स्वत्व जपणारे दक्षिण कोरिया

24 May 2017 16:00:44

 

 

सप्टेंबर २००९ ला दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला लँड झालो. द. कोरिया आणि सेऊल शहराविषयी १९८८ च्या ऑलिंपिक स्पर्धांमुळे एक सुप्त आकर्षण होतं. तेथे पाय ठेवल्याबरोबर नजरेत भरले ते तेथील चकाचक रस्ते, स्वच्छता, उंच इमारती, टॅक्सी म्हणून वापरल्या जाणाऱ्या महागड्या चारचाकी गाड्या.

सेऊलहून देशांतर्गत विमानाने दक्षिण-पूर्व दिशेला असलेल्या उल्सान या शहरात पोहोचलो. हॉटेलमधे पाउल ठेवताच तेथील मॅनेजरने कमरेत वाकून अभिवादन केले. ही सुरूवात होती. त्यानंतर दोन महिने आम्हाला भेटेल त्याला कमरेत वाकून अभिवादन करण्याचा रोज चांगलाच व्यायाम घडत होता. रविवार असल्याकारणाने त्यादिवशी हॉटेलात आराम करण्याव्यतिरिक्त काही काम नव्हते. आजुबाजुच्या परिसराची, पर्यटनाच्या स्थळांविषयी माहिती काढण्याचे काम तेवढे केले.

आमच्या कंपनीचा तेथील व्यवस्थापक आम्हाला भेटायला आला. व्यवस्थेविषयी आणि परिसराविषयी माहिती दिली. सकाळी सात वाजता साईट ऑफिसला घेऊन जाण्यासाठी येईन असे सांगून तो गेला. सकाळी तो कार घेऊन हॉटेलच्या रिसेप्शन मधून आमच्या रूममधे त्याचा फोन. घड्याळ पाहिले, बरोबर सात वाजले होते, एकही मिनीट मागेपुढे नाही. चला, सात वाजले, निघायचंय ना? सात म्हणजे साडेसात असा भारतीय विचार करणाऱ्या आमच्यासाठी तो एक धक्का होता. त्यानंतर आम्ही रोज पाच मिनिटे आधीच तयार होऊ लागलो. कोणत्याही देशाबद्दल बाहेरचे लोक जे मत बनवतात ते लोकांच्या वर्तनावरून. कोरियन लोक वेळेची किंमत करतात हे आमचं बनलेलं मत.


आमचे रोजचे कामाचे वेळापत्रक म्हणजे सकाळी सात ते सायंकाळी सात. पण रोज तेथील ऑफिसचे कर्मचारी आमच्या आधीच पोहोचलेले असत आणि रोज रात्री ९-१० वाजेपर्यंत काम करत. काम करण्याची आवड असलेले किंवा ज्याला आपण वर्कोहोलिक म्हणते तसले हे लोक आहेत. जसजसे पुर्वेला जातो तसा हा वर्कोहोलिकपणा वाढत गेलेला दिसतो. म्हणजे जपान मधील लोक हे कोरियन्सपेक्षा जास्त वेळ काम करतात असे दिसते. ते घरी केवळ झोपण्यासाठी नाईलाजास्तव जात असावेत. पण त्यांच्या या दिवसरात्र काम करण्याचा जगाने पाहिलेला परिणाम म्हणजे १९४५ सालच्या अणुबाँबच्या राखेतून जपानने घेतलेली फिनिक्स सारखी भरारी. भारतीयांच्या दृष्टीने कोरियन लोक हे क्लायंट म्हणून अतिशय वाईट असे समजले जाते. ते मुख्यतः त्यांच्या अतिशय चिकित्सक वृत्तीमुळे. त्यांचे कुठलेही काम ते अतिशय चोखपणे करवून घेतात. आपण करून दिलेले काम पुन्हा पुन्हा तपासून पाहतात. वेगवेगळ्या रीतीने तेच काम अजून चांगल्या रीतीने कसे करता येईल हे पाहतात. कोरिया म्हणा की जपान हे देश उगाच आपल्या पुढे गेलेले नाहीत हे पुन्हा पुन्हा जाणवत राहते. 

