फाळणीनंतरचा अग्निप्रलय

    दिनांक  12-Jun-2017   
 

 
 
१८५७ चे स्वातंत्र्यसमर ते १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा इतिहास हा खरे तर अनेकानेक बर्‍या-वाईट घटनांनी भरलेला आहे. स्वातंत्र्यप्राप्ती हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून एका व्यक्तीपासून ते समाजातील विविध गट, जहाल, मवाळ, क्रांतिकारक, विविध जातीसमूह, संस्था, संघटना, राजकीय पक्ष आदी सर्वांनी महत्प्रयास केले. ज्याचे पर्यावसन भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाले. मात्र, भारतीय स्वातंत्र्याची पहाट होत असताना नेमकी परिस्थिती कशी होती? फाळणीच्या आधी, दरम्यान आणि नंतर देशातले वातावरण कसे होते? गांधीजींची हत्या आणि त्या पाठोपाठ त्यांच्याच अहिंसेच्या विचारांना हरताळ फासत केल्या गेलेल्या दंगली, हत्या हाही त्याच इतिहासाचा भाग आहे. याच घटनांवर आधारित लेखक अनंत शंकर ओगले यांनी लिहिलेली ‘अठ्ठेचाळीसचा प्रलय’ ही कादंबरी पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. गेली कित्येक वर्षे मराठीमध्ये चरित्रात्मक कादंबर्‍यांचे लिखाण करणार्‍या अनंत शंकर ओगले यांच्या स्वा. सावरकर, महात्मा गांधी, भारताची फाळणी, भारताचे स्वातंत्र्य या विषयांशी संबंधित असलेली ‘पहिला हिंदुह्रदयसम्राट,’ ’फाळणी भारताची, कहाणी गांधी हत्येची,’ ही पुस्तके आणि ’होय! मी सावरकर बोलतोय!’ हे स्वा. सावरकरांच्या जीवनातील राजकीय बाजू दाखवणारे नाटक याआधी प्रकाशित झाले आहे. आता त्याच शृंखलेतील ‘अठ्ठेचाळीसचा अग्निप्रलय’ ही कादंबरीही प्रकाशित झाली आहे.
 
भारताच्या इतिहासातला सर्वात दुर्दैवी आणि करुण अध्याय म्हणजे भारताची फाळणी. फाळणीनंतर देशात जवळपास वीस लाख लोकांचे बळी गेले. पाठोपाठ गांधीजींची हत्या आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी झालेली ब्राह्मण समाजाची होरपळ! हा सर्व पट या कादंबरीत मांडला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी गावगाड्याची स्थिती काय होती? सामाजिक, राजकीय, धार्मिक वातावरण कशा प्रकारचे होते? कॉंग्रेसच्या राजकारणाला भारतात त्याकाळी समर्थ पर्यायच नसल्याकारणाने एक प्रकारचा राजकीय वर्चस्ववाद कसा आपसुक अस्तित्वात आलेला होता हिंदुत्ववादी राजकारण जनाधाराच्या अभावामुळे कसे क्षीण भासत होते, याचे वास्तववादी चित्रण या कादंबरीत केले आहे.
 
महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून अठरापगड जातीची माणसे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. इथला समाज एकमेकांशी मिळून मिसळून वावरताना दिसतो. त्यांचे मैत्रीपूर्ण संबध सर्वच पातळीवर जाणवतात. या कादंबरीत दर्शविलेली परिस्थिती थोड्या कमी जास्त प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रात तशीच त्या काळी होती. मग हा समाज, त्याची नाळ मुख्य प्रवाहापासून का तुटली? त्याचे समाजशास्त्रीय उत्तर हेच आहे की, हिंदूंमधल्या वर्णवर्चस्वाचा परिणामम्हणून ३ टक्के लोक एका बाजूला राहिले, उर्वरित ९७ टक्के लोक बहुजनसमाज म्हणून वेगळे झाले आणि त्याचा परिणामम्हणजे, हा ‘अठ्ठेचाळीचा प्रलय!’ ओघवती रसाळ भाषा आकर्षक कथनपद्धतीबरोबरच मुख्य म्हणजे या पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय अर्थवाही आहे. तसेच यात असलेली धावती रेखाचित्रे तर दाद देण्याइतकी अप्रतिमआहेत. मराठीत अशी चित्रशैली क्वचितच आढळते. विनोद, कारुण्य यांच्या अंगाने केलेले शैलीदार लेखन हा सुद्धा खास विशेष! त्यामुळे हातात घेतली की ही लघु कादंबरी वाचून पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवता येत नाही, हे लेखकाच्या लेखनशैलीचे आणि कादंबरीचेही यश आहे.
 
पुस्तकाचे नाव - अठ्ठेचाळीसचा अग्निप्रलय, 
लेखक - अनंत शंकर ओगले, 
प्रकाशक- कॉन्टिनेंटल प्रकाशन, 
पृष्ठे - ९२, 
किंमत - १०० रु.
 
 
- महेश पुराणिक