सोलापुरात मुख्यंमंत्र्यांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश ?

    दिनांक  22-May-2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी सोलापूर जिल्हा दौऱ्यात सोलापूर जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. येत्या २४ तारखेला मुख्यमंत्री शेतकरी मेळाव्यांसाठी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत त्यावेळी होणाऱ्या कार्यक्रमांत हे प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

सोलापुरात जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यावेळी अपक्ष उमेदवार संजय शिंदे आणि शिवानंद पाटील यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी निवडले गेले. मात्र याची जाणीव ठेवून अध्यक्ष शिंदे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. करमाळा येथे बुधवारी होणाऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता आहे.

करमाळ्यातील कार्यक्रमापूर्वी सांगोल्याला मुख्यमंत्री जाणार आहेत. तेथील कार्यक्रमात शिवसेनेचे नेते व माजी आमदार शहाजी पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. पाटील यांच्याबरोबरच संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही होऊ लागली आहे.