भाषा ही अर्धमागधी आणि बौद्ध धर्मीयांची भाषा ती पाली. कारण बौद्ध वचनांचे पालन ज्या भाषेने केले ती ‘पाली’. बुद्धाच्या विचारांचं संरक्षण-संवर्धन पाली भाषेने केलं. त्यामुळे जगभरात होणार्‍या बुद्ध साहित्याच्या अभ्यासासाठी स्वतंत्र विभाग असणं गरजेचं आहे आणि मला सांगायला खरंच आनंद होतो की, शेकडो विद्यार्थी पाली भाषेचा अभ्यास करताहेत. प्रमाण पदविका, एम.ए., एम.फिल, पीएच.डी असे कोर्सेेस पाली भाषेत उपलब्ध आहेत. अनेक नवबौद्ध लोकांचा अंत:प्रेरणेने आपली भाषा म्हणून पाली शिकण्याकडे कल दिसून येतो. सरकारी अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बौद्ध समाजातील लोक मूळ बौद्ध साहित्याच्या अध्ययनासाठी पाली भाषेकडे वळलेले दिसतात. त्यामुळे पाली भाषेलाही ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर संस्कृत विभाग ‘सर्टिफिकेट कोर्स इन प्राकृत’ हा कोर्स देखील सुरू करतो आहे. त्यापुढे मग प्राकृत भाषेमध्ये डिप्लोमा, एम.ए. ही करता येईल. तसेच मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात ‘जैनोलॉजी’चेही विशेष कोर्स चालवले जातात.
 
भाषांबरोबरच विविध लिपींचाही हस्तलिखित शास्त्राचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात चालतो. मोडी लिपीबरोबरच इतरही सहा लिपी शिकवल्या जातात. मराठ्यांचा इतिहास, बखरी या मोडी लिपीत आहेतच, पण स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंतही मोडी लिपी अनिवार्य होती. तेव्हा मराठी शिकणारे मोडीही शिकायचे. जमिनीची कागदपत्रे, सातबारा मोडी लिपीमध्ये आजही आढळतात. त्यामुळे ही कागदपत्रे सगळ्यांनाच वाचता येत नाही. तेव्हा जुनी कागदपत्रे वाचण्याच्या दृष्टीने संस्कृत विभागात मोडीचा अभ्यास होतो आणि मोडी संशोधन केंद्रही मुंबईभर चालतात. संगणकावर मोडी युनिकोडमध्ये टाईप करता यावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे वाचनाच्या तसेच तांत्रिक दृष्टीने मोडीचा अभ्यास सुरू आहे.
 
 
अशा या प्राचीन भाषा, लिपी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या अध्ययन, संशोधनाला अधिक वाव मिळून या भाषा दीर्घायुषी होतील, असे आपल्याला वाटते का ?
 
होय, निश्चितच. आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. संस्कृतही बराह, फोनेटिकमध्ये टाईप करणं सहज शक्य आहे. खरं तर हल्लीच्या विद्यार्थ्यांना संस्कृत टायपिंग वेगळं शिकवावं लागत नाही. विद्यापीठाच्या संस्कृत विभागामधील संगणकांवर विद्यार्थी संस्कृतमध्ये संशोधन, प्रबंध डिजिटली सादर करतात. त्यामुळे या भाषा आता आधुनिक भाषांबरोबरच मुख्य प्रवाहात आल्या आहेत.
 
 
भारतीय संस्कृतीचा, वेदकाळाचा जेव्हा जेव्हा उल्लेख येतो, तेव्हा तेव्हा सरस्वती नदीविषयी, त्या नदीच्या किनारी बहरलेल्या संस्कृतीविषयी प्रश्न उपस्थित केले जातात. तेव्हा, सरस्वती नदीचे अस्तित्व केवळ वेद-पुराणांपुरते मर्यादित आहे की, ही नदी कोणे एकेकाळी एका संपन्न संस्कृतीची साक्षीदार होती ?
 
