लोणार सरोवरापासून १०० मीटर परिसरामध्ये विकासकामांना मज्जाव - सुधीर मुनगंटीवार

    दिनांक  20-Jun-2017महाराष्ट्रातील पाणीसाठ्यांपैकी नैसर्गिकरित्या उत्कापालापासून निर्माण झालेले लोणार सरोवर संरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी आज वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी लोणार सरोवराच्या सीमेपासून १०० मीटर अंतरामध्ये कोणतेही विकासकाम अथवा बांधकाम करता येणार नाही अशी स्पष्ट सूचना दिली आहे.


उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे लोणार हे जगातील सर्वात मोठे सरोवर आहे. या सरोवराला खगोलप्रेमी तसेच शास्त्रज्ञ वर्षभर भेट देत असतात. अशा जागतिक किर्तीचा ठेवा बुलडाणा जिल्ह्यात आहे. या ठेव्याचे संवर्धन आणि विकास यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रयत्न होणे आशादायक आहे.

Embeded Object


लोणार सरोवर परिसरात बेसॉल्ट खडकापासून निर्माण झालेला जगातील तिसरा सर्वांत मोठा पाणीसाठा आहे. याबाबत बुलढाण्याचे लोणार मतदार संघातील आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्याशी महा तरुण भारतने संवाद साधला असता ते म्हणाले, “लोणार सरोवर प्रकरणी उच्च न्यायालयात केस सुरू होती. सध्या लोणार सरोवराच्या कुंपणापासून १०० मीटर परिसरात घरकुल योजनेतून बांधकाम झालेले आहे. तसेच इतर अतिक्रमणे काढण्याबाबतही चर्चा सुरू आहे. याच हद्दीच्या आतमध्ये नगरपालिका, एक माध्यमिक शाळा व पंचायत समितीची इमारत येते. याबद्दल शासन काय निर्णय घेणार हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.”


याबाबत स्थानिक प्रशासनाला मात्र स्पष्टता किंवा माहिती नसल्याचे महा तरुण भारतने घेतलेल्या आढाव्यात लक्षात आले. आयुक्तांनी या विषयी समिती गठित केलेली असून आजच्या निर्णयाबद्दल आतापर्यंत माहिती कळाली नसल्याचे बुलढाणा जिल्हा परिषदेचे उपबांधकाम अभियंत्यांनी सांगितले. पण ही मर्यादा ५०० मीटर असावी अशी मागणी होती व त्यावर मागे झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आज सुधीर मुनगुंटीवार यांनी जाहिर केलेल्या निर्णयानुसार ही मर्यादा १०० मीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे.