जलयुक्त शिवार अभियान आता जनतेचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    दिनांक  24-May-2017


 

जलयुक्त शिवार अभियानाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, हे अभियान आता शासनाचे राहिले नसून ते जनतेचे झाले आहे. लोकसहभाग हाच या योजनेच्या यशस्वीतेचे रहस्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सांगोला तालुक्यातील मानेगाव व डोंगरगाव येथील जलयुक्त शिवार योजना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांची पहाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस म्हणाले, सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका असून येथील लोकांना जलसंधारणाचे महत्व पटले आहे. त्यामुळे या तालुक्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. मानेगाव सारख्या गावात ८० टक्के क्षेत्रात कंपार्टमेंट बंडींगची कामे झाली असल्याने या परिसरात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरणार आहे. सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत, यावर्षीही जिल्ह्यात अनेक कामे सुरू आहेत.

गेल्या काही दिवसात मी राज्याचा दौरा केला असून राज्यभर जलयुक्त शिवार अभियानाबाबत लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रोज हजारो नागरिक जलयुक्त शिवार योजनेत श्रमदानाच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत. लोकसहभाग हेच या योजनेच्या यशस्वीतेचे रहस्य आहे. लोकसहभागाशिवाय ही योजना यशस्वी होणे शक्य नाही. लोकसहभाग हाच या योजनेचा कणा आहे. आता ही योजना शासनाची राहिली नसून ती लोकांची झाली आहे. या योजनेत लोकांना मदत करणे हेच शासनाचे काम आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यातील १२ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.