‘योग: चित्तवृत्ती निरोध:’

    दिनांक  21-Jun-2017   
 
 
 
दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्प आणि प्रयत्नाने भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी असलेल्या योगाला जगन्मान्यता मिळाली. संयुक्त राष्ट्रसंघाने पंतप्रधान मोदींची ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ची संकल्पना स्वीकारत २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून जगभर साजरा करण्याची घोषणा केली. आज जगातील जवळपास १८० पेक्षा अधिक राष्ट्रांनी योगाला मान्यता दिली असून, जगात सर्वत्र २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा केला जातो.
 
योग म्हणजे काय ?
योग हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे, ज्याचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथ, वेद, उपनिषदे, भगवद्गीता, स्मृती, पुराणे, महाकाव्ये यात केलेला आढळतो. जगातील आद्यग्रंथ ऋग्वेदातही योगाचा उल्लेख केलेला आहे. प्राचीन भारतातील सिंधू संस्कृतीशी संबंधित उत्खननात कित्येक प्रतिकृती आणि मूर्ती मिळाल्या, ज्या सामान्य योग किंवा समाधीमुद्रेच्या रूपातील आहेत. परंतु इतिहासकारांच्या मते, सिंधू संस्कृती आणि योग-ध्यानाचा संबंध असल्याचा कोणताही निर्णायक पुरावा नाही.
 
योगाला भारतात आध्यात्मिक क्रिया मानले जाते, ज्यात शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र आणले जाते. संस्कृत भाषेतील ’युज’ आणि ‘योक’ या दोन शब्दांनी मिळून ‘योग’ हा शब्द तयार झाला आहे. ‘युज’ म्हणजे जोडणे किंवा बांधणे, तर ‘योक’चा अर्थ मनाची एकाग्रता, विचार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे असा होतो.
 
आज सर्व जग विविध समस्यांनी ग्रासले आहे. लोकांच्या जीवनात ताणतणाव, प्रश्न, विवंचना, अशांतता, शारीरिक आणि मानसिक व्याधी आदी अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. या सर्व प्रश्नांपासून प्रत्येकाला मुक्ती हवी आहे. परंतु, त्याचा उपाय औषधोपचारात, बाह्य जगतात शोधण्यापेक्षा योगात-योगाच्या आंतरिक शक्तीत शोधला तर ते अधिक हिताचे ठरेल. कारण, अन्य औषधोपचारांच्या तुलनेत योग हा रोग किंवा विकारांवर केवळ नियंत्रण आणत नाही, तर त्यापासून कायमची मुक्ती देतो.
 
योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवनशैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे आणि एक पूर्ण अध्यात्मविद्या आहे. व्यक्तींच्या निर्माण आणि उत्थानामध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहूमुखी विकासामध्येही याचा उपयोग होत असल्याचे सिद्ध झाले आहे. योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी वापरली जाणारी एक अद्भुत विद्या आहे. ज्याला हजारो वर्षांपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषिमुनींनी साकार केले आहे.
 
प्राचीन भारतीय योगशास्त्र सुव्यवस्थित रूपाने समाजासमोर ठेवण्याचे श्रेय महर्षी पतंजली यांना दिले जाते. महर्षी पतंजलींनी प्रथम अष्टांग योगाच्या रूपात याला संपादित केले. योगाला सूत्रबद्ध रीतीने गुंफण्याचे कार्य त्यांनी केले. यामध्ये योगाची व्याख्या ’योग: चित्तवृत्ती निरोध:’ अर्थात योग म्हणजे ‘देह आणि चित्त यांच्या ओढाताणीत मानवाला अनेक जन्मांपर्यंत आत्मदर्शनापासून वंचित राहाण्यापासून वाचवणारा’ अशी केली आहे. चित्तवृत्तींच्या निरोधाने (दमनाने) नव्हे, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच होऊ न देणे म्हणजे योग. मन निर्विकार करण्यासाठी महर्षी पतंजली यांनी अनेक पायर्‍या व साधने सांगितली आहेत म्हणूनच योगशास्त्र मुख्यत: मानसिक आहे, शारीरिक नाही. योग म्हणजे केवळ योगासने नाही. योगासने ही केवळ एक पूर्वतयारी आहे. योगशास्त्रात आठ अंगे-पायर्‍या आहेत. म्हणून त्याला ’अष्टांगयोग’ही म्हणतात.
 
अष्टांग योगामध्ये यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या आठ अंगांचा समावेश होतो. यम म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, नियम म्हणजे, पावित्र्य, संतोष, तपस्या, अध्ययन आणि आत्मसमर्पण होय. आसन म्हणजे बसणे, पतंजली सूत्रात यालाच ‘ध्यान’ म्हटले आहे. प्राणायाम म्हणजे श्वासाला नियंत्रित करणे, तर प्रत्याहार म्हणजे अमूर्त. धारणेमध्ये एकाच लक्ष्यावर ध्यान लावण्याचा अंतर्भाव होतो, तर ध्यानात ध्यानाच्या वस्तूच्या प्रकृतीचे गहन चिंतन केले जाते. समाधी अवस्थेत ध्यानाच्या वस्तूला चैतन्यात विलीन केले जाते, ज्याचे सविकल्प आणि अविकल्प असे दोन प्रकार आहेत. योगाचे मंत्रयोग, हठयोग, लययोग, राजयोग असे प्रकार आहेत.
 
