बुलढाण्यात ८.५२ लाख वृक्षलागवडीचा संकल्प

    दिनांक  05-May-2017


राज्य शासनाच्या वतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या समन्वयाने बुलढाणा जिल्ह्यात वर्ष २०१६-१७साठी ८.५२ लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

या उद्दीष्टासाठी सर्व विभागांनी आपल्या अखत्यारित असलेल्या जागेत वृक्ष लागवड करावी अशी सूचना जिल्हाधिका-यांनी दिली. या पावसाळ्यापूर्वी वृक्ष लागवडीसाठी खड्डे बनवून पुढे वृक्ष लागवड केली जाणार आहे.

गेल्या वर्षी केलेल्या वृक्ष लागवडीचा या आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक बी.टी.भगत यांनी रोपांचे आयुष्य वाढण्यासाठी काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.

पर्यावरणाच्या -हासामुळे वातावरणाचा तोल बिघडला आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करून झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न शासन स्तरावर केला जात आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व नागरिकही स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणात सहभागी होतील असा विश्वास जिल्हाधिका-यांनी व्यक्त केला.