भारताचा महासेतू

    दिनांक  27-May-2017   

 
दुर्लक्षित ईशान्येकडील राज्यांच्या सर्वांगिण विकासात खरंच ‘महा’ भूमिका बजावेल, अशा ढोला-सदिया या ब्रह्मपुत्रा नदीवरील ९.१५ किमी पुलाचे उद्घाटन आसाममध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडले. खरं तर भारतातील सर्वाधिक लांबीच्या या पुलाला मान्यता मिळाली ती मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत २००९ साली, मग काम सुरू व्हायला उजाडलं २०११ आणि अखेरीस २०१७ साली आसाम - अरुणाचल प्रदेशला जोडणारा हा महासेतू जनतेच्या सेवेत दाखल झाला.
 
या पुलामुळे आसाम - अरुणाचल प्रदेशमधील प्रवासाचे अंतर तब्बल १६५ किमीने कमी होणार असून प्रवासाचा वेळही पाच तासांनी कमी झाला आहे. आता हे अंतर एका तासात सहज कापता येईल. आधी रस्तामार्गे ढोलाहून सदियाला पोहोचायला तब्बल आठ तासांचा वेळ लागायचा आणि विराट ब्रह्मपुत्रेच्या पात्रातून जलवाहतुकीच्या प्रवासालाही साडेचार तासांचा अवधी लागायचा. त्यातही अतिवृष्टी आणि महापुरामुळे ब्रह्मपुत्रा कोपली की, जलवाहतूकही साहजिकच ठप्प. डोंगर-दर्‍यांमुळे दरडी रस्त्यांवर कोसळण्याचा धोका आणि रेल्वेमार्गांची तर वाट अधिकच बिकट. तेव्हा, अशा आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेला हा भूपेन हजारिका पूल ईशान्येच्या विकासाला कलाटणी देणारा ठरणार आहे.
 
या महासेतूच्या आसाम, अरुणाचल प्रदेशाबरोबरच ईशान्येतील प्रवासी वाहतूक, मालवाहतूक अधिक सुकर आणि जलद होईल. पर्यायी, वस्तू आणि सेवांच्या मागणी-पुरवठ्याचे गणित सुधारेल आणि रोजगाराच्या संधीही युवकांना उपलब्ध होतील. एरवी ईशान्येकडे पायाभूत सुविधांच्या अभावी न फिरकणारे उद्योगधंदेही संधीच्या शोधार्थ ईशान्येत आवर्जून दाखल होतील. इतकेच नव्हे, तर पर्यटन क्षेत्र संवर्धनाच्या दृष्टीनेही या महासेतूला विशेष महत्त्व आहे. ईशान्य भारतात पर्यटनासाठी हौशी पर्यटक दाखल होतातही, पण वाहतुकीत वाया जाणारा वेळ, मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव यामुळे पर्यटकांचाही काहीसा हिरमोड होतो, पण आता हा महासेतूच मुळी पर्यटकांना आकर्षित करण्याचे केंद्रबिदू ठरावा, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
 
या महासेतूला सामरिकदृष्ट्याही तितकेच महत्त्व असेल. कारण, ‘चिनी ड्रॅगन‘ची अरुणाचल प्रदेशावर असलेली वक्रदृष्टी लपून राहिलेली नाही. तेव्हा, युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्यास सैन्याला सीमेनजीक मार्गस्थ करण्यासाठी हा महासेतू महत्त्वाचा दुवा ठरेल. त्यामुळे आपल्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त मोदींनी समस्त भारतीयांच्या सेवेत अर्पण केलेला हा महासेतू विकासाचा महामेरू ठरेल, हे नक्की!
 

Embeded Object

 

राहुलगँगची जळजळ

२०१४ आणि त्यानंतरही झालेल्या अनेक भीषण पराभवांतून सावरायचे मंत्र-तंत्रच विसरलेल्या कॉंग्रेसच्या राहुलगँगची जळजळ मोदींच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त साहजिकच उफाळून आली. राजधानीत पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसने मोदींवर आगपाखड करण्याचे हे नामी औचित्य सोडले तर नाहीच, उलट योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी दोन हजार कोटी रुपये खर्चून मोदी-शाह जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही राहुल गँगने केला. ‘बाहुबली‘चा सर्वच क्षेत्रांवरील प्रभासचा प्रभाव लक्षात घेता, जयंत पाटलांप्रमाणेच कमलनाथांनीही फिल्मी स्टाईल शेरेबाजी केली. ‘ये मेरा वचन है और मेरा वचन ही है शासन’ हे ठासून सांगणार्‍या बाहुबलीतील शिवगामीच्या महाराणीप्रमाणे, कटप्पाच्या भूमिकेतील कमलनाथांनी राहुल महाराजांना खूश करण्यासाठी ‘भाषण और आश्वासन, ये हमारा शासन’ अशी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या शासनाची खिल्ली उडविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ते म्हणा त्यांचे आणि इतर राहुलगँगच्या वाचीवीरांचे इतिकर्तव्यच! असे हे राजकीय कोमात गेलेले राहुलगँगचे सदस्य एकाएकी जागे झाले आणि मोदींवर तोंडसुख घेण्याची चढाओढ दिल्लीत आज दिवसभर चांगलीच रंगली. पण या सर्वांपासून शेकडो किलोमीटर दूर मोदींनी हा तृतीय वर्षपूर्तीचा दिवस केवळ भाषणबाजी न करता महासेतूच्या उद्घाटनाच्या कृतीतून दाखवून दिला.

 
खरं तर मोदी सरकारच्या योजना, त्यांचे फायदे जनतेपर्यंत पोहोचून त्याचा अनेकांना प्रत्यक्ष लाभही झाला आहे. त्यामुळे त्याच्या विशेष जाहिरात बाजीचीही तशी गरजही नाही. पण आजचा जमाना, ‘जो दिखता है, वो बिकता है’चा आहे आणि मोदींना हे प्रसिद्धीचे सुतंत्र गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असतानापासूनच अवगत आहे. त्यामुळे मोदींनी तोंडाची फारशी वाफ न दवडता, ट्विटरवरूनच सरकारचे प्रशस्तीपत्रक जनतेसमोर मांडले. ‘अब की बार मोदी सरकार,’ ‘अच्छे दिन आनेवाले है’ या लोकप्रिय घोषणांनंतर मोदींनी ‘साथ है, विश्वास है... हो रहा विकास है’चा नारा दिला आणि सरकारच्या विकासाच्या मुद्द्यावर पुनश्च शिक्कामोर्तब केले. त्यामुळे तीन वर्षांतीलच मोदींच्या ‘विकास लाटे‘ने कॉंग्रेसची २०१९ ला सत्तास्वार होण्याची नावच खोलवर बुडवून टाकली आहे. त्यामुळे राहुल गँगच्या जळजळीचा आता परिणाम होणे नाही!
 
- विजय कुलकर्णी