मोदी यांचा यशस्वी रशिया व युरोप दौरा

    दिनांक  11-Jun-2017   
 
 

 
चार देशांनी दहशतवादाविरोधात उभे राहण्यासाठी दिलेला सक्रिय प्रतिसाद महत्त्वाचा आहे. या दौर्‍यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या दहशतवादाची गंभीर दखल घेतली गेली, तशीच पर्यावरणाच्या जतनासाठी बांधिलकी व्यक्त केली गेली. एकुणात, दहशतवादाच्या विरोधातील जागतिक आघाडी अधिक बळकट करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी रशिया व युरोपीय देशांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता, मोदी यांचा हा दौरा यशस्वी ठरला, असेच म्हणता येईल.
 
हा महिन्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया, जर्मनी, स्पेन, फ्रान्स आदी देशांच्या दौर्‍यावर होते. आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याबरोबरच या देशांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताच्या पाठीशी राहावे, यासाठी त्यांचा हा दौरा उपयुक्त ठरला. आर्थिक, संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा हे दौर्‍याच्या विषय पत्रिकेवरचे महत्त्वाचे मुद्दे होते. त्यात जर्मनी, फ्रान्स आणि रशियाचा दौरा जास्त महत्त्वाचा होता. भारताच्या ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पासाठी जर्मनीतून आणखी मदत व्हावी, गुंतवणूक वाढावी, असा मोदी यांचा प्रयत्न होता. भारत आणि रशियात वार्षिक शिखर परिषद सेंट पीटर्सबर्गला झाली. दोन्ही देशांमधील संबंधांना यावर्षी ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मोदी आणि पुतीन यांच्यातील भेटीला जास्त महत्त्व आले होते. भारत हा रशियाचा जुना मित्र आहे. मात्र, काही वर्षांमध्ये रशिया चीनकडे झुकतो आहे. भारत रशियाकडून सर्वात जास्त लष्करी साहित्य घेत असताना रशियाने भारताचे हितसंबंधही जपायला हवेत. सौदी अरेबिया आणि अन्य देशांमध्ये अमेरिका एक संघटन उभे करत असताना रशिया आणि भारताचा मित्र असलेल्या इराण, इराक व सीरियातील संबंध कसे वळण घेणार, याबाबतही मोदी व पुतीन यांच्यादरम्यान चर्चा झाली.
 
रशियाबरोबर भारताने अनेक संरक्षण करार केले. भारताला आता रशियाकडून केवळ तंत्रज्ञान नको, तर त्याचं हस्तांतरणही हवे आहे. त्यानुसार काही तंत्रज्ञान हस्तांतरण व्हायला सुरुवात झाली आहे. अणुभट्‌ट्या उभारण्याचा निर्णय मोदी परदेश दौर्‍यात झाला. आता रशियाकडून अणुभट्‌ट्या उभारण्याच्या कामाला गती आली आहे. भारताला अण्वस्त्र पुरवठादार गटाचे सदस्यत्व मिळावे, तसंच भारताच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या अतिरेक्यांची चीनने भलावण करू नये, यासाठी रशियाने चीनवर दबाव आणावा, असा भारताचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचावरील मोदी यांची उपस्थिती भारताच्या गुंतवणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरली.
 
भारत-रशिया नात्यात तणाव?
मोदी व पुतीन यांच्या चर्चेतून उभय देशांची मैत्री वृद्धिंगत होईल. संरक्षणाबरोबरच रशियाशी कृषी, ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातही अधिकाधिक सहकार्य व भागीदारी वाढावी, अशी नरेंद्र मोदींची इच्छा आहे. सध्या रशिया-चीनदरम्यान ७० अब्ज डॉलर्स, तर भारत-चीनदरम्यान ६० अब्ज डॉलर्सचा वार्षिक व्यापार होतो. मात्र, भारत-रशियात केवळ सात अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो. हा व्यापार पुढील दोन वर्षांत दुप्पट करता येईल काय, यादृष्टीने भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. रशिया आणि चीन यांच्यातील जवळीक वाढत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार्‍या सिंक्यांग ग्वादार इकॉनॉमिक कॉरिडोरला अलीकडेच भारताने विरोध केला. मात्र, चीनने याच संकल्पित मार्गावर विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावली व रशियाने त्या बैठकीला हजेरीही लावली. म्हणजे भारताच्या भूमिकेची चीनने व रशियाने दखलही घेतली नाही.
 