वैदिक साहित्यामध्ये सरस्वती नदीचे अनेक उल्लेख आढळतात. वेदामध्ये ‘महो वर्ण: सरस्वती:’ म्हणजे ’मोठा प्रवाह असलेली, बलशाली अशी नदी,’ अशी सरस्वती नदीची स्तुती केलेली दिसते. ऋग्वेदामध्ये गंगा नदीचा एकदाच उल्लेख आहे, तर सरस्वती नदीवर प्रत्यक्ष तीन सूक्त आहेत. वैदिक संस्कृती ही सरस्वतीच्या काठीच बहरली. आर्य बाहेरून आले, त्यांनी आपल्या संस्कृतीचा र्‍हास केला, वैदिक रचना भारतीय नाही, असा जो सर्रास अपप्रचार केला जातो, तो साफ चुकीचा आहे. वाकणकरांनी ’सरस्वती शोध प्रकल्प’ सर्वप्रथम हाती घेतला आणि ‘सरस्वती शोध संस्थान’ म्हणून एक स्वतंत्र संस्थान स्थापन केले. या संस्थानामार्फत अनेक संशोधनकार्य आजही सुरू आहेत.
 
मुळात जगातील सर्वच प्राचीन संस्कृती कोणत्या ना कोणत्या नदीकाठी बहरल्या. कारण, पाण्याविना जीवन नाही. सरस्वती नदीही त्याला अपवाद नाही. प्रयागजवळ त्रिवेणी संगमात गंगा, यमुना, सरस्वतीचाही उल्लेख आढळतो. पण मग ही नदी लुप्त कशी झाली? नदी लुप्त होण्याचा केवळ साहित्यात उल्लेख आहे असे नव्हे, तर सरस्वती लुप्त होण्यामागे भौगोलिक पुराव्याचांही आधार आहे. महाभारतातही सरस्वती नदीचा उल्लेख आढळतो. जेव्हा कुरुक्षेत्रावर अखेरचं कौरव-पांडव युद्ध झालं, त्या युद्धाच्या वेळी बलराम रणभूमीत दिसत नाही. जेव्हा भीम-दुर्योधनाचं गदायुद्ध होतं, तेव्हा बलराम प्रवेश करतो. मग युद्धावेळी बलराम कुठे होता? तर, बलराम सरस्वतीच्या काठाकाठाने तीर्थयात्रेला गेला होता. ब्रह्महत्येचं पातक लागलं वगैरे वगैरे त्या बलरामच्या तीर्थयात्रेमागील कारणं महाभारतात सांगितली आहेत. प्रभासपट्टणापासून म्हणजेच द्वारकेपासून जेव्हा बलराम उत्तरेकडे प्रवास करत गेला, तेव्हा तो लिहितो, ‘क्वचित दृश्यमाना, क्वचित अदृश्यमाना’ अर्थात कुठे कुठे सरस्वती नदी दिसते, तर कुठे कुठे ती दिसत नाही. म्हणजे, सरस्वती नदीची लुप्त होण्याची, शुष्क होण्याची प्रक्रिया ही तब्बल पाच हजार वर्षांपूर्वी महाभारताच्या काळात सुरू झाली होती, हा साहित्यिक पुरावा आहे. या पुराव्याला पूरक असा भौगोलिक पुरावा म्हणजे, पाच हजार वर्षांपूर्वी एक प्रचंड भूकंप हिमालयीन पर्वतरांगांमध्ये झाला होता आणि त्या भूकंपाने हिमालयाचा एक कडा सरस्वती नदीच्या स्त्रोत/उगम असलेल्या ग्लेशियरमधून होत होता आणि तो कडा त्या ग्लेशियरवर कोसळल्यामुळे सरस्वती नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला व कालांतराने नदीचा हा स्त्रोत आटला व सरस्वतीचे केवळ छोटे छोटे तुटक प्रवाह मागे राहिले. भूकंपामुळे जिथे तो हिमकडा कोसळला, तो भाग आजही शुष्क आणि डोंगराळ आहे. मात्र, त्याच्या आसपास वनराई आहे. तेव्हा सरस्वती नदी लुप्त होण्यामागे हा एक ठोस भूगर्भ वैज्ञानिक पुरावा आढळतो. सरस्वती प्रवाहमार्गात ठिकठिकाणी खणन केले असता, भूगर्भातले प्रवाह आढळून आले व राजस्थानसारख्या मरुभूमीतही त्या प्रवाहात खारे पाणी न लागता गोड पाणी आढळून आले. या पाण्यातील घटकद्रव्यांचे जेव्हा विश्लेषण करण्यात आले, तेव्हा सरस्वती नदीच्या मुळाशी जशी घटकद्रव्ये असतात, तशाच प्रकारचे जीवजंतू, शंखशिपले आढळून आले. त्यामुळे एकेकाळी राजस्थान सुजलाम्-सुफलाम् भूमी होती व सरस्वती नदी आटल्यामुळे ती मरुभूमी झाली. पण, सरस्वतीच्या प्रवाहमार्गात अजूनही बोअर खणल्या, तर गोड पाणी लागते आणि ते पाणी हिमालयीन सरस्वती नदीच्या उगमस्त्रोतांशी मिळतेजुळते असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर ‘सरस्वती नदी’ आणि ‘सारस्वत’ यांचाही निकटचा संबंध आहे. सरस्वती नदीच्या काठावर राहणारे लोक ते ‘सारस्वत.’ त्यामुळे महाराष्ट्रात, गोव्यात राहणारी जी मूळची सारस्वत लोकं आहेत, त्यांचे पूर्वज कोणे एकेकाळी सरस्वती नदीकिनारी राहत होते. पुढे ‘गौड ब्राह्मण’ आणि ‘सारस्वत ब्राह्मण’ असे दोन भेद झाले. ‘गौड’ म्हणजे ‘उत्तरेचे’ आणि ‘सारस्वत’ म्हणजे ‘दक्षिणेचे’ असा मागोवाही मी कुरुक्षेत्राला गेले असता एके ठिकाणी वाचनात आला.
 