स्वदेश आणि स्वभाषा यांविषयी कोरियन लोकांना अतिशय अभिमान आहे. आणि हा अभिमान नुसता बोलण्यात नाही तर व्यवहारात दिसतो. प्रगती करताना कोरियाला स्वत:ची संस्कृती सोडण्याची गरज वाटली नाही. येथे सर्व व्यवहार कोरियन भाषेत चालतात. सर्व ठिकाणी  कोरियन भाषेतील पाट्या पहायला मिळतात. संगणक -मोबाईल मधे सुद्धा कोरियन भाषेचा वापर होतो. सर्व इ मेल्स कोरियन भाषेत पाठवल्या जातात. इंग्रजीचा वापर फक्त कोरियाबाहेरील व्यक्तींशी संवाद साधताना केला जातो. तो सुद्धा तोडक्या मोडक्या इंग्रजीत. एकमेकांना अभिवादन करताना दोन भारतीय हाय हॅलो वगैरे करतात. परंतु कोरियन्स आवर्जून कोरियन भाषेचाच उपयोग करतात.  त्यांना स्वभाषेची लाज वाटत नाही.


कोरियात प्रत्येकाला कमीत कमी २ वर्षे सैन्यात सेवा करावी लागते. ह्या काळात प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष काम असे अनिवार्य आहे. शिक्षण झाल्यावर ज्या प्रकारचे शिक्षण, कौशल्य  असेल त्या प्रकारचे काम सैन्यात मिळते. ज्याला लगेच  सैन्यात काम करायचे नसेल त्याला काही काळानंतर करता येते. परंतु टाळता येत नाही. सैन्यातील काम टाळणे हे देशाविषयी अनादर म्हणून पहिले जाते. त्याबद्दल अतिशय कडक शिक्षा करण्याची तरतूद आहे. देशाविषयी देशभक्तीची भावना जागृत होऊन प्रत्येकाने काम करण्यात हे सैनिकी शिक्षण मदत करते असे तेथील लोकांचे मत आहे.


कोरियन लोक मुख्यतः बौद्ध आणि ख्रिस्ती धर्म मानणारे आहेत. पण तेवढीच संख्या नास्तिकांची आहे. तेथील सहकाऱ्यांबरोबर फिरायला गेलो असताना बौद्ध मंदिराला भेट देण्याचा योग आला. निसर्गरम्य डोंगरावर वसलेल्या ह्या टोंगडोसा मंदिराचे वैशिष्ट्य असे की, येथील मंदिरात गौतम बुद्धांचे अवशेष जपलेले आहेत. गौतम बुद्धांच्या अवशेषांचे रत्नांमध्ये रूपांतर झाले असे येथे मानले जाते. यापैकी काही येथील एका तुळशी वृंदावनासारख्या बांधलेल्या ठिकाणी ठेवले आहेत. अतिशय सुंदर रीतीने हा परिसर विकसित करण्यात आला आहे. आजूबाजूला अनेक स्तूप आणि कोरियन, चिनी पद्धतीने बांधकाम असलेला हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. विशाल मूर्ती, अजस्त्र घंटा, कोरीव काम असलेल्या लाकडी इमारती अतिशय सुंदर वातावरणात आम्ही बराच वेळ घालवला. बुद्धांच्या मूर्तीसमोर काही वेळ ध्यानस्थ झालो. 


