आता लष्करप्रमुख टार्गेट

    दिनांक  13-Jun-2017   


अर्वाच्च शब्दांत राजकीय टीका - टीप्पणी, नेते मंडळींची वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांची लाखोली आणि एकूणच विरोधाचा खालावलेला भेसूर स्वर निश्चितच चिंताजनक आहे, पण गेल्या काही दिवसांपासून सरपंचांपासून ते पंतप्रधानांवर नाहक तोंडसुख घेणार्‍यांनी आता आपला मोर्चा थेट लष्करप्रमुखांकडे वळवल्यामुळे सैन्याचे मनोबल खच्ची करण्याचे चालवलेले हे प्रयत्न सर्वथा अघोरी आणि देशविघातक असेच म्हणावे लागतील. दुर्देवाने, ही कुवचने त्याच कॉंग्रेसच्या मुखातून, कृत्यांतून पाझरताहेत, जी कॉंग्रेस गांधीवाद, नेहरूवादाचा दाखला देत भारतीय स्वातंत्र्याचे स्वत:ला एकमेव शिल्पकार म्हणून मिरविण्यात धन्यता मानते. कॉंग्रेसचे माजी खासदार आणि शीला दीक्षितांचे सुपुत्र संदीप दीक्षित यांनी रविवारी थेट भारतीय लष्करप्रमुखांना ‘सडक का गुंडा’ म्हणत एकच खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, ‘‘आपल्या सैन्यात पाकप्रमाणे माफियाराज नाही. रस्त्यावरील गुंडांप्रमाणे ते (पाकी सैन्य) काहीही बरळतात, पण जेव्हा आपले लष्करप्रमुख रस्त्यावरील गुंडाप्रमाणे वक्तव्ये करतात, तेव्हाही मला वाईट वाटते.’’  लष्करप्रमुखांची तुलना अशी थेट रस्त्यावरील गुंडाशी करण्यापर्यंत या कॉंग्रेसी नेत्याची मजल गेल्यानंतर कॉंग्रेसने साहजिकच यापासून फारकत घेत ‘हात’ वर केले. दीक्षितांच्या या बेताल वक्तव्यावरून गदारोळ उडाल्यानंतर त्यांनी माफीनामाही जारी केला असला तरी देशाच्या लष्करप्रमुखांचे म्हणणे, त्यांच्या कृती, त्यांची प्रतिमा तुम्हाला पटत नाही, म्हणून त्यांची गणना थेट गुंडांच्या वर्गात करणे, ही कुणीकडची कॉंग्रेसी हुशारी?

 

चीन आणि पाकिस्तानबरोबर एकत्र युद्ध करण्याची वेळ आली, तर भारतीय सैन्य तयार असल्याचे धाडसी विधान लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले होते. त्यानंतर पुरोगामी, लिबरलांकडून रावत यांच्या आत्मविश्वासाला फोल ठरवण्यासाठी जणू एकच स्पर्धा लागली. त्यापूर्वीही काश्मीरमधील दगडफेकीपासून बचावासाठी मेजर गोगोई यांनी एका तरुणाची ढाल करून सैन्य तुकडीचे प्राण वाचवले होते. रावत यांनी गोगोईंचा उचित सन्मान केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तेव्हा पार्थ चॅटर्जीने आपल्या एका लेखातून रावत यांची तुलना थेट १९१९ साली झालेल्या पंजाबच्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या जनरल डायरशी करण्याच्या महामूर्खपणा केला होता आणि आता तशाच बौद्धिक गुंडागर्दीचे कॉंग्रेसने केलेले प्रदर्शन निंदनीयच आहे.

------- 

 

सैन्याला तरी सोडा!

 

देशाच्या सुरक्षेची सर्वस्वी जबाबदारी असलेल्या लष्करप्रमुखांना थेट ‘रस्त्यावरचा गुंड’ म्हणेपर्यंत जर कॉंग्रेसी नेत्यांची मजल जात असेल, तर यावरूनच त्यांच्या राष्ट्रीय विचारधारेच्या पक्षाचा लष्कराकडे बघण्याचा दृष्टिकोन किती कलुषित आणि पूर्वग्रहदूषित आहे, याची प्रचिती यावी. ‘मुखी राष्ट्रवाद आणि व्यवहारात गुंडाराज’ अशी काहीशी बिकट अवस्था कॉंग्रेसची झाली असून त्याला नेतृत्वहीनता जबाबदार आहे का, असा प्रश्न पडावा; अन्यथा अशी निराधार, निलाजरी विधाने करण्यापूर्वी पक्षनेतृत्वाचा थोडाफार का होईना, नेतेमंडळींना धाक असता. पण, कॉंग्रेसमध्ये असा प्रकार अजिबात नाही. कारण, राहुल गांधी यांनाही अशी वादग्रस्त विधाने करण्यात इटालियन पदवीच प्राप्त आहे. मग ते मोदींना उद्देशून केलेले ‘खून की दलाली’चे खालच्या पातळीवरचे विधान असो वा भिवंडीत रा. स्व. संघावर केलेला गांधीहत्येचा निराधार आरोप, जसा नेता तशीच ही वाचाळ कार्यकर्त्यांची निर्बुद्ध फौज. त्यातच संदीप दीक्षितांना दिल्लीतही कोणी फारसे विचारत नाही, तरी नाहक आपली अक्कल पाजळायची आणि अकलेचे तोरे तोडायचे, अशा त्या नाठाळ गटाचे हे दीक्षित प्रतिनिधी.

 

लष्कराला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची पुरोगाम्यांनी आरंभलेली तर्‍हा कॉंग्रेसी गिरवू लागले आहेत. केरळमधील युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भर चौकात गायीचे वासरू कापून गोहत्याबंदी आणि गोमांस विक्रीला केलेला विरोध असो वा लष्करप्रमुखांना पाण्यात पाहणारी ही बेजबाबादार विधाने, कॉंग्रेसची वाटचाल कम्युनिस्ट विचारसरणीकडे होतेय का, इतपत शंका यातून यावी. अहिंसेचे नारे लगावणार्‍या कॉंग्रेसने देशाच्या लष्करप्रमुखाच्या चारित्र्यावर अशी चिखलफेक करावी, यापेक्षा विरोधाभास तो कोणता ?  मनमोहन सिंगांचे संपुआ सरकार सत्तेवर असताना जेव्हा जेव्हा पाककडून आगळीक झाली, काश्मीरमध्ये जवानांवर हल्ले झाले, त्या त्या वेळी विरोधी पक्षात असूनही भाजपने लष्करप्रमुखांना राजकीय रणांगणात ओढले नाही. सैन्य आणि त्या सैन्याचे खंबीर नेतृत्व करणार्‍या लष्करप्रमुखांना ‘गुंड’ म्हणून अपमानित करणे म्हणजे खरंतर प्रत्येक जवानाचा अपमान करण्यासारखेच! पण, आपल्या कार्यकाळात लष्करप्रमुखांचे ‘हात’ बांधून ठेवणार्‍या, पंतप्रधानांच्या अध्यादेशाला कस्पटासमान भिरकावणार्‍या बालिश नेतृत्वाकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून राजकीय सभ्यतेची अपेक्षा करणेच म्हणजे मुळी माशाला जमिनीवर पोहायला भाग पाडण्यासारखे आहे.

 

- विजय कुलकर्णी