सहा दशकांपूर्वी निकिता ख्रुश्चेव यांनी, ‘‘संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे व ही अविभाज्यता टिकविण्यासाठी रशिया भारताची भक्कम पाठराखण करील,’’ अशी ग्वाही दिली होती. त्यानंतरही संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत हीच ग्वाही रशियाने वारंवार अधोरेखित केली होती, पण सध्या काश्मीरच्या एकतृतीयांश हिश्श्यावर चीनने घुसखोरी केली आहे व रशिया मात्र भारताची बाजू घेण्यास तयार नाही. अफगाणिस्तानच्या प्रश्नावर मध्यंतरी रशियाने इराण, पाकिस्तान, चीन यांना चर्चेत सहभागी करून घेतले, पण भारताकडे दुर्लक्ष केले. अर्थात, भारतानेही संरक्षण साहित्य खरेदी करताना केवळ रशियाकडूनच ते खरेदी करण्याऐवजी फान्स, जर्मनी, इस्रायल याही देशांकडे मोर्चा वळविला. आता भारताने अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाशी जवळीक वाढविली आहे. याच काळात रशिया व अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध गहिरे झाले. रशियाने काळ्या समुद्रावरचे वर्चस्व तर पक्के केलेच, पण सीरियात मांड पक्की करून थेट भूमध्य महासागरापर्यंत मजल मारली. अमेरिकेने मग रशियावर प्रतिबंध लादले, तेव्हा या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी रशियाने चीनबरोबर सख्य जुळविले. या संबंधांमुळेही भारत-रशिया नात्यात तणाव निर्माण झाला.
 
दिल्ली व मॉस्को यांच्यातील दुरावा  
नवे मित्र मिळविताना रशियासारखा मित्र गमावण्याची वेळ येऊ नये, याचे भान भारताला आहे. म्हणूनच मार्चमध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन मॉस्कोला गेल्या व दोन देशांमधील व्यापारी संबंध कसे वाढविता येतील, याविषयी त्यांनी चर्चा केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व परराष्ट्र सचिव जयशंकर यांनीही संबंधितांशी बोलणी करून दिल्ली व मॉस्को यांच्यातील दुरावा दूर करण्याचे प्रयत्न केले. दुसर्‍या बाजूने रशियाकडूनही अफगाण प्रश्नावर भारताला विश्वासात घेण्याचा प्रयत्न झाला. अणुऊर्जा निर्मितीमध्ये तामिळनाडूतील कुडानकुलम येथे रशिया-भारत सहकार्याचा चांगला प्रयोग चालू आहे. ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रांचा भारताकडून होऊ शकणारा उपयोग हाही भारत-रशिया मैत्रीमधील महत्त्वाचा अध्याय आहे. भारत व रशिया यांच्यात घनिष्ट मैत्री आहे व या मैत्रीत कुठलेही विघ्न येऊ नये, हीच दोन्ही देशांची इच्छा आहे.
 
चीनकडून रशियाच्या सीमांना धोका आहे व ‘वन बेल्ट वन रोड’ या तथाकथित रेशीम मार्गामुळे रशियात काळजी आहेच. इस्लामी दहशतवादाचा रशियाला सामना करावा लागत आहे व या दहशतवादाचे स्रोत पाकिस्तानात आहेत, याची रशियाला जाणीव आहे. रशियाची चीनशी जवळीक वाढली, तर अतिपूर्वेच्या व आग्नेयेच्या दिशांना वसलेले देश आपल्यावर नाराज होतील, याची भीतीही रशियाला आहे.
 
