‘सायकल’वरून ‘हात’ निसटता

    दिनांक  02-May-2017   

 
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आधी सत्तासुंदरीची कॉंग्रेसची अभिलाषा इतकी उतावीळ झाली होती की, ‘हाता’ला ‘सायकल’चे कॅरिअर ढकलून रिंगणात हाकण्याची वेळ आली. पण जनमताच्या बळावर ‘गुंडाराज’च्या या चिखलात भाजपचे ‘कमळ’ उमलले आणि ‘योगीराज’च्या सुशासन पर्वाचा प्रारंभ झाला. परिणामी, सपाची पुरजे पुरते खिळखिळे झालेली आणि अखिलेशने तरीही तिसर्‍या गिअरमध्ये सुसाट दौडवलेली ‘सायकल’ही पंक्चर झाली आणि आघाडीची ही ‘हा राहुलबाबांच्या हात चलाखी स्वत:हूनच उलटे ‘उत्तर’ देऊन गेली. परिणामी, निवडणुकीपुरते हातात हात घालून भाईचारा मिरवणार्‍या कॉंग्रेसने अखिलेश भय्यांच्या सपापासून काडीमोड घेतला आहे. यापुढे उत्तर प्रदेशात होणार्‍या पंचायतपासून ते पालिकेच्या सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी केली. थोडक्यात काय, तर ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी ही काहीशी गत.
 
‘युपी को ये साथ पसंद है’चे नारे देत राहुल-अखिलेशने निवडणुकीपूर्वी जंगजंग पछाडले. गल्लीबोळातील विजेच्या तारांखालून वाकून वाकून हात दाखवून मतांचा जोगवाही मागितला. पण युपीच्या जनतेने ना हातात ‘हात’ दिला ना ‘सायकल’ला हिरवा झेंडा दाखविला आणि म्हणूनच सपाला केवळ ४७, तर १०५ जागा लढवलेल्या कॉंग्रेसला तब्बल सात जागांवर आवरते घ्यावे लागले. त्यामुळे अखिलेशची ‘विकासपुरुष’ ही सपाने निवडणुकीपूर्वी रंगवलेली कृत्रिम प्रतिमा पूर्णत: निष्प्रभ ठरली. तेव्हा, आगामी निवडणुकीतही ‘अखिलेश कार्ड’ चालणार नाही, याची जाणीव होताच कॉंग्रेसने सपापासून फारकत घेत आपली स्वतंत्र चूल फुंकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतो.
 
खरं तर शीला दीक्षितांपासून ते कॉंग्रेसचे स्थानिक कार्यकर्तेही निवडणुकीपूर्वी सपा-कॉंग्रेसच्या या आघाडीच्या विरोधात होते. पण पराभवाच्या भयाने ग्रासलेल्या राहुलबाबांनी हरलो तरी, आपली एकट्याची नाही, तर दोघांची बेअब्रू होईल, म्हणून व्यवसायातला ‘रिस्क शेअरिंग’चा फंडा अवलंबला आणि बलहीन कॉंग्रेसचा हात अखिलेशच्या हाती मारला, पण सरतेशेवटी उपयोग शून्यच! पप्पू अपेक्षेप्रमाणे फेल झालाच! तेव्हा, कॉंग्रेस असो वा सपा, मोदी आणि योगींच्या करिष्म्यासमोर पुढच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही यांचा टिकाव लागणे खरं तर दुरापास्तच! तरीही २०१९ साठी मोदींविरोधात एक सक्षम महाआघाडीचे स्वप्नरंजन करणार्‍यांनी अशा स्वार्थी कॉंग्रेसची नेतृत्व अकुशलता जरुर ध्यानी ठेवावी.प्रतिमाजंत आणि प्रतिभावंत
शासनकर्त्यांची ‘प्रतिमा’ आणि ‘प्रतिभा’ दोन्ही त्यांच्या लोकहितैशी कामांतून, राज्याच्या जनतेप्रती असलेल्या त्यांच्या भावनांतून आणि लोकसंवादातून निर्माण होत असते. साहजिकच माध्यमे हे ‘प्र’ रंगविण्यात आणि बिघडविण्यातही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. पण, आजचा मतदारही सूज्ञ असून कोण फुकटची ‘प्रतिमा निर्मिती’ करतोय आणि कोण खरा ‘प्रतिभावंत’ आहे, याची चांगलीच जाण ठेवून आहे. त्याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेला अजून एक लोकहिताचा निर्णय.
 
सपा सरकारच्या काळात सरकारी योजनांपासून ते वस्तूंपर्यंत सरसकट सर्वांचे नामकरण ‘समाजवादी’ किंवा ‘अखिलेश’ असे करण्याचा प्रतिमानिर्मितीचा राजकीय पायंडाच पडला. म्हणा, त्यापूर्वीही बहन मायावतींनी उत्तर प्रदेशात पुतळे उभारून स्वत:च असा प्रतिमेचा पूर आणला होता, पण त्याचे उत्तरही मायावतींना निवडणुकीच्या निकालांतून नंतर मिळालेच. पण, २०१२ साली सत्तेवर आलेल्या अखिलेशने त्यातून कुठलाही धडा न घेता विद्यार्थ्यांना दिलेल्या लॅपटॉपवर चक्क त्यांचा आणि मुलायमसिंहांचा स्क्रिनसेव्हर झळकवला. शिवाय, ‘समाजवादी मीठा’पासून ते ‘समाजवादी स्मार्टफोन्स’ योजनांचा पाऊस पाडला. लॅपटॉप सोडा, अखिलेशबाबूंना स्वत:चा चेहरा इतका प्रिय की, विद्यार्थ्यांच्या शाळांच्या बॅगांवरही त्यांनी आपल्या चेहर्‍याची छाप सोडली. सरकार बदलले. पण हजारो ‘अखिलेशमुखी बॅगां’चे करायचे काय, हा प्रश्न प्रशासनाला पडला. त्यावर उपाय म्हणून योगींनी या बॅगा फेकून जनतेच्या कररूपी पैशाचा चुराडा न करता, त्या विद्यार्थ्यांना या बॅगा शाळा सुरू होण्यापूर्वी लवकरात लवकर कशा मिळतील, याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
तेव्हा राज्याच्या तिजोरीचा विचार करणार्‍या योगींनी राजकीय स्वार्थ सर्वस्वी दूर ठेवत, अखिलेशमुखी बॅगांच्या वाटपाला परवानगी दिली आहे. त्यांच्याऐवजी अजून कोणी मुख्यमंत्री असते, तर त्यांनी नक्कीच या बॅगांना केराची टोपली दाखविली असती. त्या बॅगाही जनतेच्या पैशातूनच विकत घेतल्या आहेत, याचा साधा विचारही झाला नसता. कारण अर्थातच राजकीय प्रतिमानिर्मितीचा सोस आणि शौक. पण योगी सर्वार्थाने वेगळे आहेत. त्यांच्या कृतीतून ही बाब पुनश्च सिद्ध झाली आणि म्हणूनच त्यांच्यासारख्या प्रतिभावंत व्यक्तीची अखिलेशसारख्या प्रतिमाजंतांशी तुलना होऊच शकत नाही.
 
- विजय कुलकर्णी