कळत-नकळत- माणसांनी घडवलेला देश - नॉर्वे 

03 May 2017 17:15:19
 
२००८ च्या शेवटी मला नॉर्वेला जायला सांगितलं. तोपर्यंत मला नॉर्वे विषयी दोनच गोष्टी माहिती होत्या. एक म्हणजे तो प्रदेश खूप थंड आहे आणि दुसरे म्हणजे तेथे ६ महिने दिवस आणि ६ महिने रात्र असते. काळजी ही होती की, आपण तेथल्या थंडीत जगू शकू की नाही. पण जेव्हा तेथे आधीपासूनच काम करणाऱ्या इतर सोबत्यांविषयी माहिती मिळाली, तेव्हा काळजीची जागा उत्सुकतेने घेतली. मग त्या देशाविषयी इतर माहिती काढायला सुरुवात केली, मदतनीस अर्थातच मिस्टर गुगल. 
 
डिसेंबरच्या भर हिवाळ्यात जायचे असल्याने थंडीची सर्व तयारी करून स्वारी तयार झाली. मनावर एक दडपण होते, पहिल्यांदाच युरोपिअन देशात जाणार होतो याचे. 
 

स्तावांगर शहरात पाऊल ठेवल्यावर स्वागत केलं ते गार वाऱ्यांनी. तापमान २-३ डिग्री सेल्सिअस असावे. टॅक्सीमध्ये बसल्यावर आजूबाजूच्या परिसराकडे नजर टाकली. दुपारची वेळ असूनसुद्धा मंद सूर्यप्रकाश होता, दिवेलागणीच्या वेळी असतो तसा. नंतरचे पूर्ण २ महिने तसेच वातावरण होते. दिवस अगदी लहान म्हणजे फक्त ३-४ तासांचा आणि रात्र मोठी २०-२१ तासांची. 
 
आमच्या निवासाची सोय एका बंगल्यात होती. त्यात बंगल्याचे मालक व कुटुंबीय वरच्या मजल्यावर आणि आम्ही तळमजल्यावर. मालक वयस्कर होते, स्वभावाने अतिशय चांगले वाटले. आल्याबरोबर ओळख करून घेतली, काही मदत लागली तर सांगा म्हणाले. त्यांची मुले कुटुंबासह शहरातच दुसऱ्या भागात राहायची. नाताळच्या काळात सर्व मुलं नातवंडं एकत्र येऊन काही दिवस एकत्र येऊन मजा करत असत. भाषा नॉर्वेजिअन. इंटरनेटवरून नॉर्वेजिअन भाषेतील नेहमी वापरावे लागणारे शब्द शिकू लागलो. भाषा शिकण्याची आवड येथेही कामास आली. घरमालकांशी काही शब्द त्यांच्या भाषेत बोलल्यामुळे गट्टी जमली आणि त्यांच्या घरी गप्पांना येण्याचे निमंत्रण मिळाले. मग काय, गप्पांबरोबर छान नॉर्वेजिअन पदार्थांची चव ही चाखायला मिळाली. भारतीय लोक स्थानिक लोकांबरोबर लगेच  मिसळून जातात आणि खूपच चांगले असतात असे त्यांचे मत होते. 
 
तेथील काही गोष्टींचे मात्र आपण अनुकरण करावे असे जाणवले. एक म्हणजे दुसऱ्यांचा आदर करणे. प्रत्येक जण दुसऱ्याशी अतिशय आदरपूर्वक बोलतो. रस्त्यात पादचाऱ्यांना सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. पदपथावरून कोणताही पादचारी रस्त्याच्या दिशेने तोंड करून उभा राहिला तर त्याला रस्ता ओलांडायचा आहे असे गृहीत धरून वाहनचालक गाडी असेल तिथेच थांबवतो. आमचे काही मित्र काही वेळा गंम्मत म्हणून उगाच रस्त्याच्या दिशेने तोंड करत आणि वाहन थांबल्यावर पुन्हा पदपथावरून चालू लागत. गमतीचा भाग सोडला तर तिथे सुरक्षेला जे महत्व दिले जाते ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. 
 
