राजेंद्र गायकवाडांचं औद्योगिक साम्राज्य

    दिनांक  05-May-2017   

 
नुसयाबाई आणि शंकर गायकवाड यांच्या पोटी पाच मुलं आणि एका मुलीचा जन्म झाला. त्यातील राजेंद्र हे चौथे. १९७२चा प्रचंड दुष्काळ पडला. महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात भीषण परिस्थिती होती. उपासमारीमुळे गुरं, माणसं मुंग्यांसारखी पटापटा मरत होती. शंकरराव आणि अनुसयाबाई पोरांना घेऊन दोन वेळच्या अन्नासाठी पुण्यात आले. आता कुठेतरी स्थिरस्थावर होणार असे वाटत असताना शंकररावांचा मृत्यू झाला. त्यावेळी राजेंद्र सातवीत होता. तीन वर्षांनी राजेंद्र दहावीत असताना आईचंही निधन झालं. राजेंद्र आणि त्याची भावंडे पोरकी झाली. मोठे भाऊ लहान भावांचा सांभाळ करू लागले. एकमेकांना सांभाळत वाढू लागले. दहावीपर्यंत पुण्याच्या महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण झालं. अकरावी, बारावी शाहू कॉलेजमध्ये पूर्ण झालं. शाळेत शिकत असल्यापासूनच उरलेल्या वेळेत राजेंद्र काम करू लागला. कधी हॉटेलात भांडी घासायचं काम, तर कधी गुर्‍हाळात मजुराचं काम. कधी रिक्षा धुण्याचं काम, तर कधी भिंती रंगविण्याचं तो काम करू लागला. पुढे बी.कॉम.ला जायचं होतं. मात्र, कामामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.
 
पुढे विठ्ठलराव गाडगीळांच्या भावाकडे नोकरी मिळाली. त्यांच्या भावाची धूम्रफवारणीच्या मशीनची कंपनी होती. येणार्‍या ग्राहकांना त्या मशीनची माहिती द्यायची, प्रात्यक्षिक दाखवायचं, असं ते काम होतं. १२० रुपये महिन्याला पगार मिळू लागलेला. या नोकरीमुळे हेल्थ इन्स्पेक्टर, सॅनिटरी इन्स्पेक्टर यांच्या ओळखी झाल्या. मनमिळावू स्वभावामुळे राजेंद्रसोबत कोणाचीही मैत्री अगदी सहज होत असे. पण त्याचं मन नोकरीत रमत नव्हतं. राजेंद्रने ओळखीने रिक्षाचं परमिट मिळवलं. काही काळ रिक्षा चालवली. मात्र, रिक्षाचालक म्हटलं की हेटाळणीचीच वागणूक मिळायची. मग रिक्षा चालवणं सोडलं. रद्दीचं दुकान चालवून बघितलं. त्यानंतर सायकल स्टॅण्ड चालविला. धूम्रफवारणी मशीन दुरुस्तीचा व्यवसाय केला. हा व्यवसाय करताना खोपोली आणि पुणे महानगरपालिकेत कामे मिळाली. सॅनिटरी इन्स्पेक्टर गोसावींच्या ओळखीने बजाज ऑटोमध्ये औषध फवारणीचं काम मिळालं. आकुर्डीला जावं लागायचं. खिशात पैसा नसल्याने विदाऊट तिकीटच जावं लागे. टिसीला घाबरत घाबरत ट्रेनमध्ये चढणं आणि घाबरत उतरणं असा सारा खेळ चालू होता. कधीकधी तर शिवाजीनगर ते दत्तवाडी असा पाच किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागे.