कुरुक्षेत्राजवळ पेहोवा या ठिकाणी एक तलाव आहेे, जिथे गोमुखातून एक पाण्याची बारीक धार प्रवाहित होते. तिकडे ब्रह्म सरोवर म्हणून एक मोठं सरोवर बांधले असून सरस्वती नदीचे पाणी साठवल्यामुळे अनेक लोक आवर्जून भेट देतात. स्नान वगैरे करतात. लुप्त झालेल्या अशा सरस्वती नदीला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भूगर्भातील तिचे प्रवाह एकमेकांना जोडून सरस्वतीला प्रवाहित करणं, कुंड बांधणं अशी अनेक कामे राजस्थानपासून हरियाणापर्यंत सुरू आहेत. त्यामुळे सरस्वती नदी ही काल्पनिक नसून तिचे अस्तित्व हे सत्यावर आधारित आहे. 
 

 
तत्त्वज्ञान ही एक स्वतंत्र विस्तृत ज्ञानशाखा असून त्याचे अध्ययन, कसे केले जाते ?
 
तत्त्वज्ञान अर्थात ‘फिलोसॉफी’. ‘फिलो’ आणि ‘सोफिया’ अशा दोन शब्दांपासून तयार झालेला हा शब्द. त्यामुळे ज्ञानाविषयी प्रेम अर्थात ‘फिलोसॉफी.’ मानवाला बुद्धी आहे, तो तर्काने विचार करतो, त्याला ज्ञानलालसा आहे, त्यामुळे जोवर मनुष्याचे अस्तित्व या भूतलावर आहे, तोवर ‘फिलोसॉफी’चा अभ्यास कायम राहणार.
 
