आशा भोसले देखील मादाम तुसाँमध्ये दिसणार

15 Jun 2017 18:32:38

 

प्रख्यात गायिका आशा भोसले यांचा मेणाचा पुतळा आता दिल्ली येथील ‘मादाम तुसाँ’ या संग्रहालयात साकारण्यात येणार आहे. जगप्रसिद्ध ‘मादाम तुसाँ’ या संग्रहालयाची शाखा दिल्ली येथे उभारण्यात आली असून या संग्रहालयाची शान वाढवण्यासाठी आता या संग्रहालयात आशा भोसले यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

 

आशा भोसले यांच्या चेहऱ्याचे माप घेण्यासाठी काही विदेशी संघ भारतात आला असल्याने ‘मादाम तुसाँ’ संग्रहालयात त्यांचा पुतळा उभारला जाणार असल्याची बातमी समजली. ‘मादाम तुसाँ’ संग्रहालयात भारतातील प्रसिद्ध लोकांचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहे. त्यामुळे या संग्रहालयात पुतळा उभारण्यात येणे ही आपसूकच मोठी बाब मानली जाते.

 

हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर  यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला मीनाकुमारी पासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला आणि ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यामुळे आशा भोसले हिंदी चित्रपट सृष्टीत अष्टपैलू गायिका म्हणून ओळखल्या जातात.

 

Powered By Sangraha 9.0