एक प्रसंग घडला बँकेत कामासाठी गेलो असताना मोजून ४-५ जण होते. दारातून आत शिरल्यावर आधी यंत्राची कळ दाबून टोकन नंबर घेतला आणि वाट पाहत बसलो. १०-१५ मिनिटात माझा नंबर आला आणि तेथील एका काऊंटर समोर जाताच तेथील कर्मचारी महिलेने अतिशय आदराने स्वागत केले आणि मला काय काम आहे याची विचारपूस केली. मला एक फॉर्म देऊन ती संगणकावर माहिती भरू लागली. तेवढ्यात तिच्या मोबाइलची रिंग वाजू लागली परंतु तिने त्याकडे आधी दुर्लक्ष केले. तरीही जेव्हा रिंग वाजत राहिली तेव्हा तिने मला प्रश्न केला, मी फोन वर बोलू शकते का? आणि माझा होकार मिळाल्यावरच तिने थोडा वेळ फोनवर संवाद साधला. हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता, पण याप्रकारची संस्कृती त्यांनी जोपासली आहे हे माझ्या लक्षात आले. नकळत मनाने केलेली तुलना -आपल्याकडे कुठलेही कर्मचारी आपल्या ग्राहकांना अशा प्रकारे महत्व देतात का ? 

 
त्या थंडीत किमान तापमान उणे १० डिग्री सेल्सिअस इतके होते. बर्फवृष्टी ३ वेळा झाली. एकदा तर रात्रभरात दीड  फूट इतका बर्फ पडला. सकाळी ते दृश्य पाहून आम्हा मित्रमंडळींना बर्फात मनसोक्त खेळायचा मोह आवरता आला नाही.

 
एकदा तर आमच्या घराजवळ असलेला तलाव पूर्ण गोठला होता. ह्या गोठलेल्या तलावावर लोक रविवारी सकाळीच चालायला आले होते. काही लोकांनी कुत्र्यांना फिरवायला आणले होते. लहान मुले तर त्यावर चक्क स्कीईंग करत होती. असले दृश्य पहिल्यांदाच पाहत असल्यामुळे, आम्हाला तर जणू हर्षवायूच झाला होता. त्यातही तेथील शासकीय कर्मचारी लोकांच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसत होते. धोकादायक अशा भागात जायला लोकांना बंदी केलेली दिसत होती. 


 
मार्च संपायला आला  तशी थंडी कमी होऊ लागली आणि दिवसही मोठा होऊ लागला. मे महिन्यात तर दिवस २० तासांचा आणि रात्र ४ तासांची झाली. मग मात्र आमची मजा येऊ लागली. अंधार पडू लागल्यावर स्वयंपाक करून जेवायला बसण्याची, झोपायची  सवय. पण अंधार पडलाच नाही तर ? रात्रीचे १० वाजलेत आणि बाहेर  चक्क ऊन पडलंय, खिडकीतून ऊन आत येतंय. आमचं सगळं वेळकाळ गणितच कोलमडलं होतं. जेवायला उशीर, झोपण्यासाठी सगळ्या खिडक्या, पडदे कडेकोट बंद करून अंधार करावा लागला. आणि सकाळी जाग यायची ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने चक्क तीन-साडेतीन वाजता. कारण सूर्योदय होत होता तीन-साडेतीन वाजता. आम्ही अक्षरशः त्या पक्ष्यांवर वैतागून पुन्हा झोपायचा प्रयत्न करत होतो. 