चहाच्या कपासोबत विरणार्‍या चर्चा म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान नव्हे. तर्काच्या कसोटीवर घासून निरीक्षणाने प्रमाणित झालेलं असं हे केवळ थिअरी नसलेलं ज्ञान आहे. त्यामुळे थिअरी आणि प्रत्यक्ष अनुभवांचा ताळमेळ लावणं म्हणजे ‘फिलोसॉफी.’ अनुभवाचा प्राप्त केलेल्या ज्ञानाशी, निरीक्षणाशी अन्वय लावणं, त्यातून काहीतरी निर्माण करणं म्हणजे तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणं. त्यामुळे असं हे प्रमाणजन्य आणि अनुभवजन्य तत्त्वज्ञान भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. मनुष्य जेव्हा आयुष्यात स्थिरावतो, तेव्हा त्याची विचारक्षमता जागरूक होते. ‘मी कोण आहे?’ ‘या जगात मी का आलो?’ ‘हे जग कोणी निर्माण केलं?’ ‘माझा या जगाशी काय संबंध आहे?’ ‘मला कोणी निर्माण केलं?’ ‘सृष्टीचा निर्माणकर्ता कोण?’ या सगळ्या गोष्टींचा तो विचार करतो. ’Man, Matter and Maker'या तत्त्वज्ञानाच्या भोवती अख्खं तत्त्वज्ञान केंद्रित आहे. मनुष्य, जगत्, जगदिश्र्वर अशा या तीन गोष्टी आहेत. तेव्हा या सगळ्यांचं एकमेकांशी काय नातं आहे, यातून ‘फिलोसॉफी’च्या विविध शाखा विकसित झाल्या.
 
तत्त्वज्ञानाची संकल्पना दोन बिंदूंच्या आधारे स्पष्टपणे मांडता येईल. एक आरंभ बिंदू आणि दुसरा अंतिम बिंदू. आरंभ बिंदू म्हणजे जे काही दिसतंय ते खरं आहे, ‘मी खरा आहे,’ ‘अवतीभवतीची सृष्टीही खरी आहे आणि मला या सगळ्याचा आनंद उपभोगायचा आहे,’ हा त्यामागील ऐहिकवाद, चार्वाकवाद झाला. याउलट शेवटचा बिंदू सांगतो, सगळं शून्य आहे. कारण, माणसं, परिस्थिती, सृष्टी सगळं रोज बदलतं. अर्थात ते नाशिवंत आहे. अशा या दोन टोकांच्या, बिंदूंच्यामध्ये आपली सर्व भारतीय विचारधारा विकसित झाली. म्हणजे चार्वाकवाद, परंपरा आणि बौद्धवाद असं तिन्ही भारतातच निर्माण झालं. यामधला विचार केला की वाटतं की, आजूबाजूचं जग बदलतंय, म्हणजे ते मिथ्या आहे. पण ‘मी’, ‘माझं चैतन्य’ याच्यात काही तरी ’अहम्’ भाव आहे. त्यामुळे ज्ञानार्जनाची प्रक्रिया मात्र नित्य आहे. म्हणजे ज्ञान हे नित्य आहे, असा मानणारा बौद्धांचा ‘विज्ञानवादी’ हा एक पंथ आहे आणि दुसरा पंथ म्हणजे ‘शून्यवादी’ बौद्ध. म्हणजे, ‘सगळे खोटे’ वरून ‘थोडे खरे’ असा तो विचारांचा प्रवास. त्यामुळे पुढे उपनिषदांमध्ये ज्ञानालाच आपण शाश्वत समजून त्याला ‘ब्रह्म’ म्हटलं आणि बाकी सगळं अशाश्वत. म्हणजेच, ‘ब्रह्म सत्यम् जगत् मिथ्या’. मग जीवाचं काय तर, जीव म्हणजे ब्रह्मच आहे, दुसरं कुणी नाही. कारण माझ्यातलं चैतन्य आणि समष्टीमधील चैतन्य एकच आहे. यावर कबीराचा एक छान दोहा आहे-
जल में कुम्भ, कुम्भ में जल है
बाहर भीतर पानी|
फुटा कुम्भ, जल जलहीं समाना यह तथ कथौ गियानी|
 
