#ओवी लाईव्ह - कानडा विठ्ठलू

    दिनांक  28-May-2017   

 

“पूजाताई, तू कृष्णदेवरायची गोष्ट सांगणार असे म्हणाली होतीस!”, रघूने आठवण केली.

“अरे! लक्षात आहे की तुझ्या! Yes! तर आज कृष्णदेवरायाची गोष्ट!

“ज्ञानेश्वरांनी १२९६ मध्ये समाधी घेतली, तिथून पुढे! अल्लाउद्दिन खिलजीने यादव, काकतीय, होयसळा राज्ये जिंकली. आणि हा सर्व प्रांत दिल्लीच्या अधिपत्याखाली आला.

“१३२७ मध्ये, सुलतान मुहम्मद बिन तुघलकने, दिल्लीच्या सर्व जनतेसकट, राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली. हा प्रवास न झेपल्याने हजारो वृद्ध व आजारी लोक मृत्यू पावले. देवगिरीचे नाव दौलताबाद झाले. दौलताबाद ते दिल्ली उत्तम रस्ता झाला. या दोन्ही शहरात पत्रव्यवहारासाठी सेवा प्रस्थापित झाली. दौलताबाद मध्ये पाण्यासाठी व्यवस्था केली. पण तरीही, इथून राज्य करणे तुघलकला फार काळ जमले नाही. आणि १३३५ मध्ये तुघलक त्याच्या लाव्याजाम्यासह दिल्लीला परत गेला!”, पूजाताई म्हणाली.

“अग, यामुळेच अतर्की कामे करणाऱ्याला ‘तुघलकी’ म्हणतात!”, प्रकाश मामा म्हणाला.

“पुढे काय झाले?”, रजुने विचारले.   

“लवकरच १३३६ मध्ये विद्यारण्य स्वामींच्या मार्गदर्शनाने हरिहर आणि बुक्काने विजयनगरचे साम्राज्य स्थापन केले. जवळ जवळ पावणे दोनशे वर्षांनी, कृष्णदेवराय विजयनगरचा सम्राट झाला. विष्णूभक्त कृष्णदेवरायाने, मूर्तीच्या संरक्षणार्थ, पंढरपूर येथील विठ्ठलाची मूर्ती विजयनगरला नेली. या मूर्तीची स्थापना विजयनगरच्या अत्यंत सुंदर व भव्य विठ्ठल मंदिरात केली. या मंदिरातील काही विशेष बाबी म्हणजे – सप्तस्वरांचे खांब, पडदे लावायला छताच्या बाहेरच्या बाजूने दगडी सळ्या आणि दगडी लामणदिवे! समोरील पटांगणात एक दगडी कोरीव रथ आहे ज्याची चाके अधांतरी असून फिरू शकतात.” 

 

“मग? विठ्ठलाला परत कधी आणि कोणी आणले?”, रघूने विचारले.

“इकडे पंढरपुरात कोणाला चैन पडतंय? विठ्ठल नसल्यामुळे पंढरपूरात शोककळा पसरली. काही वर्षांनी, पैठणचे श्री भानुदास व इतर काही वारकरी मंडळी विजयनगरला गेली. भानुदासांनी वारकऱ्यांची व्यथा कृष्णदेवराया समोर मांडली आणि मूर्ती पुन्हा पंढरपुरी नेण्याविषयी अर्जव केले. त्या न्यायी राजाने विठ्ठलाला या मंडळाच्या स्वाधीन केले. आणि रक्षकांच्या ताफ्यात भानुदास विठ्ठलाला परत पंढरपुरास घेऊन आले. आणि पंढरपुरचा प्राण परत आला!

“या भानुदासांचा पणतू म्हणजे एकनाथ. यावेळी दौलताबादच्या बादशहाच्या पदरी श्री जनार्दनपंत मंत्री होते. हे दत्तभक्त असून फार थोर सत्पुरुष होते. १२ वर्षांचा एकनाथ सद्गुरू शोधात जनार्दनपंतांकडे आला. लहानग्या एकनाथाची तळमळ आणि चिकाटी पाहून जनार्दनपंतांनी त्यांना दीक्षा दिली.

“आतापर्यंत ज्ञानेश्वरांनी समाधी घेऊन २५० वर्ष झाली होती. या कठीण काळात अनेक पिढ्यांनी ज्ञानेश्वरी जिवंत ठेवली. पण या खटाटोपात ज्ञानेश्वरी लिहिण्यात चुका झाल्या होत्या तर काहींनी स्वतःच्या नवीन ओव्या घुसडल्या होत्या.

“एकनाथांना ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याविषयी ज्ञानदेवांचा दृष्टांत झाला. एकनाथ काही वारकऱ्यांसह आधी आळंदीला गेले व ज्ञानेश्वरांची समाधी शोधली. ज्ञानेश्वरीच्या वेगवेगळ्या प्रती मिळवून पैठणला आले. आणि  तरुण वयात ज्ञानेश्वरीच्या प्रतींचा अभ्यास करून एक शुद्ध प्रत तयार केली. या आनंददायी अनुभवा बद्दल एकनाथ म्हणतात -

श्रीशाके पंधराशे साहोत्तारी । तारणनामसंवत्सरी ।

एकाजनार्दने अत्यादरी । गीताज्ञानेश्वरीप्रति शुद्ध केली ।। 

ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध । परि पाठांतरी शुद्ध अबद्ध । 

तो शोधोनिया एवंविध । प्रति शुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी ।।

नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका । जयाची गीतेची वाचिता टीका । 

ज्ञान होय लोका । अतिभाविका  ग्रंथार्थीया ।।

बहुकाळ पर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्ठी ।

प्रतिष्ठानी गोदातटी । लेखनकामासाठी पूर्ण जाहली ।।

 

 

 

“गीता मराठीत आणून अडीचशे वर्षे झाली होती, तरीही अध्यात्मात अजूनही संस्कृतचेच वर्चस्व होते. ज्ञानेश्वरांप्रमाणे संत एकनाथांनी देखील संस्कृत मधील साहित्य मराठीत आणले. भागवत पुरण, वाल्मिकी रामायण, शंकराचार्यांचे हस्तकामलक इत्यादी ग्रंथांची मराठीत निर्मिती केली. एकनाथांनी भागवत पुराण मराठीत लिहिण्यास सुरवात केल्यावर, बनारसच्या पंडितांनी त्यांना पाचारण केले. एकनाथांनी बनारस येथे जाऊन ते मराठीत लिहिण्याची आवश्यकता पटवून दिली आणि भागवताचे उर्वरित काम तिथेच संपवले. त्यावेळी बनारसच्या पंडितांनी त्या ‘एकनाथी भागवत’ या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली!”

 

- दीपाली पाटवदकर