दोन गडींचा डाव...

    दिनांक  24-Jun-2017   
 

 
 
 
देशाच्या राजकीय पटलावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याच नावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मोदी-शाह या जोडीने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचे आठवडाभर चर्वण करणे, त्या निर्णयात काडी एवढीही चूक दिसते का, त्यावरून काही टीका करता येईल का ? असा छिद्रान्वेषी विचार करणे हाही कित्येकांचा आवडता उद्योग. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी नुकतीच रालोआकडून राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. हा सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांना, अभ्यासक, निरीक्षक आणि पंडितांनाही धक्काच होता. त्यामुळे त्यावर लगोलग प्रतिक्रियाही उमटल्या, ममता बॅनर्जींसारख्या आक्रस्ताळ्या मुख्यमंत्र्याने तर ‘कोण हे रामनाथ कोविंद?’ असे म्हणत स्वतःच्या अजाणतेपणाचे प्रदर्शनही घडवले, तर काही मंडळींनी रामनाथ कोविंद यांची माहिती काढताना डोंगर पोखरून उंदीर शोधावा तशी त्यांची केवळ जातच तेवढी शोधली. काही जणांनी तर हा जातीच्या माध्यमातून दलित मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपचा डाव असल्याचेही तारे तोडले. मात्र, रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून निवड जाहीर करुन या दुकलीने आपल्या अंत्योदयाच्या आणि सर्व समाजाच्या कल्याणकारी विचारसरणीच्या पायावर ठाम राहत आपले काम केल्याचे सहज लक्षात येते. गेल्या तीन वर्षांत मोदी-शाह या जोडीने घेतलेले निर्णय बर्‍याचदा धक्कादायक म्हणावे असेच होते. ज्याची कोणीही अपेक्षा किंवा कल्पनाही केली नसेल, असे अनपेक्षित निर्णय घेणे, विरोधकांना आपल्या अजेंड्यानुसार आपल्याच खेळपट्टीवर खेळायला लावणे ही या दुकलीची खासियत, तर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, समस्यांची हाताळणी आणि कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी भिडण्याची वृत्ती यामुळे जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणे ही त्याची परिणती, हे विशेष. आता तर मोदी-शाह जोडीच्या धक्कातंत्राने सर्वच क्षेत्रात धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. परंतु, याची सुरुवात खरे तर २०१४ मध्येच झाली होती. तमाम माध्यमपंडित, पुरोगामी, बुद्धिजीवी म्हणवल्या जाणार्‍या मंडळींच्या अंदाजांना फोल ठरवत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आरुढ झाले, हाच पहिला सर्वात मोठा धक्का होता. त्यानंतर जणू काही धक्क्यांची मालिकाच सुरू झाली, ज्यामुळे अनेक बोरू बहाद्दरांच्या अंदाजांचे पानिपत झाले.
 
मोदी-शाह जोडी धक्के देण्यात प्रवीण आहे, ज्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर स्वकीय आणि परकीय दोघेही अचंबित झाल्याचे सर्वांनीच पाहिले. अनपेक्षित धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद आताच्या पिढीला या दोघांच्या प्रत्येक कृतीतून दिसला. मग तो नोटाबंदीचा निर्णय असो किंवा योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा असो किंवा मग पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा अथवा अचानक इस्लामाबादला जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेणे असो. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पटेल समाजाच्याच व्यक्तीला बसवले जाणार अशी अटकळ बांधली जात असतानाच तेथे विजय रुपानी यांच्या रुपात नवा चेहरा दिला, जे अनपेक्षित होते तर रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतिपदासाठी जाहीर झालेले उमेदवारी हा त्याचा कळसाध्यायच!
 