अर्थात, आपण सगळे जे जीवात्मे आहोत, ते कुंभ आणि त्या कुंभातले जल अर्थात चैतन्य आणि बाहेरचं चैतन्य हे एकच आहे. जेव्हा मनुष्याचा मृत्यू ओढवतो, तेव्हा आतील चैतन्य बाहेरील चैतन्याशी एकरूप होतं आणि म्हणून जीव आणि ब्रह्म एकच आहेत. ते वेगळे नाही. ही संकल्पना ‘केवल अद्वैतवेदान्त’ म्हणून ओळखली जाते. पुढे वेदान्ताचे फाटे फुटतात. जसे की, रामानुजनचार्यांचा विशिष्ट अद्वैतवाद, वल्लभाचार्यांचा शुद्धाद्वैतवाद, मध्वाचार्यांचा द्वैतवाद इत्यादी.
 
मुळात भारतीय परंपरेमध्ये ६ आस्तिक आणि ३ नास्तिक दर्शने मिळून ९ दर्शनांची (Schools of Philosophy) परंपरा भारतीय तत्त्वज्ञानाच्या विकासाच्या टप्प्यांमध्ये येते. त्यामुळे नास्तिक दर्शन भारतीय परंपरेचाच भाग असून जैन, बौद्ध, चार्वाक यांना नाकारले नसून ते हिंदू परंपरेचा घटक आहेत. त्यामुळे हिंदू असणं म्हणजे देवावर विश्र्वास असलाच पाहिजे, असा काही नियम नाही. त्यामुळे एखादा नास्तिक असेल तरी तो ‘हिंदू’ असू शकेल. एवढंच काय तर अर्थशास्त्राचा जनक कौटिल्यही खुद्द नास्तिक होता. त्याच्या अख्ख्या ग्रंथात देवाचा कुठेही उल्लेख नाही. म्हणजे, ही सूट केवळ हिंदू धर्मात आढळते, जो की हिंदू धर्माचा खास पैलू आहे. कारण, जो कुराण मानत नाही, प्रेषिताला मानत नाही, तो मुसलमान नाही, ज्याची बायबलवर श्रद्धा नाही तो ख्रिश्चन नाही, पण हिंदू धर्मात मात्र अशी पद्धत नाही. वेद, भगवद्गीता मानली नाही, देवावर विश्र्वास नसला तरी ती व्यक्ती ‘हिंदू’च आहे. त्यामुळे आपल्या धर्मात लवचिकता आहे. कारण, विविध जातीधर्माचे असे मिश्र लोक याच भूमीमध्ये एकत्र राहिलो आहोत. अशी ही आपली संस्कृती विभिन्न परंपरांतून साकारली आहे. 
 
 
पुराणकालीन महिलांचे स्थान आणि समाजातील भूमिका आणि आजची महिलांची परिस्थिती, याचे विवेचन कसे कराल ?
 
वेदांमध्ये ‘सद्योवधू’ आणि ‘ब्रह्मवादिनी’ असे स्त्रियांचे दोन प्रकार सांगितले आहेत. ब्रह्मवादिनी म्हणजे जिला ‘ब्रह्म’ जाणण्याची इच्छा आहे, जी ज्ञानपिपासू आहे, आजच्या शब्दांत सांगायचे तर ‘करिअरवादी’ आहे, जिला चूल आणि मूल यामध्ये अडकायचे नाही अशी स्त्री म्हणजे ‘ब्रह्मवादिनी.’ याउलट, वयात आल्यावर घर-संसार व्यवस्थित सांभाळते ती ‘सद्योवधू.’ तेव्हा आजही हे दोन प्रकारचे प्रवाह स्त्रीवर्गामध्ये पाहायला मिळतात. काही करिअरकेंद्रित, तर काही भविष्यात फारशी ध्येय-अपेक्षा न बाळगणार्‍या, कौटुंबिक सुखाला प्राधान्य देणार्‍या स्त्रिया.
 
त्याचबरोबर जसे ऋग्वेदामध्ये ऋषी आहेत, तशा ऋषिकाही आहेत. जसे की, ’अपाला’ नावाची प्रौढ कुमारिका, जिचा उल्लेख ऋग्वेदातील आठव्या मंडलातील सूक्तात आढळतो. इथे मुद्दा हा आहे की, त्यावेळीही लग्न न करणार्‍या अशा स्त्रियांचा उल्लेख वेदांमध्येही आढळतो. त्यामुळे विवाहबंधनात अडकलेच पाहिजे, असे बंधनकारक नाही. ऋग्वेदाचे, यजुर्वेदाचे अध्ययन करणार्‍या स्त्रियांचाही संदर्भ पाणिनीकालीन ग्रंथात आढळतो. विद्यार्थिनींसाठी खास छात्रावास, वसतिगृहही होती. त्यामुळे ’वेदकाळात स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं, त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती,’ असा जो अपप्रचार केला जातो, तो चुकीचा आहे. आठव्या-नवव्या शतकाचा विचार करता, ‘कादंबरी’ नावाच्या बाणभट्टाच्या ग्रंथात ’महाश्र्वेता’ नावाचं एक पात्र आहे, ती पाशुपतविद्येची उपासक आहे. ती वनात जाऊन एकटी राहिलेली आहे आणि तिचे एका चंद्रपीडा नावाच्या राजपुत्राशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध ग्रंथात आढळतात. म्हणजे, एक मुलगा आणि एक मुलगी हे मित्र असूच शकत नाही, या समकालीन समजुतीला वरील प्राचीन उदाहरण फाटा देते. तेव्हा नवव्या शतकातील स्त्री-पुरुष निखळ मैत्रीची ही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत, असे मला वाटते. मग पुढेच नेमकं असं काय झालं की, महात्मा फुले, कर्वे यांना स्त्रीशिक्षणासाठी चळवळ उभी करावी लागली? याचे प्राथमिक कारण म्हणजे, तो काळ हा परकीय आक्रमणांचा काळ होता. स्वातंत्र्यपूर्व काळातही आपण परचक्राच्या अमलाखाली होतो आणि त्यामुळे स्त्रियांवरील अन्याय-अत्याचारामुळे त्यांना घरीच डांबून ठेवायचं, ही वृत्ती बळावली. कारण, त्यांचं संरक्षण हे घरातल्यांचं कर्तव्य आहे आणि जर त्या बाहेर सुरक्षित नाहीत, तर आपसूकच शिक्षणाचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले. मग त्या घरातच राहिल्या, त्यातून त्यांचं ओझं नको म्हणून बालविवाहाची पद्धत रूढ झाली. त्यामुळे हे त्यामागील समाजशास्त्रीय कारण आहे, असे मला वाटते. 
 
 
हल्ली स्वत:ला ‘हिंदू’ म्हणवून घेण्यात काहींना अवघडलेपणा जाणवतो, तर काहींना लाजही वाटते. ही परिस्थिती कशी बदलता येईल ? 
 
मी अगदी टोकाला जाऊन परंपरांचं पालन करा, त्यांचे पुनरुज्जीवन करा, असं म्हणणार्‍यातली नव्हे. माझी विचारसरणी अगदी तर्कसंगत आहे. त्यामुळे धर्म, संस्कृती आत्मसात करताना केवळ बाह्य उपचारांमध्ये न अडकता त्यामागील तत्त्व, सिद्धांत, शास्त्रीय कारणं, विचारांची बैठक याचाही विचार आपण सगळ्यांनी करायला हवा.
 