 
तेथे थंडीच्या दिवसात अजिबात मिळत नसलेला सूर्यप्रकाश, त्यामुळे नैसर्गिकरित्या मिळत नसलेले ड जीवनसत्व, ह्याची उणीव लोक उन्हाळ्यात  भरून काढतात. सूर्यप्रकाश त्वचेला मिळावा म्हणून तोकडे कपडे घालतात. मनात  विचार केला,  की अशाच प्रकारे निसर्गाला अनुरूप अशी संस्कृती घडत असावी. त्यामुळे तोकडे कपडे घालणे म्हणजे भारतीयांसाठी जरी अयोग्य असले तरी एकंदरीत थंड हवामानाच्या प्रदेशात ते सूर्यप्रकाश उपलब्ध असताना योग्य ठरते. 
 



येथे निसर्गात ऋतूप्रमाणे होणार बदल तर अतिशय सुंदर असतो. थंडीत असणारा पानाफुलांची रंग उन्हाळा येताना अतिशय सुंदर पद्धतीने बदलत जातो. एकाच झाडाला वेगवेगळ्या रंगात भिजलेले पाहून आपण मोहित होऊन जातो. काही वेळा तर झाडाचा एक भाग एका रंगात आणि पलीकडून वेगळा रंग. ह्या रंगपंचमीमध्ये आकाशातसुद्धा रंगांची उधळण करत सौन्दर्य वाढवत असते. दर महिन्याला रंग बदलणारी झाडांची पाने, लाल ट्युलिप्स, हिरव्या डोंगरातून असलेले समुद्राचे पाणी अर्थात फ्युओर्डस हिरवेगार लॅण्डस्केप्स, तपकिरी रंगांची लाकडी घरे हा अतिशय अनुभव घेण्याचा विषय आहे. येथे कुणीही फोटोग्राफर होऊ शकतो. कारण कुठल्याही दिशेचा फोटो काढण्यासाठी क्लीक करा फोटो सुंदर येणार हे नक्की. 

 
नॉर्वे खनिज तेलाच्या उपलब्धतेमुळे खूप श्रीमंत आहे. निसर्गाच्या रंगीबेरंगी सोहळ्यात मला सर्वात जास्त आवडलेले ठिकाण म्हणजे स्तावंगरचे आॅईल म्युझियम. हे जगातले सर्वात चांगले आॅईल म्युझियम असावे. या ठिकाणी समुद्राच्या तळातून तेल आणि वायू कसे काढले जातात आणि जमिनीवर कसे आणले जातात याची इत्यंभूत माहिती मिळते. अतिशय आकर्षक असे हे संग्रहालय तेल व वायू उत्खननाविषयी आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देते. त्यासाठी विविध प्रकारची मॉडेल्स, प्रत्यक्षात वापरण्यात येणारी साधने, व्हिडिओज, क्विझ अशा अनेक साधनांचा वापर तेथे अतिशय प्रभावीपणे केला गेलाय. समुद्राच्या तळाशी असलेल्या खडकांचे नमुने, ज्यांचे वय काही कोटी वर्षे आहे  ते पहायला मिळतात.  ते पाहत असताना आपण नकळत तुलना करतो, आपण भारतात असे अभ्यासपूर्ण व अत्याधुनिक संग्रहालय का करू शकत नाही?
 
निसर्गाने दिलेल्या खनिज तेलाच्या देणगीचा पुरेपुर उपयोग करून मर्यादित राहण्यायोग्य जागेत प्रगती केलेला हा देश. देशाचा सत्तर टक्के भाग डोंगराळ असूनसुद्धा तेथील लोकांनी बराचसा भाग ज्याप्रकारे राहण्यायोग्य विकसित केलाय, ते पाहून तेथील लोकांविषयी आदरच वाटतो. उपलब्ध गोष्टींचा अतिशय योग्य उपयोग केल्यामुळे पर्यटन क्षेत्रात सुद्धा ते पुढे आहे. 
 
त्या मध्यरात्रीच्या सूर्याच्या देशाने आणि तेथील माणसांनी माझ्यावर चांगला प्रभाव पडला हे खरेच.
 
 
 

- भूषण मेंडकी

Powered By Sangraha 9.0