येथे भारतीयांची मुख्य अडचण होते ती जेवणाची. कारण आपल्या जेवणाच्या सवयी आणि कोरियन खानपानाच्या सवयी यात प्रचंड फरक आहे. कोरियन लोक मांसाहारी आहेत. त्यांच्या जेवणात मासे, मटण, चिकन, ऑक्टोपस, डुक्कर इत्यादी पदार्थांची रेलचेल असते. येथील भाजीबाजारात अनेक प्रकारचे प्राणी, समुद्री जीव मांडून ठेवलेले असतात. त्यांच्या जेवणात सूप, भात आणि याबरोबर 'किमची' म्हणून ओळखली जाणारी तिखट चटणी हे असलंच पाहिजे. आपल्याकडेही मांसाहार करणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. पण तेही कोरियातील सगळे पदार्थ खाऊ शकत नाहीत, कारण ते बनवण्याची पद्धत. तेथे तेल कमी प्रमाणात वापरले जाते आणि सगळे पदार्थ (प्राणी) पूर्णपणे शिजवले जातात असे नाही. आपल्याकडे तर मसालेदार आणि तेलाचा यथेच्छ वापर केल्याशिवाय जिभेला चव येत नाही. त्यामुळे भारतातील लोकांना कोरियात जेवणाची पंचाईतच होते. त्यात माणूस शाकाहारी असेल तर त्याचे जास्तच  हाल होतात. एकदा मी शाकाहारी पदार्थ मिळणारे रेस्टॉरंट शोधत होतो. बऱ्याच पायपीटीनंतर मला एकदाचे व्हेजिटेरियन रेस्टॉरंट सापडले. ते एक फूड कॉम्प्लेक्स होतं. तिथे वेगवेगळ्या देशांतल्या लोकांसाठी जेवण मिळण्याची सोय होती. शाकाहारी काहीतरी मिळतंय या प्रचंड आनंदात आत शिरलो. वेगवेगळ्या कॉउंटर्स वर एकदा चक्कर मारून काय काय मिळतंय याची पाहणी केली आणि जिथे व्हेज मिळत होतं तिथे ऑर्डर दिली, व्हेज सूप आणि पुलाव सदृश पदार्थाची. तेथील लोकांना कोरियन सोडून कुठलीच भाषा येत नसल्याने सगळा संवाद खाणाखुणांनीच पार पडला. माझी ऑर्डर तयार असल्याचा पुकारा झाला आणि उत्साहात जाऊन माझी प्लेट टेबल वर आणली. सूप ची चव घेऊन सुरुवात करणार तेवढ्यात लक्षात आले की सूप मध्ये मांसाचे तुकडे दिसताहेत. भाताकडे बारकाईने पाहिल्यावर तिथेही तोच प्रकार. मी जरा रागातच काउंटर वर जाऊन विचारले व्हेज ऑर्डर असताना हे असं का? काउंटर वरची कन्या तोडक्यामोडक्या इंग्रजीत उद्गारली, डिश मध्ये व्हेजेटबल्स ठेवलेत ना बाजूला त्यालाच व्हेज डिश म्हणतात. मला हसावे की रडावे कळेना. भूक तर लागलेली. तेव्हा म्हटलं  माझ्या 'व्हेज' पदार्थांमध्ये नक्की काय टाकलंय ते तरी विचारुया. कळले की ते त्यात माशांचे तूकड़े होते. चला, अगदीच अनोळखी प्राणी तर नाही मग काही हरकत नाही म्हणत ते बाजूला काढून ताव मारायला सुरुवात केली. त्यांच्या मते नॉनव्हेज डिश मध्ये आजूबाजूला थोडा भाजीपाला, गाजर असे पदार्थ ठेवले की ती व्हेज डिश असते. आपल्याला एखाद्या पदार्थात काय हवे काय नको ते त्यांना कळेपर्यंत सांगून मगच आपली डिश तयार करून घ्यायची हा धडा मला मिळाला.   


खरं तर हा देश भारताच्या बरोबर दोन वर्षे आधी स्वतंत्र झालेला. १५ अॉगस्ट १९४५ ला द. कोरिया जपानपासून स्वतंत्र झाला. पण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपल्या कितीतरी पुढे निघून गेला. जगाच्या पटलावर या देशाने अल्पावधीतच आपले स्वत:चे स्थान निर्माण केले.  कोरिया म्हटलं की आपल्या मनात आधी येतात ते सॅमसंग, ह्युंदाई, किया, डेवु सारखे मोठमोठे ब्रँड्स. या देशाच्या ब्रँड्सनी सगळं जग काबीज केलंय नाही? जहाजबांधणी साठी तर सगळं जग यांच्या शिपयार्ड मधे रांगा लावून उभं असतं. तेल आणि नैसर्गिक वायू उत्खननासाठी लागणारे अजस्त्र प्लॅटफाॅर्म्स बनवण्याचे कौशल्य याच कंपन्यांकडे आहे. कोरियन वस्तुंनी आपला दिवाणखाना, वाहनांनी आपले रस्ते काबीज केलेत. असे का होऊ शकले हे आम्हाला दोन महिन्यांच्या वास्तव्यात लक्षात आले. आधुनिक काळाबरोबर वाटचाल करताना, पेहराव बदलला परंतु आतून स्वत्व, स्वभाषा स्वदेश ह्याविषयी कमालीचे प्रेम बाळगणारे, हजारो वर्षांपूर्वीचे गौतम बुद्धांचे अवशेष श्रद्धेने व आत्मीयतेने सांभाळणारे, वेळेची शिस्त पाळणारे, त्यांच्या सरकारने सक्तीची केलेली सैन्यातील सेवा देशाविषयीचे कर्तव्य म्हणून पाळणाऱ्या कोरियन लोकांनी माझ्या मनात नक्कीच आदराचे स्थान निर्माण केले.

 

- भूषण नवीनचंद्र मेंडकी

Powered By Sangraha 9.0