 
असं सगळं चाललेलं असताना एका पोल्ट्री फार्ममध्ये उंदीर मारण्याचं काम मिळालं. काम चोख केल्याने आणखी दोन पोल्ट्र्यांची कामं मिळाली. कामं वाढल्याने दोन माणसे ठेवली. जशी कामे वाढली तशी दोनाची चार माणसे वाढली. कामं मिळत होती, पण पैसे वेळेवर मिळत नव्हते. पैसे मिळणार हे नक्की होतं, पण पगार, औषधांसाठी पैसा हवा म्हणून २५ टक्के व्याजाने कर्ज काढलं, पण कामे पूर्ण केली. पुण्याच्या आसपास सगळ्या पोल्ट्रीची कामे राजेंद्रच्या कंपनीलाच मिळू लागली. दरम्यान लग्नाचं वय झाल्याने मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र, मुलगा झुरळं-ढेकणं मारतो अशा व्यावसायिक समजामुळे मुलींकडून नकारच मिळत असत. शेवटी एक स्थळ आलं. मुलगा काहीही करून आपल्या मुलीचं पोट भरेल, हा विश्वास आल्यावरच मुलीच्या वडिलांनी मुलीचा हात राजेंद्रच्या हातात दिला. आता दोनाचे चार हात झाल्याने प्रवास वेगाने करणे गरजेचे झाले. याच काळात राष्ट्रीय सुरक्षा अकादमी- नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात एनडीए या सैन्याधिकारी तयार करणार्‍या देशातील प्रतिष्ठित संस्थेचं ढेकूण मारण्याचं काम मिळालं. काम इतकं चोख आणि प्रामाणिकपणे राजेंद्रच्या कंपनीने केलं की, थेट एनडीएच्या कमांडरने राजेंद्रचं कौतुक केलं. चोख काम करणारे म्हणून राजेंद्रच्या जी. टी. पेस्ट कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ख्याती वाढली. पुण्यातील प्रसिद्ध नागरी वसाहत असणारे मगरपट्टा, टाटा मोटर्स, नांदेड सिटी, फोक्सवॅगन, जेसीबी, परांजपे बिल्डरसारख्या नामांकित कंपन्यांची कामे राजेंद्रची कंपनी करते. पुण्यामध्ये २००८ साली कॉमनवेल्थ स्पर्धा झाली, त्यावेळची ही घटना. कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील प्रतिष्ठित खेळाडू पुण्यात आले होते. पुण्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली. मात्र, या हॉटेलमध्ये दोन-तीन उंदीर आढळल्याने हे हॉटेल आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे, असा खेळाडूंचा समज झाला. त्यांनी आपल्या देशाच्या खेळ प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांशी चर्चा करून हॉटेलची खोली बदलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हॉटेलची अन् देशाची नाचक्की होणार होती. कोणीतरी उंदीर मारण्याच्या कामासाठी राजेंद्र गायकवाडांचं नाव सूचित केलं. मात्र, कंपनी लहान आणि नवखी असल्याने कितपत यशस्वी याची कोणीच खात्री देत नव्हतं. मात्र, राजेंद्र गायकवाडांनी ऑर्किड हॉटेलचे मालक विठ्ठल कामतांशी चर्चा केली. कामाचं स्वरूप समजावलं. ७१ देशांच्या टीम लीडरशी बोलले. कामतांचं समाधान झाल्यावर कामतांनी त्यांना परवानगी दिली. राजेंद्रची कंपनी दिवसाला ३० ते ४० उंदीर मारू लागले. अशा प्रकारे दोन दिवसांत संपूर्ण पंचतारांकित हॉटेल उंदीरमुक्त केले. या अनुभवाने राजेंद्रच्या कंपनीची वाहव्वा झाली. देशाची इभ्रत काही अंशी वाचवू शकलो याचं समाधान आयुष्यभराचा ठेवा म्हणून राजेंद्रने जतन केला आहे.

 
थोडासा बदल म्हणून राजेंद्र एक्स्पोर्ट फ्युमिगेशन या व्यवसायात उतरले. बाहेरगावी जाणार्‍या अथवा बाहेरगावाहून येणार्‍या पालेभाज्या, फळभाज्या, अन्नधान्य वाहून नेणार्‍या कन्टेनर्सना निर्जंतुक करण्याचं काम राजेंद्र करतात. दोन कामगारांनिशी सुरू झालेल्या जी. टी. पेस्ट कंट्रोल कंपनीत आज ७०० ते ८०० कर्मचारी काम करतात. त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल २५ कोटींहून अधिक आहे. नुकतेच नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे ६० कोटी रुपयांचे कंत्राट त्यांना मिळालेले आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या कामामुळे आपण देशभरात कुठेही काम करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांना मिळाला. यातूनच आज गुजरात, मुंबई, पुणे, दिल्ली येथे गायकवाडांच्या कंपनीची कार्यालये आहेत. जिद्द उराशी बाळगून ध्येयाकडे वाटचाल केली की प्रतिकूल परिस्थितीदेखील अनुकूल होते; किंबहुना ती अनुकूल बनत जाते. हेच आपल्याला राजेंद्र गायकवाड यांच्या उद्योजकीय प्रवासातून दिसून येते.
 
- प्रमोद सावंत