‘हिंदू’ हा मुळात ‘सिंधू’ या शब्दावरून आलेला शब्द आहे. त्यामुळे आपण सिंधू-सरस्वतीचे रहिवासी आहोत. ‘हिंदू म्हणजे भगवेकरण’ आणि त्यामुळे स्वत:ला ‘हिंदू’ म्हणायची जी लाज वाटते, ते साफ चुकीचे आहे. कारण, ‘हिंदू’ हा धर्म नसून ती हजारो वर्षे चालत आलेली एक समृद्ध जीवनशैली आहे. बाकीच्या धर्मांना जसा एक प्रेषित आहे, तसा कुणीही एक प्रेषित हिंदू धर्माला नाही. प्रेषिताने सांगितलेला तो ‘धर्म’ असतो आणि बाकीच्यांनी सांगितलेली ती पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली ‘परंपरा’ असते. त्यामुळे त्या परंपरेचा आदर आपण बाळगला पाहिजे आणि ज्ञानाचा वारसा एक ‘हिंदू’ म्हणून पुढे नेला पाहिजे. धर्म-संस्कृतीतील बाह्य उपचार आणि कर्मकांडांवर ज्याचा जसा विश्र्वास असेल, तसे त्याने त्याचे पालन करावे आणि जो तसे करत नसेल त्याला हसूही नये आणि जो त्याचे पालन करतो, त्याला नाकारू नये. त्यामुळे एखादी गोष्ट केल्याने ‘मी हिंदू होते’ आणि न केल्याने ‘अहिंदू होते’, असा काही प्रकार नाही. पण ‘हिंदू’ शब्दाची लाज वाटायचे मुळात काही कारणच नाही. म्हणूनच, ‘गर्व से कहो, हम हिंदू है...|’
 
खरं तर आपण सगळे इतक्या ‘इजिम्स’मध्ये विभागलो गेलो आहोत की, त्यामुळे मूळ प्रतिमा आपल्याला भंगलेली दिसते. पण मूळ चित्र भंगलेलं नसून ते अखंडच आहे. आपण ते तुकड्या-तुकड्यांमध्ये बघतो, म्हणून एकसंध काहीच नाही, असे वाटते. त्यामुळे ‘इजिम्स’ची माहिती हवी, हे खरे असले तरी त्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या परंपरेशी जोडणं गरजेचं नाही. त्यामुळे आताच्या उजेडात पूर्वीच्या गोष्टी तपासणं योग्य नाही. तेव्हा फाटे फोडणार्‍या आणि विभक्त करणार्‍या थिअरीजमध्ये काही दम नाही, कारण त्या फार काळ टिकणार्‍या नाही.
 
 
नुकतीच खजुराहोच्या ऐतिहासिक मंदिरावर बंदी घालण्याची विचित्र मागणी करण्यात आली. त्याविषयी काय सांगाल ?
 
मला हे अजिबात पटत नाही. कारण, भारतीय परंपरेने धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ मानले आहेत. म्हणजे, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ‘काम’ हा मानवी आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. कुठल्याही सजीवाला ‘काम’ ही भावना सुटलेली नाही. त्यामुळे केवळ त्या कामभावनेचं चित्रीकरण तिथे झाले आहे, म्हणून मंदिराला भेट द्यायची नाही, या विचाराला काही अर्थ नाही. पुढे ‘रोमॅण्टिक लिटरेचर’वर बंदी घालायचा विचार आला, तर कालिदासावर पहिली बंदी घालावी लागेल. म्हणून अशा मागण्यांना काही अर्थ नाही. या मंदिरातील शिल्पांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. फक्त कामभावनेचा अतिवापर होऊ नये किंवा त्यामध्ये नियमितता यावी म्हणूनच तर विवाहसंस्था निर्माण झाली. कारण, केवळ कामभावनेचाच विचार केला, तर समाजात स्वैराचार बोकाळेल, समाजस्वास्थ्य धोक्यात येईल आणि म्हणून सामाजिक स्थैर्यासाठी विवाहसंस्था गरजेची आहे. त्याचबरोबर एक अभिजात, अभिरुची असणारा रसिक कसा असावा, हेही कामशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे कामशास्त्र म्हणजे केवळ आसनं नसून तो कामभावनेचा एक अविभाज्य घटक आहे.
 
मुलाखत - विजय कुलकर्णी