मोदी माझ्यामुळे पंतप्रधान झाले, मला मोबदला द्या !

    दिनांक  12-Jun-2017   


 

मंत्रालयात आलेल्या इसमाच्या मागणीमुळे अधिकारी हैराण

 

नरेंद्र मोदी हे माझ्यामुळे पंतप्रधान झाले, देवेंद्र फडणवीस हे माझ्यामुळे मुख्यमंत्री झाले. याचा मला मोबदला द्या, अशी अजब मागणी घेऊन आलेल्या एका इसमामुळे मंत्रालयातील अधिकारी चांगलेच हैराण झाले. ही व्यक्ती आपण लेखक असल्याचे सांगत असून त्याच्या फेसबुकवरील लेखनामुळे केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले असल्याचा त्यांचा दावा आहे.

 

दिलीप वाबळे असे या व्यक्तीचे नाव असून ते स्वतःला लेखक म्हणवतात. त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या लेखांमुळे लोकांवर प्रभाव पडून २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तसेच त्यानंतरही भाजपने देशातील ज्या काही राज्यांत सत्ता मिळाली तीदेखील वाबळे यांच्या लेखांमुळेच मिळाली असे ते म्हणतात. आणि यामुळेच त्यांना आता भाजपकडून वा सरकारकडून मोबदला हवा आहे. हीच मागणी घेऊन वाबळे पोहोचले ते मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयात. मुख्यमंत्री कार्यालयातील सर्वच अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी मला मोबदला मिळायला हवा आणि ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायला हवी अशी मागणी केली. या सगळ्या प्रकारानंतर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी चांगलेच हैराण झालेले दिसले.

मंत्रालयात रोज निरनिराळी कामे घेऊन असंख्य लोक येत असतात. काहींची कामे खरी असतात आणि काहींची ही अशी. मध्यंतरी ‘मला नोबेल पारितोषिक मिळायला हवे’ ही मागणी घेऊन एक व्यक्ती मंत्रालयात फिरत असल्याची बातमी गाजली होती. आता या व्यक्तीने देशातील सारेच सत्तापरिवर्तन त्याच्या एकट्याच्या लेखनामुळे झाल्याचा दावा केल्याने मंत्रालयात सारेच चक्रावून गेले. वाबळे म्हणाले की, माझे आधी धारावीत स्वतःचे घर होते. तेव्हा मी माझे लेख लिहून त्याच्या झेरॉक्स प्रती काढून वाटत असे. त्याचा खर्च इतका झाला की मी माझे घर विकले आणि भाड्याच्या घरात राहू लागलो. याचवेळी माझ्या लेखांमुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर कोणीतरी मला फेसबुकबद्दल सांगितले व मी माझे लेख फेसबुकवरून प्रकाशित करू लागलो. याचा फायदा भाजपला सर्वत्र झाला. आज माझे फेसबुकवर हजारो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे भाजपला माझ्या लेखांचा आणखी फायदा हवा असल्यास त्यांनी मला योग्य मोबदला द्यावा! वाबळे यांची फेसबुक प्रोफाईल तपासली असता त्यांच्या मित्र यादीत अवघे पाचजण असल्याचे आढळून आले. ही सगळी कहाणी ऐकून व त्यावरची मागणी ऐकून त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांनी वाबळे यांना ‘तुम्ही पुढच्या महिन्यात या’ असे सांगून बोळवण केली. 

- निमेश वहाळकर