 
भारत-रशिया मार्गामुळे व्यापारी उलाढाल वाढणार
‘नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर’ म्हणजे भारत-रशिया मार्ग भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून इराणमार्गे अझरबैजानला जाऊन अस्त्राखान व सेंट पीटर्सबर्गपर्यंत जातो. मार्गात अंजाली बंदर, तेहरान, अब्बास बंदर, बाकू आणि मॉस्को यासारखी शहरे येतात. मुंबईला थेट बाकू (अझरबैजान)शी जोडणारा हा मार्ग परंपरागत मार्गापेक्षा ४० टक्के जवळचा आणि वेळेची बचत करणारा आहे. याच्या संस्थापक सदस्यांमध्ये भारत, रशिया, इराण या देशांचा समावेश आहे, तर अन्य सदस्य राष्ट्रांत अझरबैजान, आर्मेनिया, कझाकस्तान आणि बेलारूस यांचा समावेश आहे. हा मार्ग लोकप्रिय झाल्यास या दोन्ही देशांमधील वस्तूंचा, सेवांचा विनिमय वाढीला लागेल. त्यातून व्यापारी उलाढाल वाढेल. गेल्या साडेसहा दशकांमध्ये भारत-रशिया संबंधांमध्ये ताणतणाव झाले, तेव्हा त्यातून मार्ग काढण्यात आले. भारत म्हणजे मोठी बाजारपेठ, भारत म्हणजे स्थिर होत चाललेली अर्थव्यवस्था, भारत म्हणजे बहुविविधतेला जपणारी सर्वसमावेशकता. भारतातली लोकशाही तर अवघ्या जगासाठी आकर्षक आहे. रशियन नेत्यांची वक्तव्ये या दृष्टीने बोलकी आहेत. विमाननिर्मिती आणि ऑटोमोबाईल उत्पादनात संयुक्त भागीदारी करण्याचा निर्णय भारत आणि रशिया यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेअंती हे निर्णय घेण्यात आले. रशिया आणि भारताचे आर्थिक सहकार्य प्रगतीच्या नव्या मार्गावर आहेत, असे पुतीन यांनी या बैठकीनंतर म्हटले. द्विपक्षीय व्यापार यंदाच्या पहिल्या तिमाहीत तो २७ टक्क्यांनी वाढला आहे. भारत आणि रशिया यांनी १९ प्रकल्पांत भागीदारी करण्याचे निश्चित केले आहे. त्यात वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधा, नवे तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, विमान आणि ऑटोमोबाईलनिर्मिती, हिरे उद्योग, कृषी आदी क्षेत्रांत भागीदारी करण्याचे उभय देशांनी मान्य केले आहे. रशिया भारताला ‘एस- ४०० ट्रायम्फ’ ही हवाई संरक्षण यंत्रणा पुरविणार आहे. याबाबतच्या अटी निश्चित केल्या जात आहेत.
 
