‘स्वच्छ इंडिया’चा वसा घेतलेला उद्योजक

    दिनांक  02-Jun-2017   
 

 
 
 
सत्तरचं दशक हे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारं दशक ठरलं. १९६० साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला होता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. दरम्यान १९६२ साली चीनने भारतावर चढाई केली. त्या लढाईत आपल्याला शरणागती पत्करावी लागली. हताश झालेल्या पंतप्रधान नेहरूंनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री केले. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला,’ अशी नवी म्हण रूढ झाली. १९६५ साली पाकिस्तानला आपण इंगा दाखवला, तेव्हा चव्हाणच संरक्षणमंत्री होते. चव्हाणांनंतर महाराष्ट्राने अल्प कारकिर्दीचे दोन मुख्यमंत्री पाहिले. त्यानंतर महाराष्ट्रात वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले होते. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा सन्मान त्यांना प्राप्त आहे. त्यांच्याच काळात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारं ‘शिवसेना’ नावाचं एक भगवं वादळ जन्माला आलं. मराठी माणसांवर जिथे जिथे अन्याय होईल, तिथे शिवसेना जाई, असं चित्र निर्माण झालं. मराठी माणसांच्या नोकर्‍यांवर गदा आणणार्‍या दाक्षिणात्यांना सेनेने सळो की पळो करून सोडले होते. अवघी मुंबई सेनामय झाली होती.

   
या सगळ्या गोष्टींपासून दूर कोकणातून आलेला तुकाराम खानविलकर नावाचा एक निरक्षर तरुण नरिमन पॉईंटजवळच्या एका नवीन तयार झालेल्या इमारतीच्या वेल्डिंगचं काम करत होता. १९६७ सालची ही घटना आहे. तेव्हा एक्सप्रेस टॉवर ही मुंबईमधली उंच इमारत म्हणून गणली जात होती. इमारत वापरण्यासाठी लगबग चाललेली. एका माळ्यावर काही पाहुणे येणार होते, मात्र तिथला कॉंक्रिटचा ढिगारा तसाच पडून होता. सोबत काही कचरा पण होता. ‘आता हे आवरणार कोण?’ असा प्रश्न मालकाला पडला. त्याचं लक्ष तुकारामकडे गेलं. ‘‘तुकाराम, दोन-चार पोरांना हाताशी घेऊन जरा हा ढिगारा हलवून माळा साफ करून घेशील? तुला त्याचा मोबदला देईन,’’ मालक म्हणाला. तुकारामने होकारार्थी मान हलवली. साफसफाईसाठी मुलं शोधायला तो जवळच्याच ओव्हल मैदानात गेला. मे महिन्याचे दिवस होते. उन्हाळी सुट्टी म्हणून सगळी मुलं क्रिकेट खेळत होती. त्यातील चार मुलांना तुकारामने सोबत घेतलं. तो संपूर्ण माळा पाहुणे यायच्या आधी साफ केला. मालक खुश झाला. तुकारामला त्याने चांगला मोबदला दिला. एव्हाना सफाईची ही बातमी संपूर्ण इमारतीमध्ये कळली आणि तुकारामला इतर मजल्यांच्या सफाईचे निमंत्रण आले. तुकारामने त्याच मुलांना सोबत घेऊन संपूर्ण एक्सप्रेस टॉवर साफ केला आणि येथेच ‘संजय मेन्टेनन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’चा (एसएमएस) जन्म झाला. ‘हाऊस किपिंग’ या अज्ञात उद्योगाची मराठी माणसाने केलेली ती सुरुवात होती. मुंबईत बस्तान बसल्यानंतर तुकाराम यांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत आणलं. तुकाराम यांना सहा मुलं होती. त्यातील एक संजय. आठवीमध्ये असल्यापासून संजय एक्सप्रेस टॉवरमध्ये बाबांसाठी दुपारी जेवणाचा डबा घेऊन जात असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत तो कामगारांसोबत काम शिकला. कामगारांची सुख-दु:ख जाणून घेऊ लागला. १९८५ साली त्याने बीए पूर्ण केलं. लॉसाठी प्रवेश घेतला. लॉची पहिल्या वर्षाची परीक्षा देतानाच त्याला जाणवलं की, हे आपल्याला झेपणारं नाही. त्याने पूर्णपणे बिझनेसवर लक्ष द्यायचं ठरविलं. संजय खानविलकरांनी आपल्या बाबांनी पाया घातलेल्या या उद्योगाच्या इमारतीच्या यशाचे इमले बांधण्यास सुरुवात केली. आतापर्यंत खानविलकरांच्या कंपनीने ओरिएंटल बँक, क्रॉसवर्ल्ड, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय, ग्लोबल हॉस्पिटल, रिलायन्स, टाटा टेक्नॉलॉजी, मोनोरेल अशा ७५० हून अधिक नामांकित कंपन्यांना सेवा पुरविलेली आहे. ओव्हल मैदानातील त्या मुलांनिशी सुरू झालेल्या या कंपनीत सध्या १६ हजारांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. या सर्व कर्मचार्‍यांची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना उत्तम दर्जाचे युनिफॉर्म्स, साफसफाईसाठी आधुनिक यंत्रणा आदी सगळी साम्रगी कंपनी पुरविते. मल्टिप्लेक्स ज्यावेळेस सुरू झाले, त्यावेळेस त्याच्या स्वच्छतासेवेचे काम ‘एसएमएस’ला मिळाले होते. प्रेक्षक सिनेमागृहातून एका प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर नवीन प्रेक्षक सिनेमागृहात प्रवेश करताना चार मिनिटांचा अवधी असे. या चार मिनिटांत संपूर्ण सिनेमागृह स्वच्छ केले जाई. मात्र, याची तालीम करण्यासाठी ‘एसएमएस’ची मुलं १५ दिवसांपासून प्रॅक्टिस करत होती. त्यांना त्याप्रकारे ट्रेनिंगच दिलं गेलं होतं. एक्सप्रेस टॉवरला आग लागली त्यावेळेस अवघ्या आठ तासांत संपूर्ण इमारत साफ करण्याचं अवघड काम ‘एसएमएस’ने केलं होतं. संजय खानविलकरांच्या कामात झोकून देण्याच्या पद्धतीमुळे एक्सप्रेस टॉवर त्यांच्याकडे ५० वर्षे होते. एचडीएफसी भारतात आल्यापासून २६ वर्षे ते क्लायंंट खानविलकरांकडे होते. शून्यातून सुरू झालेला हा उद्योग आज ३०० कोटी रुपयांची उलाढाल करीत आहे.
 