माध्यमे काय म्हणतील किंवा विरोधक कोणत्या मुद्द्यांवरून काहूर माजवतील, आपल्याविरोधात कोण काय काय टकळी चालवेल याची फिकीर न करता मोदी-शाह जोडीने आपली वाटचाल आपल्याच मार्गाने चालू ठेवली. एखादा निर्णय घेऊन तो अंमलात आणायचे ठरवले असेल आणि त्यावर आपला विश्वास असेल तर जग काय म्हणेल याची फिकीर मोदी-शाह या दोघांनीही कधी केली नाही. मोदींनी विकासाचा मंत्र भाजपसह सर्व देशवासीयांना दिला, त्याला सर्वांच्या सोबतीची हाक दिली. अमित शाह यांनी तर सत्ताकारणात सर्व राज्यांना, राज्यांतील जनतेला सोबत घेत त्यांच्या विकासाची संकल्पना मांडली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय राजकारणाला लागलेली घराणेशाहीची कीड पोखरण्याचे, त्याला नेस्तनाबूत करण्याचे काम मोदींनी हाती घेतले. भाजप वगळता अन्य पक्षांत घराणेशाही असल्याचे आणि नेतृत्वाची-कर्तृत्वाची कसलीही क्षमता नसताना उमेदवार लादल्याचे प्रकार सर्रास घडले. बर्‍याचदा स्थानिक जनतेनेही या लादलेल्या ओझ्याला स्वीकारले. मात्र, मोदी-शाह जोडीने घराणेशाही मोडीत काढत देशातील सर्वसामान्य व्यक्तीतील समाजाचे नेतृत्व करण्याची क्षमता जोखली आणि त्याला संधी दिली.
 
 
भारताच्या स्वातंत्र्यापासून सर्वत्र तुष्टीकरणाचे राजकारणही मोठ्या प्रमाणावर खेळले गेले. या राजकारणाच्या पटांगणावर नेहमीच हिंदुत्वनिष्ठांना फटकारण्याचे काम सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या पक्षाने केले. तसेच विविध संस्था-आस्थापनांवर कब्जा करुन बसलेल्या डाव्यांनी आणि त्यांच्या पांडित्याचा टेंभा मिरवणार्‍या धेंडांनीही केले. परंतु, मोदी-शाह जोडीने तुष्टीकरणाच्या राजकारणाला पूर्ण फाटा दिला. तरीही जे लोक भाजप आणि संघाचे नाव निघाले की, ’विचारवांत्यांचे रतीब’ घालतात, त्यांना मोदी-शाह या दुकलीच्या निर्णयानंतर जातीयवादाचा, धर्मांधतेचा वास आला परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह दोघांनीही आपल्या कृतीतून अनेक बाबी जनतेसमोर मांडल्या, ज्या डोळे उघडे ठेऊन पाहिल्या तर कोणाच्याही लक्षात येऊ शकतात. हिंदू समाजाला झोडपणे हाच जिथे राजकारणाचा स्थायीभाव झाला होता, तिथे मोदी-शाह जोडीच्या कृतीने हिंदू समाजात चैतन्य तर आलेच, पण हिंदू समाजाचा त्यांच्यावर आणि त्यांचा हिंदूंवर विश्वास असल्याचे दिसले. योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड हे त्याचेच द्योतक, ज्या माध्यमातून धर्मनिरपेक्षतेचे स्तोम माजवत आपापल्या मठी सांभाळणार्‍या छद्मी निधर्मीवाद्यांना चपराक बसली. तसेच अन्य समाजाचे तुष्टीकरण किंवा द्वेष यापैकी काहीच करण्याची आवश्यकता नाही, हेही त्यांच्या कृतीतून जाणवते. राष्ट्रीय वृत्तीचा हिंदू समाजच या देशात काही क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतो, याच्यावर या दोघांचाही अतूट विश्वास असल्याचे जाणवते.
 
अमित शाह यांची संघटनात्मक शक्ती वादातीत आहे, ज्याचा फायदा भाजपला, त्यांच्या उमेदवारांना वेळोवेळी झाला आणि होतो. पक्षाचे नेते, पदाधिकारी आदी रचना तर त्यांनी उत्तम गुंफली, पण त्याच्या जोडीला पक्षासाठी आणि त्या माध्यमातून देशसेवेसाठी उत्तम व्यक्ती निवडण्यासाठी बुथ स्तरावर झोकून देऊन काम करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभारली. ज्याची फळे आज प्रत्येक निवडणुकीत आपल्याला दिसत आहेत. अमित शाह यांनी आपल्या कार्यपद्धतीच्या जोरावर समाजातील सर्व स्तरातील लोकांना मग ते शेतकरी, नोकरदार, स्त्री, वृद्ध, युवक, विद्यार्थी, डॉक्टर आदी कोणीही असो, त्यांना सामावून घेतले. जे आतापर्यंतच्या राजकारणात परिघाबाहेर होते, जे लोक घरात बसून केवळ राजकारणावर चर्चा करत त्यांनाही मतदानासाठी घराबाहेर यायला भाग पाडले. शाह यांच्या या कामगिरीमुळे ते सर्वत्रच बाजी मारून गेले.
 
राजकारण आणि सत्ताकारण ही तात्कालिक नव्हे, तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे जे काही काम करायचे ते शाश्वत असावयास हवे, ही मोदी-शाह या दुकलीची दूरदृष्टी. यावर्षी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका विरोधकांनी केवळ हार-जीत या अंगाने पाहिल्या. मात्र, मोदी-शाह जोडीने याकडे थेट राष्ट्रपतिपदासाठीच्या मतांच्या बेरीज-वजाबाकीच्या दृष्टीने पाहिले. ज्यामुळे भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग उत्तर प्रदेशात मोकळा झाला, आमदारांची संख्या वाढली, ज्याचा लाभ आताच्या राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला होत आहे. गेल्या तीन वर्षांतील कोणतीही निवडणूक किंवा कोणतीही कृती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहंकाराचा वारा लागल्याचे कधी दिसले नाही. मोदी ही व्यक्तीच जमिनीवर पाय ठेऊन काम करणारी आहे, ज्याचा अनुभव त्यांच्याकडून शालेय विद्यार्थिनीने पाठविलेल्या पत्राला उत्तर देण्यातून ते ’मन की बात’ सारख्या कार्यक्रमात एखाद्या युवकाने स्वच्छतेसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करण्यातून देशवासीय घेत असतात. तसेच एखादी निवडणूक म्हणजेच अंतिम नव्हे, तर या राष्ट्राला परमवैभवाला नेण्यासाठी येणारा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, हा विचारही त्यांच्या मनात असतो. म्हणजेच पुढेही आव्हाने आहेत आणि त्यांचा सामना आपल्यालाच करायचा आहे, काळाचे पुढचे टप्पे विसरायला नको, याचे भानही दोघांना सतत असतेच. ’’आपले ध्येय असीम, अनंत आहे. छोट्या यशाने तृप्त होऊ नका किंवा बिहारसारख्या एखाद्या पराजयाने खचून जाऊ नका,’’ हा संदेश देण्याचे कार्यही मोदी-शाह जोडीच्या कृतीतून दिसते.
 
ज्या देशातील नागरिकांची सरकारने काही कृती करावी आणि त्यातून आपला चरितार्थ चालवावा, अशी भावना झाली होती, तेथे घरगुती गस सिलिंडरवरील अनुदान परत करण्याचे पंतप्रधानांनी केवळ आवाहन केले, तर त्याला प्रतिसाद म्हणून तब्बल एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी अनुदान नाकारले, हाही एक आश्चर्याचा धक्काच होता. आपल्या समाजात बदल क्रांतीने नव्हे, तर उत्क्रांतीने होतो, याला साजेसेच हे उदाहरण. परंतु, मोदीद्वेषाने ज्यांचे डोळे पिवळे झाले आहेत, ज्यातून त्यांना सारा देश कावीळ झाल्यासारखा दिसतो त्यांना या गोष्टी समजून घेता येणार नाहीत, त्यांची तशी पात्रताच नाही म्हणा ना! सेक्युलरवादाची भ्रामक पोपटपंची करणारे पंडित किंवा मोदीविरोधाच्या अफूत घुमणारे भणंग-गणंग या गोष्टी कधी समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत. अशा मंडळींना मतदानातील निकालाने देशाची जनताच त्यांची लायकी दाखवून देत राहील. तोपर्यंत मोदी-शाह जोडीची घोडदौड पुढेही चालूच राहील आणि त्यांच्या धडाकेबाज निर्णयाने कित्येकांना धक्क्यामागून धक्के बसतील, याची मोजदाद न केलेलीच बरी.
 
- महेश पुराणिक