अणुऊर्जेद्वारे वीजनिर्मितीच्या क्षमतेत भरीव वाढ
या भेटीला आर्थिक, तंत्रज्ञानिक सहकार्यासोबतच धोरणात्मकही खूप महत्त्व होते. अणुऊर्जा क्षेत्रात रशिया सर्वाधिक विश्वसनीय देश आहे. कुडानकुलम (तामिळनाडू) येथील अणुऊर्जा प्रकल्प १ व २ ची उभारणी रशियाने आधीच करून दिली आहे. तिसरा आणि चौथा प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर पाचव्या व सहाव्या प्रकल्प उभारणीचे काम हाती घेण्यात येईल. रशियाच्या सहकार्याने तामिळनाडूतील कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पासाठी या भेटीत करार करण्यात आला. त्यानुसार या अणुऊर्जा प्रकल्पात पाच आणि सहा क्रमांकाचे प्रत्येकी एक हजार मेगावॅट क्षमतेचे दोन ऊर्जासंच उभारले जाणार आहेत. त्यातून भारताच्या अणुऊर्जेद्वारे वीजनिर्मितीच्या क्षमतेत भरीव वाढ होणार आहे. याशिवाय दोन्ही देशांनी सेंट पीटर्सबर्ग जाहीरनामा स्वीकारत दहशतवादाशी मुकाबला करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अलीकडच्या काळात भारताच्या सदैव पाठीशी आणि चीन, तसेच पाकिस्तानशी अंतर राखून असलेल्या रशियाच्या धोरणात्मक भूमिकेत बदल झालेला आहे. रशियासोबतची जुनी मैत्री नव्या संदर्भात ताजी करून ती जगालाही दाखवून देण्याची आवश्यकता होती. ती गरज या दौर्‍यात पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली. रशियाच्या इतर देशांसोबत वाढत असलेल्या संबंधांमुळे भारत-रशिया यांचे विश्वासावर आधारलेले संबंध कमकुवत होणार नाहीत, अशी ग्वाही देताना क्षेपणास्त्र विकासासारख्या विशेष क्षेत्रांमध्ये रशियाचे भारताइतके दृढ संबंध इतर कोणत्याही देशाशी नाहीत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले. पाकिस्तान भारतात दहशतवाद भडकावत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पुतीन यांनी, कोणत्याही धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि रशिया भारताच्या दहशतवादविरोधी लढ्यात कायम सोबत राहील, याचीही ग्वाही दिली. त्यावर पंतप्रधान मोदी यांनीही, आंतरराष्ट्रीय संबंधांत चढ-उतार येत असताना भारत-रशिया यांचे संबंध कायम स्थिर राहिल्याचे सांगितले आहे. भारताशी संबंध मजबूतच
 
पाकिस्तान भारतात दहशतवाद भडकावत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना, कोणत्याही धमक्या अस्वीकारार्ह असून आम्ही भारताच्या दहशतवादविरोधी लढ्यात कायम सोबत राहणार आहोत, असेही पुतीन म्हणाले. आमचे पाकिस्तानसोबत लष्करी संबंध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांशी संबंधित प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे, तसेच ऊर्जा आणि व्यापारी संबंध वाढविण्यासह विविध विषयांवर चर्चा केली. दहशतवादाविरोधात संघटितपणे पावले
 
‘‘आंतरराष्ट्रीय संबंधांत चढ-उतार येत असतात. मात्र, भारत-रशिया संबंधांमध्ये कोणतेही चढ-उतार आलेले नाहीत याला इतिहास साक्षीदार आहे,’’ असे मोदी म्हणाले. शांघाय सहकार्य संघटनेचे (एससीओ) सदस्यत्व भारताला मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविल्याबद्दल मोदी यांनी पुतीन यांचे आभार मानले. मोदींनी रशियातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंशी संवाद साधून गुंतवणुकीसाठी भारतात चांगली संधी असल्याची ग्वाही दिली.
 
दहशतवादी संघटनाही आपली ताकद जगभरात ठिकठिकाणी दाखवून देत आहेत. मँचेस्टरमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे दहशतवादाविरोधात संघटितपणे पावले उचलण्याची गरज पुन्हा ठळकपणे अधोरेखित झाली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या मोदी यांच्या दौर्‍याला अनेकार्थाने यश मिळाल्याचे दिसत आहे. चारही देशांमध्ये पंतप्रधानांनी ही गरज ठामपणे तेथील नेत्यांपुढे मांडली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चार देशांनी दहशतवादाविरोधात उभे राहण्यासाठी दिलेला सक्रिय प्रतिसाद महत्त्वाचा आहे.
 
या दौर्‍यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या दहशतवादाची गंभीर दखल घेतली गेली, तशीच पर्यावरणाच्या जतनासाठी बांधिलकी व्यक्त केली गेली. एकुणात, दहशतवादाच्या विरोधातील जागतिक आघाडी अधिक बळकट करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी रशिया व युरोपीय देशांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता, मोदी यांचा हा दौरा यशस्वी ठरला, असेच म्हणता येईल.
 
- (नि.) ब्रि. हेमंत महाजन