खानविलकरांनी सामाजिक बांधिलकी देखील तितकीच जपली आहे. बाबांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून ते संपूर्ण केईएम हॉस्पिटल स्वच्छ करत असत. परळ भागात राहत असल्याने केईएम सोबत त्यांचा एक वेगळाच स्नेह होता. लालबागच्या राजाची देखील अशीच स्वच्छतेच्या माध्यमातून १० दिवस सेवा केली जाते. एकदा तिरुपतीहून महालक्ष्मीला आल्यानंतर हे देवस्थान साफ करण्याची कल्पना सुचली. नवरात्रीच्या अगोदर काही दिवसांपासून स्वच्छतेला सुरुवात केली जाते, ते अगदी नवरात्री संपेपर्यंत. महालक्ष्मीचं देऊळ पूर्णपणे चकाचक केले जाते. सलग १३ वर्षे स्वच्छतेचं हे व्रत सुरूच आहे.
  
 
उद्योगात येताना तरुणांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवावी, सचोटीने उद्योग करावा. कामात पारदर्शकता असावी. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपल्या कामावर आपलं प्रेम असावं. खानविलकर सांगतात की, ‘‘आजही एखादं टॉयलेट साफ करताना त्यांना जरासुद्धा त्याची घृणा वाटत नाही. त्यामुळेच सोबतचा मुलगादेखील तितक्याच समर्पित भावनेने स्वच्छतेचे कामकरू शकतो.’’ वयाच्या ५०व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय संजय खानविलकरांनी खूप आधीच घेतला होता. यशाच्या शिखरावर असतानाच संजय खानविलकरांनी २२ मार्च २०१७ रोजी ही कंपनी विकली. आता आयुष्याची दुसरी इनिंग एका नवीन उद्योगधंद्यात खेळण्यास ते सज्ज आहेत. येत्या काही महिन्यांतच स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या आशावादी साहसाला सलाम आणि शुभेच्छा!
 
- प्रमोद सावंत