योगासन : आरोग्याची गुरुकिल्ली
निरामय आरोग्यासाठी, सात्त्विक जीवनशैलीसाठी, संस्कारक्षम नियंत्रित मनासाठी आणि सात्त्विक विचारांसाठी योगासनांचे महत्त्व सर्वोच्च आहे. योग आपल्या जीवनातील मानसिक ताणतणाव कमी करून आपल्या शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण करतो, परंतु केवळ योगासने करणे म्हणजेच योग असे नसून आसने ही योग क्रियेचा घटक आहेत. झोपेतून उठल्यावर मानवासहित कित्येक प्राणी शरीर ताणतात किंवा आळोखे पिळोखे देतात, जसे की कुत्रा, मांजर आदी. या क्रियेतून आनंद अनुभवला जातो किंवा शरीराचा थकवा, आळस झटकला जातो. हाच योगाचा मूळ बिंदू आहे. शरीर आणि त्याच्या अंगाला ताणणे हा योगाचा पहिला भाग आहे. यालाच वेगवेगळ्या आसनांच्या नावाने ओळखले जाते.
 
ताडासारखे शरीर ताणले तर ताडासन, धनुष्याप्रमाणे धनुरासन आदी. योगासनांमध्ये वज्रासन प्रभावी असून यात आपल्या दोन्ही गुडघ्यांना वाकवून पायाच्या पंजावर बसावे लागते. वज्रासनामुळे शरीर वज्रासारखे कठोर होते. तसेच सकाळी उपाशीपोटी किंवा संध्याकाळच्या जेवणानंतर हे आसन केल्यास अन्नपचन सुलभ होते. कंबर, पाठदुखीतही वज्रासन लाभदायक ठरते. प्राणायाम, सूर्यनमस्कार, नेति, ध्यान आदी योगाचेच भाग आहेत. प्राणायामात दीर्घ श्वासोच्छ्‌वासाची क्रिया केली जाते.
 
योगासनांचे गुण आणि लाभ
भारताने जगाला ज्या गोष्टी दिल्या त्यात ज्ञान-विज्ञानाच्या अनेक गोष्टी आहेत, ज्या जगाने स्वीकारल्या व मान्य केल्या. त्याचसाठी भारत आज जगभर ओळखला जातो. मानवी सभ्यतेच्या उत्क्रांतीत भारताचा फार मोठा वाटा आहे. त्यात आजच्या ज्ञान-विज्ञान युगात योगाचा समावेश नव्हता. दोन वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्ताव स्वीकारत ’आंतरराष्ट्रीय योग दिन’ जाहीर करून त्याचा समावेश ज्ञान-विज्ञानात केला. ‘वसुधैव कुटुंबकम्’चे ब्रीद घेऊन चालणारा भारत या माध्यमातून खर्‍या अर्थाने मानव कल्याणाच्या दिशेने अग्रेसर झाला.
 
योगासनांचे निरनिराळ्या व्यक्तींना, निरनिराळ्या काळात विविधांगी लाभ होतात किंवा एकाच आसनामुळे अनेकानेक प्रकारचे लाभ होतात. योगासनांचे वैशिष्ट्य म्हणजे ही विशिष्ट व्यायामपद्धत तर आहेच, मात्र यासाठी कोणत्याही प्रकारे अधिकचा वेळ अथवा पैसा, किंवा अधिकच्या साधनांची वा साहित्याची आवश्यकता नसते. योगासने गरीब-श्रीमंत, आबालवृद्ध, सबल-दुर्बल, सर्व स्त्री-पुरुष अगदी कोणीही करू शकतात. योगाच्या लोकप्रियतेचे हेच रहस्य आहे की लिंग, जाती, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांमध्ये न गुरफटता योगामुळे सर्वांना समान लाभ होतो. अगदी चिंतक, बैरागी, अभ्यासक, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही योगाच्या माध्यमातून लाभ प्राप्त करू शकतो. योगासनांमुळे ताकद मिळते, त्याचबरोबर शरीर आणि मनाला ताजेतवाने करण्याच्यादृष्टीने योगासने उपयुक्त ठरतात. योगासनांमुळे शरीरातील अंतर्गत ग्रंथी आपले काम उत्कृष्ट पद्धतीने करतात आणि यौवनावस्था टिकवून ठेवण्यात सहाय्यक ठरतात. नियमित योगासनांमुळे पोट साफ होते आणि पचनेंद्रिये पुष्ट होतात. योगासनांमुळे मेरूदंड तथा मणके, हाडे लवचिक होतात.
 
तेव्हा, आजच्या योग दिनाच्या निमित्ताने आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी योगसाधनेचे व्रत अंगिकारुया आणि आपल्या जीवनशैलीला अधिक आरोग्यदायी, तणावमुक्त आणि मानसिक शांतीच्या दिशेने मार्गस्थ करुया.
 
- महेश पुराणिक