स्वमग्न स्वयंसेवक विद्यार्थ्याचे दहावीत सुयश

    दिनांक  18-Jun-2017   
 

 
सहकारी स्वयंसेवकांचे पाठबळ
 
महेश पुराणिक
 
राज्य शिक्षण मंडळातर्फे (एसएससी) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये रा. स्व. संघाचा स्वयंसेवक जय मनोज जाधव या स्वमग्न-ऑटीझमग्रस्त विद्यार्थ्याला तब्बल ८०.२ टक्के गुण मिळाले आहेत. जयसारख्या स्वमग्न विद्यार्थ्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तोडीसतोड अभ्यास करून उत्कृष्ट गुण मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचबरोबर जयच्या वाशी येथील फादर ऍग्नेल शाळेचेही अभिनंदन केले जात आहे. कारण जयसारख्या स्वमग्न विद्यार्थ्याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने वर्गात दाखल करून घेणे आणि त्याच्याकडून उत्तमतयारी करण्यात शाळा व तेथील शिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे.
 
जय हा राहायला नेरुळ येथेे आहे. तसेच त्याचे वडील कुर्ला परिसरातील नेहरूनगर येथे राहत असल्यापासून संघाचे स्वयंसेवक आहेत, तर आजी राष्ट्र सेविका समितीमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे त्याच्यावर बालपणापासूनच घरातील संघाच्या संस्कार, विचार, शिस्त आणि नियमयांचा प्रभाव पडला. एवढेच नव्हे, तर यावर्षी त्याने वर्षप्रतिपदेला रा. स्व. संघाच्या संचलनातदेखील भाग घेतला. हेही एक आगळे-वेगळे चित्र म्हणायला हवे. जयने दहावीत मिळविलेल्या यशाबद्दल त्याची आई मनीषा जाधव यांनी सांगितले की, ’’जय दहावीला आहे म्हणून आम्ही त्याचा कोणताही विशेष अभ्यास करून घेतला नाही. आमची तर तो फक्त उत्तीर्ण व्हावा एवढीच अपेक्षा होती. मात्र, त्याने जे यश मिळविले आहे, ते आमच्यासाठी नक्कीच सुवर्ण कामगिरीसारखे आहे. सध्या तरी आम्ही त्याच्या या कर्तृत्वाने खूपच आनंदी आहोत. तसेच यात मला माझ्या कुटुंबीयांची, डॉक्टरांची, जयच्या वडिलांची, शाळेतील शिक्षकांचीही साथ लाभली. तरीही हे यश जयचीच कर्तबगारी आहे.’’
 
स्वमग्न मुले सहसा एका ठिकाणी बसत नाहीत. चिडचिड करतात किंवा त्यांच्या कृतींमुळे बर्‍याचदा त्यांचे पालकच त्यांच्यासमोर हात टेकतात. पण जयच्या आई-वडील, दोन्ही आजी, काका यांनी नियतीने दिलेले हे आव्हान पेलले. तर जयने त्या आव्हानावर मात करत दहावीत उत्तमगुण मिळवत यशाचे शिखर गाठले ही खरे तर मोठी अभिमानाची गोष्ट. याबाबत जयचे वडील मनोज जाधव यांनी सांगितले की, ’’जयच्या यशामध्ये त्याच्या आईचे सर्वात अधिक परिश्रमतर आहेत. तसेच त्यामागे संघ विचारही आहेत. संघाच्या संघटनेत शक्ती किंवा एकजुटीने कामकरण्याच्या वृत्तीमुळे आम्ही सर्व कुटुंबीयदेखील जयच्या आयुष्यातील स्वमग्नतेचा एकजुटीने सामना करत आहोत. सर्वांनी एकत्र येऊन जग काहीही म्हटले तरी आम्ही आमचे कामसुरूच ठेवले, यामागे निश्चितच संघाच्या विचारांचीही प्रेरणा आहे.’’ त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या रामदास स्वामीकृत दासबोधाच्या बैठका, निरुपण याचाही लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
अभ्यासाव्यतिरिक्त जयला अन्य छंदाचीही आवड आहे, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. सायकलिंग, पोहणे, खेळांतही तो भाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जय शिस्तप्रिय असल्याचेदेखील त्याच्या वडिलांनी सांगितले.
 
ऑटीझमग्रस्त किंवा स्वमग्न मुलांच्या बाबतीत समाजात जागृती व्हायला हवी. जयच्या दहावीतील उत्तमकामगिरीमुळे प्रस्रमाध्यमांनी हा विषय समाजासमोर नेला. याबद्दल प्रसारमाध्यमांचेही आभार, असेदेखील जयचे वडील मनोज जाधव यांनी यावेळी सांगितले.